उदय नाशिक शहरात वाढत होता. गंगेत डुंबायला जायचा. पावसाळयात गंगेला पूर यायचे. पोहायची मजा. आई नेहमी सांगायची, “उदय, गंगेवर जात जाऊ नकोस.” परंतु आईची नजर चुकवून तो जायचाच. एकदा तो असाच गेला होता आणि पाण्यात बुडू लागला. एका माणसाने त्याला वाचवले. परंतु शहरात बातमी गेली. ती माता धावत घाटावर आली. तिच्या डोळयांतून गंगायमुना वाहात होत्या. तिने उदयाला जवळ घेतले. मुलाला वाचवणार्याचे तिने आभार मानले. उदयला घेऊन ती घरी आली. त्यालाही आता पाण्याचे भय वाटू लागले. परंतु त्याच्या शाळेतील एक शिक्षक होते. ते मुलांची भीती दवडायचे. ते एके दिवशी उदयच्या आईकडे आले व म्हणाले, “आई, मुलगा येथे रहाणार. पाण्याची भीती नसलेली बरी. गंगेच्या तीरी राहून पोहायला न येणे लाजिरवाणे आहे. पोहण्याची विद्या येत असावी. इंग्रजी विद्येपेक्षा ही महत्त्वाची विद्या आहे स्वत:चे प्राण वाचविण्याची व दुसर्याचेही वाचविण्याची ही विद्या आहे. तुमच्या मुलाला मी शिकवीन. मी बरोबर असेन माझ्यावर विश्वास ठेवा. त्याला पोहोयला पाठवीत जा.”
तुम्ही जबाबदारी घेत असाल तर माझी हरकत नाही. तो माझा एकुलता एक मुलगा आहे हे ध्यानात धरा.”
“ते का मी विसरेन?”
आणि उदय पोहायला जाऊ-येऊ लागला त्याचे ते प्रेमळ शिक्षक त्याला धीर देत आणि पावसाळयातील मोठमोठया पुरांतूनही तो जाऊ लागला. मोठमोठया लाटांतून जाऊ लागला त्या लाटांची नावे त्याला प्रत्यक्ष परिचित झाली. झिप्री लाटेतून जाणे त्याला फार आवडे. गोदावरीच्या फेसाळ पाण्यातून तो आता सहज लीलेने आरपार जाई.
उदय असा वाढत होता.
परंतु आई नाशिक सोडून उदयला घेऊन जळगावला गेली. तेथे एक खोली घेऊन राहू लागली. ती एका श्रीमंत घरात स्वयंपाक करण्याचे काम करण्यासाठी आली होती. उदय जळगावच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागला. खानदेशात उन्हाळा फार. पाय चटचट भाजतात. उदयजवळ ना छत्री ना पायतण. परंतु आईने पुढे छत्री घेऊन दिली. पायतण घेऊन दिले. एके दिवशी उदय छत्री न घेताच शाळेत गेला. आई स्वयंपाक करून घरी आली, तो छत्री कोपर्यातच तिला वाईट वाटले.
“उदय छत्री नेत जा. डोळे बिघडतील.” त्या दिवशी रात्री ती त्याला म्हणाली.
“मला नाही छत्री आवडत. हात मोकळे बरे.”
“आवडायचे काय त्यात? ऊन असते. तुझी मला काळजी वाटते तू माझा एकुलता मुलगा. तू माझा आधार. तुझ्याकडे पाहून मी दिवस कंठिते. तू सुखी असावेस, निरोगी असावेस, शिकून मोठे व्हावेस, असे मला वाटते. म्हणून जप हो बाळ छत्री नेत जा. नेशील ना?”