उदय निघून गेला. सरला खोलीतच होती. किती तरी वेळ शांतपणे तेथे ती बसली होती. त्या उशीवर तिने डोके ठेवले. आणि खरोखरच पांघरूण घेऊन जरा पडली. परंतु झोप थोडीच येणार? तिची झोप उडून गेली होती. ती उठली. टेबलावरच्या वह्या-पुस्तके ती पाहात होती. एका वहीत तिला एक पत्र सापडले. कोणी कोणाला लिहिले होते? उदयने ते लिहिले होते. सरलेला लिहिले होते. वाचू का हे पत्र? मलाच लिहिले मी वाचले म्हणून काय झाले? का उदय रागावेल? उदय नि मी का दोन आहोत? त्याने माझी जखम बांधली त्याच वेळेस आम्ही दोघे एकत्र नाही का बांधलो गेलो? दुजेपणा ! नको हा दुजेपणा. मला एकरूप होऊन जाऊ दे. उदयचे ते सारे माझे होऊ दे. माझे ते सारे त्याचे होऊ दे. ते पत्र हातांत घेऊन ती विचार करीत बसली. काय होते त्या पत्रात? वाचायला हरकत नाही. ते निर्मळ, उदार पत्र आहे.

“सरले,

तुला काय म्हणावे समजत नाही. तुला प्रिय वगैरे विशेषणे मी लावीत नाही. ही विशेषणे अलीकडे अर्थहीन झाली आहेत. औपचारिक झाली आहेत. तू एकाकी आहेस. मीही एकाकी आहे. मलाही ना कोणी मित्र, ना सखासोबती. आईशिवाय मला कोणी नाही. माझ्या हृदयातही काही भाग रिकामे होते, शून्य होते ते भरून काढायला का तू आलीस? किती अकल्पित भेट, आणि कशा दु:खद प्रसंगी ! आपण खरेच का एकमेकांची झालो आहोत ! त्या बाभळीच्या झाडाखाली खरेच का आपले लग्न लागले? आपणांस संकोच जणू वाटला नाही. आणि पुन्हा भेटलो तेव्हा अत्यंत ओळख असल्याप्रमाणे आपण बोलत बसलो.

तू अत:पर दु:ख करीत नको जाऊस. सुखी राहा. आशेने राहा. आपण एक दिवस खरेच एकमेकांची होऊ. एकमेकांच्या जीवनात आनंद पिकवू.

परंतु उदय गरीब आहे. माझ्या भावनांची श्रीमंती अतूट आहे. अलूट आहे. ती अद्याप कोणी लुटली नाही. ती संपत्ती हृदयात वाढतच होती. तिचा वारसा कोणाला मिळणार मला कळत नव्हते. त्या भावनालक्ष्मीची तू का स्वामिनी होणार? माझ्या हृदयात हळूहळू उमलणार्‍या भावनांच्या सहस्रदळी कमळाची भेट तुला का मिळायची आहे?

हे पत्र मी तुला लिहीत आहे. राग नको हो मानू. मनातले सारे लिहिताही येत नाही. मनातले भाव प्रकट करायला भाषा अपुरी पडते. एका शब्दानेही सारे समजते. खरे ना?

-तुझा उदय.”

ते लहानसे पत्र होते. सरलेने ते हृदयाशी धरले, डोक्यावर धरले, हृदयात खुपसले. ती सद्गदित होऊन तेथे बसली. हे पत्र आपण न्यावे व याचे उत्तर येथे लिहून ठेवावे असे तिच्या मनात आले. तिने कागद घेतला. टाक घेतला. ती लिहू लागली :

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel