“सरला. तिचा उदय कोठे भेटणार? ती हे जग सोडून कधीच गेली असतील ! तूही चाललीस ! बाळ गेला ! मीच कपाळकरंटा कशाला राहू ! मलाही मरू दे. येऊ दे तुमच्या पाठोपाठ. वर देवाच्या घरी एकत्र राहू.”

“तुम्ही जगा. सरला येईल. मरणार्‍याचे शब्द खरे होतात. सर्वांच्या वतीने क्षमा मागायला जगा. माझ्या वतीनेही तिला प्रेम द्या. तिच्या बाळाचे माझ्या वतीने पापे घ्या. हो, येतील ती. तुम्ही नका मरू.”

रमाबाईंना बोलवेना. त्या शांत पडून होत्या. त्यांची वाणी आता थांबली. डोळे मधून मधून उघडत. आणि शेवटची वेळ आली. रमाबाईंनी पतीच्या मांडीवर राम म्हटला.

ते घर आता भयाण दिसे. घरात कोणाचा आवाज असा नाही. विश्वासराव असून नसल्यासारखे. त्यांना खाणेपिणे काही रूचेना. कसे तरी जगत होते. सर्वांच्या मरणाच्या स्मृतींनी ते घर भरलेले होते. सर्वत्र मृत्यूच्या आठवणी ! तेथे बाळाची खेळणी, सरलेची पुस्तके, रमाबाईंच्या वस्तू ! काही पाहिले तरी कोणाची आठवण येई. सारे घर जणू बोलत होते. घरातील प्रत्येक वस्तू बोलकी होती. प्रत्येक वस्तू म्हणजे इतिहास होता. शोकमय इतिहास !

एके दिवशी सरलेच्या वह्या विश्वासराव चाळीत होते. चाळता चाळता एके ठिकाणी ते थबकले. काय होते तेथे लिहिलेले? एकाक्षरी प्रेमपत्र का? नाही. मग काय होते? ते एक अपूर्ण आत्मगत लेखन होते.

“मी पंढरपूरला जाऊ का? घेतील का तेथे मला? का तेही हाकलतील? जिला आईबाप हाकलून देतात, तिला जगाने का हाकलू नये? उदय, कोठे रे मी जाऊ? बाबांना कसे सांगू? तुझे-माझे प्रेम का पाप? अरेरे...

असा तो मजकूर होता. त्या लिहिण्यावर डोळयांतील पाणी पडलेले होते. तेथे डाग पडले होते. विश्वासराव त्या मजकुराकडे बघत राहिले. त्यांच्या मनात थोडी आशा आली. “सरला पंढरपूरला गेली असणे शक्य आहे. परंतु इतके दिवस का ती तेथे असेल? चौकशी करावी का? स्वत: जाऊन यावे का?” असे विचार त्यांच्या मनात आले. नाही तरी घरात त्यांचे लक्ष नसेच. घर जसे त्यांना खायला येई. यावे पंढरपूरला जाऊन. पांडुरंगाचेही दर्शन होईल, चंद्रभागेचे दर्शन होईल, असे त्यांनी ठरविले. आणि एके दिवशी पंढरपूरला जायला ते निघाले. जाण्याआधी त्यांनी फुलझाडांना, फळझाडांना भरपूर पाणी घातले. दोनचार दिवस त्यांना कोण पाणी घालणार? म्हणून ते घालून ठेवीत होते. त्यांनी सरलेची काही पुस्तके बरोबर घेतली. ती वही घेतली, जीत तो मजकूर होता. मीच सरलेचा बाप असे सिध्द करण्यासाठी जणू त्या वस्तू त्यांनी घेतल्या होत्या. घरात एक चांदीचे भांडे होते. सरलेचे तिच्यावर नाव होते. सरलेची आई जिवंत असताना तिच्या एका वाढदिवसाचे वेळेस ते भांडे आणण्यात आले होते. ते भांडेही त्यांनी बरोबर घेतले. ते निघाले, स्टेशनवर गेले. सोलापूरकडच्या गाडीत ते बसले. आणि कुर्डूवाडीस उतरून ते पंढरपूरला आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel