त्या दिवशी उदयने ते पत्र पोस्टात टाकले. परंतु मग वाचनात त्याचे लक्ष लागेना. तो कॉलेजमध्येही गेला नाही. घरीच पडून राहिला. उशीखाली तो रूमाल होता. त्यावर तो वेल होता. त्यावर ती दोन पाखरे होती. त्याच्या डोळयांसमोर सरला दिसत होती. तिची किती निराशा होईल ! ती जीव तर नाही देणार? असे सारखे त्याच्या मनात येत होते. मी अभागिनी आहे हे तिचे शब्द त्याला आठवले. त्याला चुटपुट लागली. आपण काहीतरीच केले असे त्याला वाटले. माझे वैराग्य का कायमचे आहे? असे क्षण येतात. विषण्णतेचे, शून्यतेचे. सरला या अर्थानेच सारे घेईल का? हा काही बरेवाईट करून घेईल? तो अधिकच अस्वस्थ झाला.

सायंकाळी त्या कालव्याच्या काठी तो गेला. आज तेथे कोणी नव्हते. त्या जागी तो बसला. त्याच्या डोळयातून पाणी आले. ज्या दगडावर सरलेने डोके आपटले होते तो दगड तेथे होता. दुर्दैवी, दु:खी मुलगी ! मी पुन्हा तिची प्रखर निराशा केली. कोणाची निराशा करणे केवढे पाप ! कोणाच्या जीवनात आशा, आनंद, उत्साह न ओतता आला तर निदान दु:ख, निराशा तरी तेथे ओतू नये. जगाचे दु:ख कमी करता येत नसले तर निदान त्यात भर तरी घालू नये.

तेथे तो बसला होता. आणि आता एकदम गार वारा सुटला. ढग भराभर येऊ लागले. गडगडाट होऊ लागला. पाखरांची धावपळ सुरू झाली. उदय तेथेच होता. आणि टपटप पाऊस येऊ लागला. मोठमोठे थेंब. वारा आणखी सुटला. पावसाला जोर चढला. उदय तेथेच होता. पाऊस पडत होता. उदयचे डोके शांत करीत होता. आणि हृदय आत बोलत होते. काय बोलत होते?

“त्या पहिल्या भेटीच्या वेळेस असाच झिमझिम पाऊस पडत होता आणि सरला म्हणाली, “ये माझ्या छत्रीत.” मी दूर होतो. आज तिच्या किती जवळ गेलो आहे ! दोन महिन्यांत शेते वाढली. पीक वाढले. उगीच काही तरी मी लिहिले ! मी सरलेला विसरणे अशक्य आहे. ते प्रेम मी कसे विसरू? आमच्या भेटींनी, बोलण्यांनी, शतप्रकारांनी ते प्रेम रुजले, वाढले, बहरले, ते का मरेल? ते का नाहीसे होईल?”

उदय उठला. त्याचे केस निथळत होते. तो ओलाचिंब झाला होता. वाटेत त्याने एक टांगा केला. तो खोलीवर आला. त्याने कपडे बदलले. त्याला एक प्रसंग आठवला. एकदा सरला उजाडत फिरायला गेली होती. ती पावसात सापडली. आणि मग भिजत माझ्या खोलीवर आली. ती गारठली होती.

“सरले, भिजलीस ना?”

मग काय करू? दुसरे काही बदलायला दे.”

“येथे का पातळ आहे, लुगडे आहे?”

“तुझे धोतर दे.”

“धोतर कसे पुरेल?”

“मी गोल नेसेन. गुजराती पध्दतीचे. दे धोतर आणि तू जा. मी लुगडे जरा खोलीत वाळत टाकीन. तुझे थोडा वेळ धोतर गुंडाळीन. आणि तुझे पांघरूण घेऊन पडेन. मी खरेच गारठून गेल्ये आहे. दे धोतर नि तू जा.”

आणि मी धोतर देऊन गेलो. वाचायला गेलो. सरला येथे झोपली. मी परत आलो तो झोपलेलीच. मी तिला उठवले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel