“तू भित्रा आहेस उदय. मला सोडून जाऊ नकोस. आपण दोघांचा एकत्र फोटो काढू. आज दुपारी जाऊ. दिवाळी येथे कर.”
आणि तो चार दिवस तेथेच राहिला. त्यांनी दोघांचा एकत्र फोटो काढला. फोटोच्या दिवशी तिने कुंकू लावले होते. ती उदयला म्हणाली,
“उदय, कुंकू लाव मला. आपले कधीच लग्न लागले आहे. खरेखुरे लग्न. लाव कुंकू. माझ्यावर तुझ्या सत्तेचे चिन्ह कर. तुझा शिक्का मार.”
आणि त्याने कुंकू लावले. पतिपत्नी म्हणून त्यांनी फोटो काढला. दिवाळी संपली.
“सरले, आता उद्या मी जातो. अभ्यास करायला हवा.”
“जा हो राजा. बाबाही येतील. आपण लौकरच एकमेकांची होऊ.”
“होऊ. रजिस्टर पध्दतीने लग्न लावू.”
“तू म्हणशील तसे.”
आणि उदय आपल्या खोलीवर गेला. दिवाळी गेली. रमाबाई माहेरीच होत्या. अद्याप त्या बाळंत झाल्या नव्हत्या. नाताळ आला. उदय अभ्यास करीत होता.
एके दिवशी सरला त्याच्याकडे आली होती.
“उदय !”
“काय सरले?”
“आपण एकमेकांचे कधी व्हायचे?”
“अजून का झालो नाही?”
“तसे नव्हे रे. कायद्याने. जगाच्या दृष्टीने.”
“माझी परीक्षा पास होऊ दे.”
“उदय !”
“काय सरले? सचिंत का आवाज?”
“उदय, तू मला अंतर नाही ना देणार? मला सोडून नाही ना जाणार?”
“असे कसे तुझ्या मनात येते? मी का कसाई आहे, खाटिक आहे?”
“रागावलास तू?”
“मग काही तरी बोलतेस.”
“उदय माझ्यावर रागावू नकोस. उदय, मला दिवस गेले आहेत. मला समजले आहे.”
“मी तुला अंतर देणार नाही.”