अशा विचारात ती रमे. पत्रातील काही ओळी वाचाव्या नि स्मृतितरंगांवर तरंगावे असे चालले होते. आणि आता ती प्रत्यक्ष सृष्टीत उतरली. पंढरपूरला काय करायचे? ही पत्रे जवळ ठेवायची का? कशाला? तेथील चालकांनी वाचली तर? उदयचे आणि माझे प्रेम ! ते आम्हांलाच माहीत. असो. ही पत्रे जगाला कशाला दाखवा? उदय, तुझी ही पत्रे मला तोंडपाठ आहेत. जुन्या बायकांना व्यंकटेशस्तोत्र वगैरे पाठ येते. भटजींना वेद पाठ असतात. मलाही प्रेमवेद पाठ आहे. हे प्रेमाचे व्यंकटेशस्तोत्र पाठ आहे. उदय, ही पत्रे मी चंद्रभागेच्या प्रवाहावर सोडून देईन. ही पवित्र प्रेमळ पत्रे ! ती रत्नाकराजवळ जावोत. या पत्रांतील भावनांची खोली, यांतील प्रेमाची उत्कटता व गंभीरता उचंबळणार्‍या अगाध सागरालाच समजेल. चंद्रभागा ही पत्रे आदराने व आस्थेने समुद्राला नेऊन देईल. त्याच्या अमोल खजिन्यात ती राहतील.

कुर्डूवाडी स्टेशन आले, ती उतरली. पंढरपूरला जायला गाडी होती. परंतु रात्री १० ला पोचणार होती. कोठे रात्री जायचे? बसू चंद्रभागेच्या तीरी. विचार करीत ती गाडीत तर बसली. तिच्या मनातील तगमग किती सांगावी, कशी सांगावी? अनाथ स्त्रीच्या जीवनात कोण डोकावेल? अशा आसन्नप्रसवा अगतिक स्त्रीच्या हृदयात कोण पाहू शकेल? दु:ख, लज्जा, निराशा, अंधार, वेदना, यातना, अपमान, उपेक्षा, सर्वांची तेथे मिळणी आणि अश्रूंद्वारा त्यांचे संमीलित स्वरूप बाहेर प्रकट होत असते.

पंढरपूर जवळ आले. डब्यात बडवे होते. तिची विचारपूस करीत होते. परंतु ती एक अक्षरही बोलली नाही. पंढरपूर आले. विठूची नगरी आली. अनाथांना, हतपतितांना आधार देणारी नगरी. संतांनी जेथे भेदातीत प्रेमाचा पाऊस पाडला, ती नगरी आली. ती स्टेशनच्या बाहेर आली. टांगे उभे होते.

“कोठे जायचे?” एका टांगेवाल्याने विचारले.

“मंदिराजवळ ने.” ती म्हणाली.

ती टांग्यात बसली. मंदिराजवळ टांगा आला. ती उतरली. आत भजने चालू होती. अभंग कानांवर येत होते. ती तांब्या व वळकटी घेऊन आत गेली. एका बाजूस बसली. ते अभंग ती ऐकत होती. रात्रभर कोणा ना कोणाचे भजन चालूच होते. अखंड नामसंकीर्तन.

“येई गा तू येई गा तू पंढरीच्या राया ।

तुजवीण शीण वाटे दीन झाली काया ॥”  येई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel