सरले, कोठे ग आता जाणार?

ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा असेही तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर? मी का जगू? नको का जगायला? बाळासाठी नको का जगू? बाळाला मी आणीन, वाढवीन. परंतु बाळाला जग वाढवील. उदय माझी वरती वाट बघत असेल, काय करू मी?

या विचारात ती कल्याण स्टेशनवर उतरली, मुंबईस तरी कोण होते? एक समुद्र होता. नक्की निश्चय करण्यासाठी ती तेथे उतरली. एका बाकावर ती बसली होती. ते पाहा, एक पोक्त गृहस्थ तिच्याकडे पाहात आहेत. अंगात कोट आहे, डोक्याला जरीचा रूमाल आहे, अंगावर उपरणे आहे. कपाळाला केशरी गंध आहे. स्वच्छ धोतर नेसलेला असा हा कोण गृहस्थ? पायात पुणेरी जोडा, तोंडात विडा. कोण गृहस्थ?

तो सरलेच्या बाकावर येऊन बसला.

“तुम्ही दु:खी दिसता.” त्याने विचारले. सरलेने त्याच्याकडे पाहिले. ती काही बोलली नाही.

“तुमचे दु:ख सांगण्यासारखे असेल तर सांगा. नाशिकला आमची एक संस्था आहे, नारीसाहाय्यक संघ. स्त्रियांना अनेक दु:खे असतात आणि अनाथ दु:खी स्त्रियांना मुसलमान पळवतात. नाना प्रकार. तुम्ही एकटया दिसता. तुम्ही का अनाथ आहात? पतीने का त्याग केला? आईबापांनी का हाकलले? तुम्हाला नाशिकची आमची संस्था साहाय्य करील. त्या संस्थेशी माझा संबंध आहे. संस्था राहायला आधार देते. तेथे शिकण्याची सोय होते. नर्सिंगचा कोर्स घ्यावा, दुसरे काही शिकावे. आणि पुढे कोठे नोकरीही मिळवून देण्याची संस्था खटपट करते. तुम्ही शिकलेल्या असाल.”

“मॅट्रिकपर्यंत शिकल्ये आहे.”

“वा: ! तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. अहो, मुलीच्या शाळेत लावून देऊ. तुम्ही कोठल्या?”

“मी खरीच एक अभागिनी आहे. तुम्ही माझे धर्मपिते व्हा. मुलीची कीव करा. मला नोकरी लावून दिलीत तर अत्यंत ऋणी होईन. आधी डोके ठेवायला कोठे आधार द्या.”



“चला माझ्याबरोबर. मी नाशिकला जात आहे. गाडी येईलच. नऊ-दहाला नाशिक. उद्या लावतो तुमची व्यवस्था. तुमचे काय नाव?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel