“बाबा, त्याचे नाव का प्रकाश?”

“हो, माझ्या निराशेतला तो प्रकाश आहे.”

“आणि आमच्याही जीवनातला तो प्रकाश आहे.”

सरलेने प्रकाशला घेतले. आणि तिचे स्तन दुधाने भरून आले, दाटून आले. हृदयातील सारे वात्सल्य तेथे भरभरून आले. तिने बाळाचे तोंड लावले. आणि बाळाला गोडी लागली. अपार गोडी ! आईच्या दुधाची सर कशाला आहे? सारी अमृते त्याच्यापुढे फिकी आहेत ! तो अपार पान्हा बाळ पीत होता. मध्येच मातेच्या मुखाकडे पाहात होता. आणि तोंडातील दूध बाहेर गळे.

“पाहतोय काय राजा? तुझी आईच हो मी. पी पोटभर. आठ महिन्यांचे पारणे फेड. ओळखलीस का आई? हसतोस काय? उदय बघ तरी किती हसतो आहे तो !”

बाळराजा ते भरलेले मातृस्तन रिते करीत होता. परंतु रिते होत ना. त्याचे पोट भरले. आईच्या मांडीवर सुखाने पडून राहिला.

“उदय, तू घेतोस याला? घे.”

उदयने बाळाला जवळ घेतले. हृदयाशी धरले. त्याचे त्याने मुके घेतले.

“उदय तुझी दाढी असती तर बाळ भ्याला असता. बरे झाले त्याच दिवशी काढलीस म्हणून. प्रकाश, तुझे बाबा हो ते. हे माझे बाबा, आणि हे तुझे बाबा.”

विश्वासराव खाली पाणी घालायला गेले. उदयजवळ प्रकाश होता. सरला खाली गेली.

“बाबा, मी घालू पाणी?”

“घाल हो, तू विषवल्ली नाहीस, तू अमृतवल्ली आहेस. प्रेमगंगा आहेस. पुण्यमूर्ती आहेस. परंतु अजून नीट उजाडले नाही. जा जरा पड. रात्रीचे जागरण असेल. बाळाला कुशीत घेऊन पड.”

“आता नाही झोप येणार. आणि बाळ का आता झोपणार आहे?”

आनंदी आनंद झाला. सरलेने आज केसांत फुले घातली. किती सुंदर दिसत होती ती ! घरात आनंद होता. सरलेने सुंदर स्वयंपाक केला. जेवणे झाली. दुपारी फोनो लावण्यात आला. बाळ सारखा प्लेटी ओढीत होता, पिना फेकीत होता.

“किती रे राजा तुझी गडबड ! बाबा, तुम्हांला हा आवरता येई का?”

“आई आली म्हणून आज फारच ऐटीत आहे स्वारी !”

आणि मग सारी झोपली. पाळण्यात प्रकाशही झोपला.

सायंकाळी उदय नि सरला बाळाला घेऊन फिरायला गेली. त्या कालव्याच्या काठावर दोघे बसली. जुन्या आठवणी झाल्या. तो दगड तेथे होता.

“उदय हा बघ तो दगड.”

“ज्या दगडाने तुझी-माझी गाठ घातली तो प्रेमळ दगड. प्रणाम या दगडाला.”

“आणि तू माझ्या पदरावरचा मुंगळा उडवला होतास. आठवते का? आणि तुला ताप आला होता. मी तुझा हात धरून तुला नेले. आणि ती रात्र. घामाने आपण डवरलो होतो. प्रेमाने फुललो होतो. तापातून प्रेम फुलले. आठवते का?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel