बाबा आता येतील. आई येईल. बाळ येईल. त्याला मला हातही लावू देणार नाही, माझा उपहास सुरू होईल. पदोपदी माझी अवहेलना, तिरस्कार करतील. तू विषवल्ली आहेस, करंटी आहेस असे बाबा म्हणतील आणि त्यात त्यांना ही गोष्ट कळली तर? मग तर मला फाडून फाडून खातील. मारतील. हाकलून देतील. उदय, मग कोठे रे जाऊ? का जीव देऊ? होईल का ते धैर्य? पोटात आहे रे कोणीतरी; त्याच्यासह जीव देऊ? अभागिनीच्या बाळाने कशाला जन्माला यावे? आणखी एक अभागी जीवाची भर जगात कशाला? बाळ का अभागी असेल? बाळ केवळ माझे नाही. ते तुझेही आहे. तूही का अभागी आहेस? नाही, तू भाग्यवान आहेस. तू येशील, मला नेशील. ये, ये, लौकर ये. आता धीर नाही हो राजा !”

असे किती वेळ ती बोलत होती. कधी प्रकट बोले. कधी अप्रकट. मध्येच तो फोटो ती हृदयापाशी धरी. आणि सायंकाळ झाली. ती फिरायला गेली. त्या कालव्याच्या काठी ती जाऊन बसली. त्या कालव्यानेच तिच्या ओसाड जीवनाला ओलावा दिला होता. त्या कालव्यामुळेच तिचे जीवन हिरवेगार झाले होते. सुफळ संपूर्ण झाले होते. ते बाभळीचे झाड तेथे होते. त्या काटेरी रुक्ष झाडाखालीच तिच्या व त्याच्या प्रेमाचा पारिजातक फुलला होता. प्रेमाचे बकुळ-मांदार वृक्ष फुलले होते. किती आठवणी ! ‘हा बघ तुझ्या पदरावर मुंगळा’ असे म्हणून हळूच त्याने तो कसा उडवला. सारे तिला आठवत होते. आणि माझ्या छत्रीत त्याला मी बोलावले. तो आला नाही. येथेच त्याचा ताप मी पाहिला आणि त्या तापाच्या रात्री दोन देह एकत्र झाले. दोन जीव एकरूप झाले. तापलेले दोन तुकडे सांधले, एकजीव झाले. हा अमर सांधा का निखळेल?

सरला बसली होती. आणि पाऊस आला. ती ऊठली नाही. जवळ छत्रीही नव्हती. परंतु किती वेळ बसणार? “अशीच पावसात ओलेती होऊन उदयकडे मी गेले होते. त्याचे धोतर गुंडाळून त्याच्या पांघरूणात मी झोपले. किती वेळ झोपले? तो वाचून परत आला तरी मी झोपलेलीच. आज कोणाच्या पांघरूणात शिरू? कोठे आहे ते पांघरूण? कोठे आहे त्या पांघरूणाचा मालक?” अशा विचारात ती होती.

शेवटी सरला उठली. तिला भराभर चालवत नव्हते.

“उदय, तुझे प्रेमळ व गोड ओझे माझ्याजवळ आहे. बोजा माझ्याजवळ देऊन तू कोठे गेलास? हा बोजा कोठे उतरू, कोठे ठेवू? ही तुझी प्रेमळ मधुर ठेव कोठे सुरक्षित राहील? कोठे वाढेल? उदय, ये रे लौकर.”

ती घरी आली. ती गारठली होती. तिला हुडहुडी भरली. कोरडे नेसून ती पांघरूण घेऊन पडली. तिला का ताप आला?

“ये रे तापा, ये. होऊ दे न्यूमोनिया, टायफॉईड. ये. बाबा येण्याच्या आत हे प्राण जाऊ देत. त्यांना मुलीचे प्रेत दिसू दे. उदय येणार नसेल तर मरणा, तू तरी ये. उदय सदय नसेल होणार तर मृत्युदेवा, तू तरी सदय हो. या सरलेला घेऊन जा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to रामाचा शेला


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
सापळा
झोंबडी पूल
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
गोड शेवट
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी