आईच्या डोळ्यांतील अश्रू पाहून उदय म्हणाला, "नेईन."
उदयचे कपडे फाटले होते. आईने फाटलेले शिवून दिले होते. नवीन कपडे घ्यायला कोठे होते पैसे? एके दिवशी यजमानांच्या पत्नीजवळ उदयच्या आईने सहज गोष्ट काढली.
“आमच्या बंडूचे कपडे तुमच्या उदयला होतील का? दोघे सारखेच आहेत अंगाने. देऊ का त्याचा एक शर्ट, एक कोट?”
“द्या. उदयच्या अंगाला नीट येतील.”
माता ते कपडे घेऊन आली. उदयने अंगात घातले. कोट जरा मोठा होत होता. परंतु आईच्या डोळयांना तो चांगला दिसला. दुसर्या दिवशी ते कपडे घालून उदय शाळेत गेला. उदयच्याच वर्गांत परंतु दुस-या तुकडीत बंडू होता.
उदय हुशार होता. बंडू जरा ढ होता. परंतु श्रीमंताचा मुलगा म्हणून वरच्या इयत्तेत नेहमी ढकलला जाई. आपल्याकडे स्वयंपाक करणार्या बाईचा मुलगा आपल्याहून हुशार असावा याचे बंडूस वैषम्य वाटे. उदयचा पाणउतारा करण्याची संधी तो दवडीत नसे.
“त्या उदयचा कोट बघा. बावळटासारखा दिसतो आहे.” बंडू आपल्या मित्रांना म्हणाला.
“उदय, कोठून आणलास हा कोट? लग्नाचा कोट की काय?”
“अरे, वाढत्या अंगाचा आईने शिवला असेल. म्हणजे पुन:पुन्हा शिवायला नको.”
“त्याची आई आमच्याकडे स्वयंपाक करते.”
“अरे बंडू, मला वाटते हा तुझाच कोट. हा तू नसस का घालीत? याच्या अंगात कसा?”
“माझ्या आईने दिला असेल. याच्या आईने मागितला असेल. आणि या बावळटाने घातला अंगात. हुशार आहे; पण स्वाभिमान कोठे आहे?”
उदयला ती बोलणी सहन झाली नाहीत. तो बंडूच्या अंगावर धावून गेला. उदयने त्याला खाली पाडले. तो नाशिकला असताना कुस्ती शिकला होता.
“कोणाला रे स्वाभिमान नाही? बोल. माझ्या आईचा अपमान करतोस बोलशील पुन्हा?”
असे म्हणून उदय त्याला चापटया मारीत होता. बंडूचे बोलघेवडे मित्र दूर राहिले. इतक्यात घंटा झाली. सारे वर्गात गेले. परंतु प्रकरण मास्तरांपर्यंत गेले नाही.