विश्वासरावांचे जेवणखाण झाले. तेही जरा पडले. बाळ आता त्यांची करमणूक होता. पूर्वीच्या बाळाची खेळणी होती. ते त्या लहानग्यास खेळवीत बसत. खुळखुळा वाजवीत. बिडकुळी एकावर एक रचीत. बाळ पटकन उधळून हात लावी. आणि ती सारी बिडकुळी पडत. विश्वासराव पुन्हा रचीत. असा खेळ चाले. सायंकाळी नातवाला खांद्याशी धरून ते फिरायला जात. त्याला मोटार दाखवीत, सायकल दाखवीत, घोडा दाखवीत, पाखरे दाखवीत. दिवे लागायच्या सुमारास ते घरी येत. बाळाला दूध पाजीत, तेही दूध पीत. ते एकदाच जेवत. रात्री फलाहार करीत. दूध घेत. बाळाला जवळ घेऊन रामरक्षा म्हणत, स्तोत्रे म्हणत, अभंग म्हणत. त्याला पाळण्यात घालून आंदुळीत. तोंडाने गाणी म्हणत. ओव्या म्हणत.

बाळाचे नांव त्यांनी प्रकाश ठेवले. अंधारात आलेला प्रकाश ! निराशेत आलेला प्रकाश ! उदयने आणलेला प्रकाश !

“प्रकाश, अरे प्रकाश ! केव्हा येतील तुझे बाबा? केव्हा येईल तुझी आई? केव्हा तुला घेतील, नाचवतील? येऊ दे लौकर. येतील ना? लौकर बोलायला शीक, चालायला शीक. आई, बाबा म्हणायला शीक. नाहीतर मी शिकवले नाही असे म्हणतील हो.” असे मुलाजवळ बोलत बसायचे. एखादे वेळेस प्रकाश रडू लागला म्हणजे घाबरायचे. म्हणायचे. “तुला का आईची आठवण झाली? तुझी आई येणार असेल तर रडे थांबव.”

“थांबले रडे. येणार सरला. अरे पुन्हा रडायला लागलास. उगी उगी. नको रडू. उगी उगी. हात रे !” असे ते म्हणायचे. कधी सायंकाळी त्याला दिवा दाखवून “अडगुलं मडगुलं” म्हणायचे. कधी तिसरे प्रहरी त्या लहानग्याचा हात आपल्या हातात घेऊन “काऊकाऊ चिऊचिऊ, येथे बस; दाणा खा; पाणी पी; आणि बाळाच्या डोक्यावरून भूर्रकन उडून जा” असे म्हणायचे. कधी “लवलव साळुबाई मामा येई, हाती खोबर्‍याची वाटी देई, तिकडून येई घार, नि उचलून नेई” असे म्हणायचे.

अशा रीतीने विश्वासराव त्या आनंदमूर्तीला, त्या प्रकाशाला वाढवीत होते, त्यांचा वेळ केव्हाच जाई. त्यांना आता कंटाळा येत नसे. कधी कधी एकच विचार त्यांच्या मनात येई व तो हा की आपले डोळे मिटण्यापूर्वी बाळाचे आईबाप येवोत. त्यासाठी ते देवाची प्रार्थना करीत.

कधी सरलेच्या वह्या, पुस्तके ते बाळाला दाखवीत.

“तुझ्या आईची ही पुस्तके. येतात का वाचता? या बघ वह्या. हे बघ तुझ्या बाबांचे नाव. उदय, उदय. कितीदा लिहिले आहे? अरे, फाडू नको. तुझी आई रागावेल हो.”

अशा त्या दोघांच्या करमणुकी किती सांगाव्या ! कल्पनेनेच त्या मनात जाणाव्या, सहृदयपणे जाणाव्या. नाही का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel