ते खरे आहे. माझ्यासारख्या अबलेत केवढे बळ या शेल्याने निर्मिले आहे !”
असे म्हणून सरला उठून गेली. ती थोडा वेळ बगिच्यात हिंडत होती. आज शेटजी फिरायला गेले नाहीत. तेही बगिच्यातील एका बाकावर एकटेच बसले होते. कारंजे थुईथुई उडत होते. कोठून तरी उंचावरून पाणी आल्याशिवाय कारंजे उडत नाही. त्याप्रमाणे हृदयाचे कारंजेही उच्च भावनांचे, उदात्त विचारांचे पाणी जोराने आले तरच उडते. सरलेच्या हृदयाचे कारंजे का उडत होते? ती त्या कारंज्याजवळ उभी होती. तिचे मन जणू थुईथुई नाचत होते. तिने एक सुंदर गुलाबाचे फूल तोडले व शेटजींना नेऊन दिले.
“तुझ्या केसांत घाल बेटी.”
“उदय आला म्हणजे तो घालील. तोवर नको. माझे हृदय नाचत आहे, उदय येईल असे म्हणत आहे.” असे म्हणून
‘हासवि नाचवि हृदयाला’
हे गाणे ती गुणगुणू लागली. आणि गुणगुणत निघून गेली.
शेटजी व सरला इकडे बगिच्यात आहेत. परंतु तिकडे शहराबाहेर नदीकाठी कोण बसले? दाढी वाढलेली आहे. केस वाढलेले आहेत. अंगात लांब, स्वच्छ असा पायघोळ झगा आहे. कोण हे गृहस्थ? एकटेच आहेत. गोदावरी प्रसन्नपणे वाहात आहे. मंद मंद वाहात आहे. सूर्यास्त झाला. आणि आकाश शतरंगांनी भरून गेले. प्रथम केवळ लाल लाल होते. परंतु हळूहळू कितीतरी रंगांच्या छटा तिथे दिसू लागल्या !
“स्वामी, चलायचे ना परत?” एक मुलगा येऊन म्हणाला.
“तू का बोलवायला आलास?”
“हो.”
“तू जा. मी येईन. सभेच्या वेळेपर्यंत येईन. मला खायचे नाहीच. येथे आनंद वाटत आहे. तू जा. मी चुकणार नाही. गोदावरीचा तो डोह येथेच पलीकडे आहे. अरे, नाशिक शहरात मी लहानपणी होतो. हिच्या पुरात पोहलो आहे. हे शहर मला सारे माहीत आहे. ही गोदावरी ओळखीची आहे. तू जा. या गंगामातेजवळ बोलू दे.” तो मुलगा गेला. अस्पृश्यांच्या छावणीतून तो आला होता. तो स्वयंसेवक होता. स्वामींची विचारपूस करावयाला मुद्दाम आला होता. तो गेला. आणि स्वामी तेथे हिंडू लागले. गंगेचे थोडे पाणी प्यायले. त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत होते. हे नाशिक पवित्र शहर; येथे राम, सीता, लक्ष्मण किती वर्षे राहिली ! प्रभू रामचंद्र येथे हिंडले असतील. सीतामाई हिंडली असेल. तो बंधुप्रेमाचा पुतळा लक्ष्मण फळे गोळा करीत हिंडला असेल. हा सारा प्रदेश पवित्र आहे. येथील अणुरेणू पवित्र आहे. हे भूमाते, तुला वंदन करू दे, तुझ्या धूलिकणांत लोळू दे. असे जणू ते स्वामी मनात म्हणत होते. आणि मनातले विचार ओठांवर आले. ते कविता म्हणू लागले :