उदय, तुझे प्रेम मजवर नसेल तर तू सोड मला. परंतु माझे प्रेम मी तुलाच देत जाईन. मनात तू आहेस. तेथे तुला पूजीन. तू स्वत:च्या प्रेरणेशिवाय मजवर प्रेम करू नकोस. माझी तू कीव करीत होतास. तुझे प्रेम नव्हते. करूणा म्हणजे प्रेम नव्हे. केवळ करूणेने माझ्यावर प्रेम नको करू. माझ्याशिवाय तुझ्या जीवनाला अपूर्णता वाटत असेल, मी म्हणजे तुझ्या जीवनाचा एक भाग असे तुला वाटत असेल, तरच तू मजवर प्रेम कर. तुझ्या प्रेमावर मी अतिक्रमण करू इच्छीत नाही. तुझ्या स्वातंत्र्यावर आक्रमण करू इच्छीत नाही.

उदय, तुझ्याशिवाय जगणे मला अशक्य वाटते, तसे तुला वाटते का? वाटले होते का कधी? तू मला माझ्या जीवनाचा एकमात्र आधार वाटतोस. परंतु मीही तुझी आधारदेवता आहे असे वाटले होते का कधी तुला? माझी जर तुला प्राणमय जरूर भासत नसेल, तर तू मला सोडून जा. तुझ्या जीवनात मी अडगळ होऊ इच्छीत नाही. तुझ्यावर माझा बोजा घालण्याची माझी इच्छा नाही. शेवटी तुझे सुख ते माझे सुख.

तुला आठवते का ती गोष्ट? मी तुझ्या खोलीत कधी आल्ये, तुला कधी भेटले, तर तुला सारख्या उदय उदय म्हणून हळूच हाका मारीत असे. एकदा खोलीत आपण बसलो होतो. तू वाचीत होतास. मी तुझ्या खाटेवर बसल्ये होते.  तुझ्या खुर्चीजवळ येऊन “उदय” असे मी म्हणे. तू म्हणस “काय?” परंतु काही न बोलता मी खिडकीशी जाऊन उभी राही. किंवा खाटेवर पुन्हा बसे, जरा पडे. पुन्हा उठून तुझ्याजवळ येऊन “उदय, उदय” असे कावर्‍याबावर्‍या आवाजात मी म्हणत असे. तू शेवटी रागावलास व म्हणालास, “काय ते सांग. नुसत्या हाका काय मारतेस? मी म्हटले, “या हाका का अर्थहीन आहेत?” तू म्हणालास, “होय, तू खेळ करतेस. गंमत म्हणून हाका मारतेस.” मी म्हटले, “आपल्या क्रिया का अर्थहीन असतात, हेतुहीन असतात?” तू म्हणालास, “तुझे हे हाका मारणे तरी अर्थहीन आहे. काय आहे त्यात अर्थ?” मी म्हटले, “उदय, अरे कितीतरी तुझ्याजवळ बोलावेसे वाटते. परंतु नाही रे सारे बोलता येत. ते बोलण्याची भीतीही वाटते. म्हणून नुसती हाक मारते. ती हाक का अर्थहीन? ज्या हाकेत हृदयातील सारा अर्थ भरलेला असतो ती हाक का हेतुहीन? देवाचे वर्णन शेवटी “ओम” ने करतात, तो “ओम” का अर्थहीन? उदय, असा कसा तू उथळ? असा कसा वरवर पाहाणारा? मी उदय म्हणून हाक मारताना माझा आवाज कसा भावनाभरित व सकंप असतो, माझे डोळे कसे असतात,  हे का नाही तू बघत? तुला उदय म्हणून हाक मारताना माझे सारे अंग थरारत असते, बोटे थरथरत असतात. परंतु जाऊ दे. तुला मी नको असेन हाका मारायला तर नाही हो मारणार. जरूर पडली तरच हाक मारीन. जशी तुझी इच्छा.” आणि त्या दिवसापासून त्या भावपूर्ण हाका तुला मी कधी मारल्या नाहीत. तुझ्यादेखत तरी मारल्या नाहीत. परंतु माझ्या खोलीत “उदय रे, उदय, उदय, उदय रे” अशा हाका मी मारीतच असते. माझ्या हृदयातील सारे काही त्यात असते परंतु तुझ्यादेखत नाही ना मारली हाक? का नाही मारली? कारण तुझा आनंद तो माझा. तुला जे नको ते तुझ्या देखत तरी मी करणार नाही.

तू मला विसर. तुझी इच्छा तशी असेल तर मला विसरून जा. मी तुला पहिल्या भेटीतच म्हटले होते की मी अभागिनी आहे. बाबा मला विषवल्ली म्हणतात तेच खरे. उदय, या विषवल्लीला विसर. हिच्यामुळे आपलाही कदाचित सत्यानाश व्हायचा असे तुलाही वाटू लागले असेल. मी तुझ्याजवळ आल्ये हीच चूक. दुरून तुझी प्रेमपूजा मी करीन. अत:पर माझी विषरूप छाया तुझ्यावर पडणार नाही. मी तुझ्याकडे येणार नाही. माझ्या मनात तू आहेस तेवढा पुरे.

उदय, काय रे हे पत्र लिहिलंस? तुला लिहवले तरी कसे? तू का माझी गंमत करीत आहेस? तू का माझी सत्त्वपरीक्षा घेत आहेस? उदय, तुझा होत आहे खेळ; परंतु माझा जातो जीव. नको रे मला निराश करू. तुझ्याजवळ मला घे. मला सदैव हृदयाशी धर. मला तुझी कर. मी आहेच तुझी. तू माझा हो. किती सांगू, किती लिहू? माझे जीवन कृतार्थ कर, हृदय सांगत आहे की, हे पटल जाईल आणि तू उद्या पुन्हा त्या पहिल्या जागी धावत येशील व माझे अश्रू पुसशील. मी वाट पाहीन.

-- तुझीच सरला”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel