“तुम्ही जगा, आज किती तरी सेवकांची जरूर आहे. तुमची सरला समजू या की मेली ! का मेली? समाजाला भिऊन मेली ! समाजातील अनुदारपणामुळे तिला मरावे लागले ! तुमच्या सरलेसारख्या शेकडो दु:खीकष्टी सरला असतील. त्यांचे जीवन उद्या सुखाचे व्हावे, त्यांनाही प्राण द्यावे लागू नयेत, म्हणून नको का खटपट करायला? या समाजात उदार धर्म आणायला हवा आहे. तो कोणी आणायचा? समाजात माणुसकी आणायला हवी आहे. ती कोणी आणायची? तुमच्यासारख्यांनी अदम्य धैर्याने दुष्ट रूढींची खांडोळी करायला उभे राहिले पाहिजे. तुम्ही दु:ख भोगलेत, अन्याय सहन केलेत. यामुळे तर हे दु:ख, हे अन्याय नष्ट करायला अधिकच चीड तुम्हांला आली पाहिजे. ज्याला अन्यायाची आच लागली नसेल तो कशाला उठेल? क्रांती ते करतात, जे स्वत: अन्यायाला बळी पडलेले असतात. उदय, निराश नका होऊ. तुमच्या हृदयवेलीवर सरला आहे. ती तुम्हांला ऊब देईल. प्रेरणा देईल. प्रेम अमर आहे. त्याचा ओलावा सदैव मिळत असतो. तुम्ही राग नका मानू. माझी तुमची ओळख नाही. परंतु ही वेल, ही पाखरे, ही नावे यांमुळे तुमची-माझी आधीच ओळख झाली होती. तुमचे नाव मला आवडते. उदय ! तुम्ही नव-धर्माचा उदय करा. नव-समाजरचनेचा उदय करा. हिंदुस्थानात प्रचंड क्रांती पेटणार आहे. सारी विषमता, सारे दास्य, त्यात खाक होणार आहे. सारी क्षुद्रता त्यात होमिली जाणार आहे. तुमच्या डोळयांना नाही दिसत ती क्रांती? केवळ परकी सत्तेचीच तिच्यात आहुती पडणार आहे असे नाही. सर्व प्रकारचा जुलूम भस्म होणार आहे. या क्रांतीचे पाईक बना, अवदूत बना. आम्ही तुम्हांला येऊन मिळू. नवजीवन सारे उठू. सर्वांगीण स्वातंत्र्याला निर्मू. उदय, किती कामे आहेत ! बहुजनसमाजात जायला हवे आहे. सेवेने त्यांच्यात शिरून त्यांचा आत्मा जागृत करायला हवा आहे. सूर्याचे प्रकाशमय किरण येतात व मुक्या कळया फुलतात. त्याप्रमाणे सेवेचे, प्रेमाचे, सहानुभूतीचे, नवज्ञानाचे किरण घेऊन आपण परित्यक्त बंधूंत जाऊ या. भिल्ल, कातकरी, गोंड, अनेक जातिजमाती रानावनांत पडलेल्या आहेत. कोण त्यांच्यात जातो, त्यांना उठवतो? ना वस्त्र, ना अन्न; ना ज्ञान ना मान. त्यांना माणसे करायला कोणी जायचं? त्यांच्यात आश्रम कोणी काढायचे? मिशनरी त्यांच्यात जातात; परंतु आपणांमधून हजारो मिशनरी का नाही निघत? हिंदी राष्ट्रात का सहानुभूती, बंधुभाव नाही? जो तो का स्वत:पुरते पाहणारा? माझी पत्नी, माझी प्रिया, माझे सुखदु:ख, यांपलीकडे का कशाचे अस्तित्व नाही? सत्य काय ते मी व माझी प्रिय वस्तू. बाकी का सारे मिथ्या? उदय, समाजातील अन्याय, अज्ञान, जुलूम, दु:ख, उपासमार, अनुदारता हे सारे पाहून रक्त सळसळले पाहिजे. नवी सृष्टी निर्माण करण्याच्या हिमतीने, प्रखर तीव्रतेने कंबर बांधून “दे घाव घे घाव” करीत लढले पाहिजे.”

“निराशा दूर फेका. आशेने उभे राहा. सरलेचे मनात दर्शन घेत जा. क्षणभर एकांतात बसा. सरलेचे प्रेमस्मरण करा आणि पुन्हा लढायला बाहेर पडा. मरू नका. कर्मवीर बना. फुकट मरायचा हक्क नाही. तुमच्या जीवनावर सर्व विश्वाचा हक्क आहे. ते फेकू नका. मी काय सांगू, किती सांगू? मला राहवत नाही.”

“तुम्ही प्रेम केले नाही म्हणून असे सांगता. प्रेमाच्या स्वर्गात कधी गेले होतेत? त्या प्रेमसमुद्रात कधी डुंबले होतेत?”

“उदय, मी त्या आगीतून गेलो आहे. एका मुलीवर माझे प्रेम होते. तिचेही माझ्यावर होते. परंतु आईबापांनी तिचे दुसरीकडे लग्न केले. ती गाय तिकडे गेली. ती तिकडे दु:खी असेल. हळूहळू नवसंसारात ती दु:ख विसरेल. तिला मुलेबाळे होतील. तेथे तिचे आतडे गुंतेल. परंतु एखादे वेळेस तिला माझी आठवण येईल. हृदयाच्या एका भागात कधीच न सुकणारे ते प्रेमपुष्प तिला दिसेल. तिला तो दूरचा सुगंध येईल. पुन्हा ती कामात गुंतेल. उदय, माझ्याही जीवनात ते प्रेम आहे. कदाचित मी दुसर्‍या एखाद्या मुलीशी लग्न करीन. परंतु ती प्रेमस्मृती का जाईल? त्या प्रेमस्मृतीचा सुगंध माझ्या जीवनात राहील. ते प्रेम फुकट नाही गेले.”

“खरे प्रेम काय जगात नाही? प्रेम म्हणजे मरण ! प्रेमाला प्रिय व्यक्तीशिवाय कसे जगवेल? सारे का बुडबुडे, केवळ शब्द?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel