सरला निघून गेली. भैय्या मोठयाने हसला. तो नवतरूणही जरा हसला. “सरला नि उदय यांतील हीच सरला दिसते. आणि हा उदय कोण? त्याने का आपला अस्त केला? येतो सांगून पठ्ठयाने दिला वाटते गुंगारा. येथे शेण खाल्ले असेल लेकाने तर आता जाईल सांगली-कोल्हापूरला. येथे कशाला तोंड दाखवील !” असे तो तरूण मनात म्हणाला. त्याने त्या वेलीजवळ लिहिले, “अरेरे ! एक पक्षी उडून गेला, दुसरा रडत राहिला ! संसार हा असा आहे. प्रेम म्हणजे ताटातूट ! प्रेम म्हणजे मृगजळ ! प्रेम म्हणजे बुडबुडा ! सुंदर, परंतु भंगुर !”

त्या तरूणाला जणू गद्यकाव्याची स्फूर्ती आली. त्याचे इकडे काव्य होत होते. परंतु सरला बाणविध्द हरिणीप्रमाणे विव्हळ होऊन जात होती. तिच्याने चालवेना. ती थकली. तिने टांगा केला. एकदाची घरी आली.

आता फार दिवस वाट पाहणे शक्य नव्हते. उदयचा पत्ता नाही. त्याचे पत्रही नाही. शेवटी पित्याच्या कानावर सर्व हकीगत घालण्याचे तिने ठरविले. ती रात्री लिहीत बसली होती. परंतु एकाएकी तिने लिहिणे थांबविले. बाबा करतील का क्षमा? ते मला नेहमी विषवल्ली म्हणत आले. त्यांचे माझ्यावर थोडेही प्रेम नाही. मी जिवंत आहे की मेलेली आहे याचीही त्यांना पर्वा नाही. त्यांच्यासमोर का अश्रू ढाळू? का पदर पसरू? ते शिव्या देतील. नाही नाही ते बोलतील ! वास्तविक मला शिव्या देण्याचा त्यांना काय अधिकार? त्यांनी उतारवयास फिरून नाही का लग्न केले? मग मला त्यांनी काय म्हणून नावे ठेवावी? मी माझे आयुष्य कसे कंठावे? मी का मनुष्य नाही? मी का देवता आहे? देवतांनाही भुका असतात. मी बाबांना नेहमी म्हणे, “कसे आयुष्य कंठू?” ते काही बोलत नसत. त्यांनी    माझी कधी पर्वा केली नाही. माझ्या सुखदु:खाचा त्यांनी कधी विचार केला नाही. कशाला त्यांना लिहू? कशाला त्यांच्या शिव्या ऐकू? उदयलाही ते शिव्या देतील. माझ्या प्रियतमाला ते वाटेल ते बोलतील. निमूटपणे निघून जावे. कोठे जावे? पंढरपूर आहे. तेथे आधार आहे असे म्हणतात. जाऊ का तेथे? घेतील का मला? ती विचार करीत होती.

शेवटी तिने निश्चय केला. तिने जायचे ठरविले. तिने फोटो घेतले. सारी प्रेमाची पत्रे घेतली. तीच तिची संपत्ती होती. तिने तो रूमाल घेतला तिने लुगडी, दोन पातळी, पोलकी, सारे घेतले. एक सतरंजी, एक घोंगडी, एक चादर, एक उशी. लहानशी वळकटी तिने बांधली. एक कडीचा तांब्या घेतला. तिची तयारी झाली. घर सोडून जाणार. ती अंथरूणावर बसली, रडली. किती रडणार? “उदय, कोठे रे तू आहेस? कोण माझे अश्रू पुशील? प्रेमाने हात धरील? उदय !” असे म्हणत होती.

उजाडण्याच्या आत निघणे भाग होते. तिने कपाळाला कुंकू लावले. आजपासून मला सुवासिनी होऊ दे. कोणाची लाज नको. देवासमोर भरल्या कपाळाने जायला मला लाज वाटणार नाही. मग जगाला कशाला भ्यावे? तिने एका डबीत कुंकू काढून घेतले. पुन्हा ती तेथे खाटेवर बसली. थोडया वेळाने उठून ती गच्चीत गेली. तेथे ती उभी राहून सभोवती पाहात होती दूर पर्वतीची टेकडी अस्पष्ट दिसत होती. आणि तो कालवा, ते बाभळीचे झाड ! तिला त्या गोष्टी दिसत नव्हत्या. परंतु मनाच्या डोळयांना दिसत होत्या. त्या दिवाळीत ती व उदय या गच्चीत बसली होती. त्या वेळेस तिने फोनो लावला होता. आणि एक गाणे ऐकता ऐकता उदयचे डोळे भरून आले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel