पहाट होत आली. ती बाहेर आली. ती वरती गच्चीत गेली. अद्याप पुणे झोपलेले होते. पाखरांची किलबिल सुरू झाली होती. पारिजातकांच्या फुलांचा मंद मधुर सुगंध येत होता. आकाशात ठळक ठळक तारे अद्याप प्रशांतपणे चमकत होते. जणू ते प्रात:प्रार्थना म्हणत होते. सरलेला प्रसन्न वाटले. ती क्षणभर डोळे मिळून उभी राहिली. तिचे तोंड कोठे होते? उदयची खोली ज्या दिशेला होती त्या दिशेला का तिचे तोंड होते? परंतु प्रार्थना उत्कट असेल तर तोंड कोठेही असो. तुमचा देव, तुमचा प्रभू, तुमचा स्वामी तुमच्या समोरच आहे.

सरला खोलीत आली. तिने सुंदर फुले तोडून घेतली. ती आपल्या खोलीत आली. तिने सुंदर गुच्छ तयार केला. आणि तो रुमाल, तो गुच्छ घेऊन ती फिरायला जाण्यासाठी बाहेर पडली. सुंदर थंडगार हवा. सरला झपझप जात होती. मध्येच ती पळायला जागे. जणू तिला अपार स्फूर्ती आली होती. जणू प्रबळ चैतन्य तिच्या रोमारोमांत संचरले होते. किती लांब उदयची खोली ! अद्याप कशी येत नाही? मला पंख असते तर? मनाला पंख आहेत. शरीराला का बरे नाहीत ! परंतु लांब खोली आहे तीच बरी. तिकडे फार जा-ये नसेल. शिवालय गावाबाहेर रानात असते. उंच डोंगरावर असते. तेथे गर्दी नसते. देव भक्त. आणि जोडीला उदार, सुंदर निसर्ग. असे विचार करीत सरला येत होती.

नेमकी खोली सापडली. तो बंगला नेमका सापडला. खोली उघडी होती. आत उदय नव्हता. तो उठला होता. सरलेने त्याचे अंथरूण साफ केले. ब्लँकेटची घडी केली. तिने टेबल साफ केले. तो फुलांचा गुच्छ तेथील एका भांडयात तिने ठेवला आणि ती वाट पाहात बसली. त्या अंथरूणावर क्षणभर ती पडली. तिकडे नळाच्या पाण्याचा आवाज येत होता. येईल आता उदय. आपण लपावे. कोठे लपावे? या खाटेखाली लपल्ये तर? ती त्या खाटेखाली गेली. अंग संकुचित करून लपली. आणि उदय आला. त्याच्या खडावा वाजल्या. तो खोलीत आला. तो चकित झाला. अंथरुण साफसूफ ! टेबल लावलेले ! फुलांचा मनोहर गुच्छ ! सरला आली का काय? मी खोलीत नाही असे पाहून गेली की काय? जरा थांबली का नाही? तो तसाच सरलेला शोधायला बाहेर पडला. आणि सरला खाटेखालून बाहेर आली. उदय निराश होऊन परत येतो तो खोलीत देवता बसलेली !

“कोठे होतीस तू?”

“येथेच.”

“येथे कशीं असशील?”

“बायकांना जादू करता येते. मी लहान होईन व तुझ्या डोळयांत बसेन, तुझ्या हातांत फुलाप्रमाणे लहान होऊन खेळेन. तुझ्या खिशात मावेन. खरेच हसू नकोस. मी येथेच होत्ये. लहान होऊन बसले होत्ये.”

“खरे सांग ना?”

“या खाटेखाली लपल्ये होत्ये.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel