वर्णाश्रम-स्वराज्य-संघांची ती प्रांतिक परिषद सकाळी समाप्त झाली. त्या परिषदेतील गोष्टी सर्व शहरभर गेल्या. घरोघर त्यांची चर्चा चालली होती. घाटांवर, बाजारात, शाळांतून, कोर्टकचेरीतून एकच विषय बोलला जात होता. सनातनींच्या परिषदेची अशी फलश्रुती झाली. तिकडे अस्पृश्यांच्या परिषदेची काय होणार?
आज रात्री त्यांची परिषद होती. त्या परिषदेत एक स्वामीही बोलणार होते. कोणते ते स्वामी? त्यांचे नाव सेवकराम असे होते. सेवकराम बोलणार, सेवकराम बोलणार असे शहरभर झाले. कोण हे सेवकराम? कोणाला माहीत नव्हते. कोणी मोठे साधू असावेत असा अनेकांनी तर्क केला. सेवकरामांना पाहण्यासाठी, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, शहरातील स्पृश्य मंडळीही बरीच जाणार होती.
“शेटजी, मी जाऊ का अस्पृश्य बंधूंच्या सभेला? त्यांचा सत्याग्रह होणार असेल तर त्यात आपणही भाग घ्यावा असे मला वाटत आहे. निदान त्यांचे विचार तरी ऐकून यावे असे सारखे मनात येत आहे. जाऊ का?”
“सरलाताई, संकटातून नुकतीच तू मुक्त झाली. पुन्हा नको एकटी जाऊस. कदाचित गुंड टपलेले असतील. तुला पुन्हा पकडतील. उचलून नेतील.”
“मग तुम्ही या माझ्याबरोबर. याल का? तुमच्या जीवनात क्रांती ना झाली आहे? मग चला अस्पृश्य बंधूंकडे. त्यांना किती आनंद होईल ! ते तुमचे स्वागत करतील. येता?”
“तू माझी गुरू आहेस. सरले, आज तू किती सुंदर बोललीस ! जणू तुझ्याद्वारा प्रभूच बोलत होता. कोठून आणलेस हे विचार? कोणी शिकविले?”
“शेटजी, मी महिला महाविद्यालयात शिकत असताना कधी कधी ग्रंथालयात वाचीत बसत असे. रामतीर्थ, विवेकानंद यांची पुस्तके मला आवडत. पुढे उदय भेटला. त्याच्या प्रेमात रंगून गेल्ये. उदयचे प्रेम पुरे, बाकी काही नको असे वाटे. परंतु ते वाचलेले मेले नव्हते. उदयवर केलेल्या प्रेमाने ते वाचलेलेही जणू जीवनात मुरले, अंकुरले. प्रेम जीवनाला ओलावा देते. आणि त्या ओल्या मनोभूमीत वाचलेले वा ऐकलेले विचार अंकुरतात, मोठे होतात. शेटजी, माझा उदय भेटेल का हो? कसे पहाटे सुंदर स्वप्न पडले होते !”
“सरले, तू येणार ना आमच्याकडे. आमच्याकडच्या मुलामुलींना शिकव. आमच्या घरातील देवता हो.”