“प्राण जाणार नाहीत, येथे निमुटपणे सारे ऐकावे लागते. येथली शिस्त कडक आहे. हट्ट नाही करता कामा. हसले पाहिजे. थोडे गाणे शिकले पाहिजे. थोडे नाचणे शिकले पाहिजे. हावभाव शिकले पाहिजेत. समजले ना? उद्यापासून तुमची शाळा सुरू होईल. मी सांगून ठेवते की, मुकाटयान ऐकत जा. म्हणजे मग सुखाला तोटा नाही. परंतु हट्ट कराल तर मात्र बरे नाही. येथे दोन दिवस लाड होतात. परंतु मागून वेत बसतात. शेवटी रेशमाप्रमाणे मऊ व्हावे लागते. रात्रभर विचार करा. अंगावर फुलांचे हार हवे आहेत. की वेताच्या छडीचा मार हवा आहे? अंगाला सुगंधी चंदन, अत्तरे हवीत, की अंगातून रक्ताची धार सुटायला हवी? विचार करा. पलंगावर सुखाने लोळायला हवे, की उलटे टांगून घ्यायला हवे? एक मुलगी मागे होती; ऐकेना. तिच्या शरीराची कमान करून तिला आडवे टांगले. उलटी करून एका बाजूला केस बांधले व एका बाजूला तंगडया. पाठीवर मोठा दगड ठेवला. शेवटी ती शरण आली. आणि मग सुखात रमली. तुम्ही उगीच आगीतून जाऊ नका. असे सुंदर शरीर देवाने तुम्हांला दिले आहे. सुरेख फूल सर्वांनी हाती धरावे. त्यातच त्या फुलाचे सार्थक. खरे ना? तुमचे सौंदर्य वाढवा. तुमची आजपर्यंत उपेक्षा झालेली दिसते. येथे उपेक्षा होणार नाही. मात्र हट्ट नका करू. कोणी शेटजी आले; हसावे, त्यांना विडा द्यावा. की लगेच हिर्‍याची अंगठी तो बोटात घालील. थोडया वेळाने सोन्याचा हार गळयात घालील. तुम्ही पाहाल. आता झोपा जरा. थकल्या आहात. हा पलंग आहे. गादी आहे. लेप पांघरायला आहे. विचार करा. हे येथे पाणी आहे. रमण, यांना नळ वगैरे सारे दाखवून ठेव. मी जाते.”

असे म्हणून ती बदफैली बाई गेली.

सरला तेथे बसून होती. तिला तेथला प्रकाश सहन होईना. तिने दिवा बंद केला. ती रडत बसली. काय करावे तिला समजेना. तिने मागे दगडावर डोके आपटले होते. परंतु आज डोके फोडायला तेथे चांगलासा दगडही नव्हता ! का ती इतकी दुर्बल व हताश झाली होती, की डोके आपटावयाचीही तिला शक्ती नव्हती? ती असाहाय्य होती ! सारे जीवन तिच्या डोळयांसमोर येत होते. खरेच का मी दुर्दैवी आहे, असे तिच्या मनात येईल.

येथे आपली काय स्थिती होणार? तिच्या अंगावर शहारे आले. येथे का खरेच मारहाण करतील? जुलूम करतील? येथे का मी वारांगना होणार? एक भोग्य वस्तू  होणार? या शरीराचा का हे लोक विक्रा मांडणार? उदय, काय रे तू म्हणशील? तू का खरेच जीव दिलास? तू परलोकात का माझी वाट पाहात असशील? मी तुझ्या पाठोपाठ आल्ये नाही त्याचे का हे बक्षीस? म्हणून का पृथ्वीवरचा हा नरकवास? कसे ती बाई बोले? यांना असे बोलवते तरी कसे? काहीच का यांना वाटत नाही? यांची सारी माणुसकी, सदभिरूची का मेलेली असते? खावे, प्यावे, मजा करावी, एवढेच का यांचे जीवन? परंतु हा का आनंद आहे? जेथे आपले मन असते, आपला जीव असतो, तेथेच आपण खरा आनंद अनुभवू शकतो.

काय हे जीवन ! आणि येथे खरेच मोठमोठे लोक येत असतील. लक्षाधीश येत असतील. प्रतिष्ठित येत असतील. माझ्यासारख्या अभागिनी येथे फसवून आणल्या गेल्या असतील. आणि शेवटी येथील जीवनात पडल्या असतील ! हे किडयाचे जीवन त्यांच्या अंगवळणी पडले असेल ! आणि अशा अनाथ स्त्रियांना फसवून त्यांच्या शरीराचा, अब्रूचा, नीतीचा विक्रा करून काहींनी इस्टेटी कराव्या, बंगले बांधावे ! हर हर ! मानवाचा केवढा हा अध:पात !

ती रडून दमली. या संकटातून कसे मोकळे होता येईल याचा ती विचार करीत होती. परंतु तिला काहीही उपाय दिसेना. तिने देवाचा धावा मांडला. रामा, ये रे, मला वाचवायला. नाशिकचे तू दैवत. माझा उदय तुझ्या या नाशिकमध्ये वाढला. गोदावरीत डुंबला. त्या उदयची मी. माझी अब्रू वाचव. देवा, येऊ दे रे करूणा. माझे अपराध क्षमा कर. उदयला त्याच्या आईकडे मी जाऊ दिले नाही. तिकडे त्याची प्रेमळ माता मरणशय्येवर होती, तरी मी उदयला जाऊ दिले नाही. माता त्याचा जप करीत होती, त्याला हाका मारीत होती. परंतु मी उदयला माझ्या मोहपाशात अडकवून ठेवले. त्याचे का प्रायश्चित? त्या अक्षम्य अपराधाची का ही शिक्षा? ती माता उदय उदय करीत मेली असेल. कोणा चांडाळणीने उदयला मोह पाडला, तिचा सत्यानाश होवो असे तिने शाप दिले असतील ! ते शाप का हे मला भोवत आहेत? परंतु उदय असा मोहग्रस्त असेल असे त्या मातेला वाटलेही नसेल. तिने शापवाणी न उच्चारता, उदय सुखी असो, असेच म्हटले असेल. कोणाच्या संगतीत रमला असला तर तेथेही सुखी असो, असेच तिने म्हटले असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel