“खरेच ही फुलझाडे सुकून चालली. मला वाटे, सरलेने पाणी घातले तरच ती सुकतील. मी तिला पाणी घालू देत नसे. मी वेडा आहे. पाणी कोणी का घालीना, पाणी मिळाले म्हणजे झाले. झाडे वाढतात. मी बरेच दिवसात पाणी घातलेच नाही. रमा, चार दिवस पाणी मिळाले नाही तो झाडे बघ कशी दिसू लागली ! कोमेजली ! आणि सरलेला सार्‍या जीवनात प्रेमाचा शब्द मिळाला नाही. मी तिला विषवल्ली म्हणायचा. तिचे मन किती करपून गेले असेल ! तिचे हृदय कसे सुकून गेले असेल ! जळून गेले असेल; नाही?”

“खरेच विषवल्ली होती तुमची सरला. माझे बाळ तिनेच खाल्ले. या बाळाला कधी हात लावू दिला नाही. घरातून तिची धिंडका कोठे गेली ते बरे झाले. बाळ माझा वाचेल. मोठा होईल. शताउक्षी होईल. होय ना रे राजा? बघा, हसला. त्याला सारे समजते.”

विश्वासराव उठले. ते झाडांना पाणी घालत होते. त्यांनी फुलझाडांकडे प्रेमाने पाहिले. झाडांना टवटवी आली. काही फुले फुलली होती. विश्वासराव तेथे विचार करीत उभे होते. सरलेने केसात कधीच फुले घातली नाहीत. मी तिला दोन फुले कधी दिली नाहीत. परंतु पती नसलेल्या मुलींनी का केसात फुले घालायची? परंतु का नाही मी तिचे पुन्हा लग्न करून दिले? का नाही खटपट केली? “बाबा,” कसे दवडू सारे आयुष्य?” असे ती विचारायची. परंतु मी माझ्याच सनातनीपणात ! मी स्वत: लग्न केले. पुन्हा नवा संसार मांडला. आणि ती अभागिनी ! अरेरे ! विश्वासराव त्या फुलांकडे, फुलझाडांकडे पाहात होते. ती फुलझाडे आज त्यांची गुरू झाली होती. इतके दिवस विश्वासराव का त्या झाडांकडे पाहात नसत? परंतु त्या फुलांची भाषा त्यांना आज समजली. वेळ यावी लागते. सारी सृष्टी संदेश देत आहे. परंतु तो संदेश सर्वांना ऐकू येत नाही. ती दृष्टी यावी लागते. ती एकदा आली की अणुरेणू आपला गुरू होतो. आज सरलेच्या खोलीत विश्वासराव गेले होते. खोलीत तिची पुस्तके होती. वह्या होत्या. तिची गादी होती. पांघरूण होते. सारे तेथे होते. तिने जाताना फार काही नेले नव्हते. विश्वासराव ती पुस्तके चाळीत होते. त्यांनी तिच्या वह्या चाळल्या. हे काय आहे एका वहीत? विश्वासराव वाचू लागले. असे वाचावे का? दुसर्‍याचे वाचू नये. आपले कितीही कोणावर प्रेम असले तरी काही गोष्टी अशा असतात की त्या आपण आपल्याजवळच राखू इच्छितो. आपल्या हृदयात असा एक एकान्त असतो, की जेथे फक्त आपणच असतो; फक्त आपणच तेथे असावे असे वाटते. असलाच तर दुसरा परमेश्वर तेथेच असतो. आणि आपली सदसद्दविवेक बुध्दी असते. विश्वासराव, तुम्ही सरलेचे वडील असाल. परंतु तिचे वाचण्याला तुम्हाला अधिकार नाही. आणि तुमच्यासारख्या कठोर पित्याला तर नाहीच नाही. अपरंपार प्रेम करावे व मग दुसर्‍याचे वाचले तर ते थोडे क्षम्य तरी आहे. कारण प्रेमाला द्वैत सहन होत नाही. प्रेम अद्वैत अनुभवू इच्छिते. प्रेमाला दुजेपणा, परकेपणा कसा रुचेल? विश्वासराव, तुमचे आहे का प्रेम? हो आहे. आज तुमचे हृदय कोमल झाले आहे. इतक्या दिवसांत तुम्ही सरलेच्या खोलीत कधी आले नव्हतेत. आज आलेत. तुम्ही सरलेच्या खोलीत नाही आलेत; जणू तिच्याकडे आलेत प्रेमाने तिची वास्तपुस्त घ्यायला, तिचे अश्रू पुसायला, तिच्या केसांवरून हात फिरवायला. होय ना? परंतु कोठे आहे सरला? तिची ती पुस्तके तेथे आहेत. त्या वह्या आहेत बघा ती पुस्तके, बघा त्या वह्या. आज तुम्हाला थोडा अधिकार आहे. वाचा काय आहे तेथे लिहिलेले? प्रेमपत्र का? पवित्र प्रेमपत्र ! काय आहे त्या प्रेमपत्रात? किती वेळ वाचता? अजून नाही संपले? विश्वासरावांच्या डोळयांतून दोन अश्रू घळघळले. तेथील लिहिलेले वाचून का त्यांचे हृदय द्रवले? काय होते तेथे लिहिलेले? मोठे काव्यमय का ते पत्र होते? छे ! तेथे पत्र असे नव्हतेच. मग काय होते? विश्वासराव तर वाचीत आहेत. तेथे एकच शब्द होता. तो एकच शब्द पुन:पुन्हा लिहिलेला होता. इंग्रजीत लिहिलेला होता, मराठीत लिहिलेला होता. लहान अक्षरात लिहिलेला होता. मोठया अक्षरात लिहिलेला होता. त्या एका शब्दाभोवती सरला जणू नाचत होती. त्या एका शब्दाभोवती ती आपल्या भावना गुंफीत होती. त्या एका शब्दाला ती पूजीत होती, नटवीत होती. तो एक शब्द म्हणजे तिचे सरे परब्रम्ह होते. योगीजनांना, वेदान्त्यांना ॐ मध्ये ज्याप्रमाणे सारे विश्वरूप दिसते, त्याप्रमाणे त्या एका शब्दात सरलेचे विश्व होते. पाहा तरी तो शब्द ! किती तर्‍हेतर्‍हेने तिने तो लिहिलेला आहे. कधी कोरून लिहिलेला, कधी नक्षीत लिहिलेला एकच शब्द; परंतु शेकडो रीतीने तेथे चितारलेला होता. कोणता शब्द? तुम्ही ओळखलात? नाही ना? मी सांगू? उदय ! उदय ! उदय हा शब्द तेथे शेकडो वेळा, शेकडो पध्दतींनी लिहिलेला होता. उदय, उदय ! सर्वत्र पानांवर तो एकच शब्द. वर-खाली सर्वत्र त्याच शब्दाचा जयजयकार ! स्वत:च्या जीवनात ओतप्रोत भरलेल्या उदयला सरला जणू कागदावर चितारीत होती. स्वत:मध्ये तिला सर्वत्र उदय दिसत होता. त्यामुळे बाहेरही ती त्यालाच पाहू इच्छीत होती. त्या एका शब्दात तिची सारी शास्त्रे होती, साहित्य होते. त्या एका शब्दात तिचे सारे काव्य होते. उदय, उदय असे तेथे लिहिताना सरलेची जणू समाधी लागली असेल. तिची बोटे थरथरली असतील, डोळे चमकले असतील. तो शब्द लिहिताना ती हसली असेल, रडली असेल, तो लिहिताना तिने पदर सरसावला असेल, उचंबळणार्‍या हृदयाला धरून ठेवले असेल; नाही?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel