“मी एक अभागिनी आहे. मला अधिक विचारू नका. दु:खाला जास्त खणू नये. जखमेला टोचू नये.”
“परंतु जखम बरी व्हायला हवी असेल तर?”
“काही जखमा दु:ख देणार्या असल्या तरीही त्या बर्या होऊ नयेत असे वाटत असते. काही दु:खे आपण विसरू इच्छीत नाही. ती सदैव ताजी असावीत, हिरवी असावीत असे वाटते. द्या ती उशी. मी पडते.”
“तुम्ही का माझ्या उदयच्या?”
“उदय का तुमचा आहे?”
“नाही, मी त्याच्यासाठी घरदार सोडले नाही. मी दुसर्याला माळ घातली. परंतु तो तुमचा आहे का?”
“हो. त्याच्यासाठी मी घरदार सोडले आहे. त्याला धुंडीत आहे. कोठे आहे तो? त्याला मी मनाने वरले आहे. त्याने मला वरले आहे. कोठे आहे तो?”
“जळगावला आपण त्याचा पत्ता काढू. त्याची स्मृती गेली आहे. मामा त्याला घेऊन गेले आहेत. परंतु कोणते गाव ते मला माहीत नाही. जळगावला कळेल. उदयची आई ज्या खोलीत राही, त्या खोलीच्या शेजारच्या लोकांना माहीत असेल. आपण काढू पत्ता. म्हणून वाटते तुम्ही नागपूरकडे जात आहात? म्हणून वाटते तुम्ही त्या स्वयंपाकीणबाईची चौकशी केलीत? हो ना? आता पाहू तुमचे डोळे? पुण्याकडून येताना म्हणालात, “माझे डोळे बघा प्रेम केल्यासारखे ते वाटतात का बघा.” बघू दे.”
असे म्हणून नलीने सरलेकडे प्रेमाने पाहिले. सहानुभूतीने पाहिले. सरलेचा हात तिने हातात घेतला.
“तुमच्या उदयची स्मृती गेली असली तर?”
“मला पाहताच त्याला स्मृती येईल. परंतु तो भेटला पाहिजे. दिलसा पाहिजे. तुम्ही त्याची व माझी भेट करवा.”
“मी कशी करवू भेट? बघू पत्ता कळला तर.”
“नलू, तू उदयचे नुसते डोळे पाहिलेस. मी त्याचे सारे जीवन पाहिले. अंतर्बाह्य पाहिले. नुसते पाहिले नाही, तर चाखले. माझा अणुरेणू त्याने व्यापला आहे. तुम्हाला काय सांगू?”
“तुम्ही भाग्यवान आहात.”