उदय अशा निरनिराळया विचारस्थितींतून जात होता. जीवनाकडे निरनिराळया दृष्टींनी पाहात होता. मध्येच तो कविहृदयाचा होई. सारे त्याला रमणीय वाटे. सरलेचे अश्रू त्याला आठवत. ते पावसातील भिजणे त्याला आठवे. तो रूमाल व त्यावरची ती पाखरे ! त्याच्या डोळयांसमोर सारे येई व तो कौतुकाच्या, स्नेहाच्या, सौंदर्याच्या भावनांवर नाचे. तो मध्येच संतवृत्तीचा होई. त्याला सारे सुंदर व मंगलच मग दिसे. संताला सर्वत्र मांगल्य दिसते. आणि मध्येच तो वीरवृत्तीचा होई. संकटे आली तर झगडू. आपण बहिष्कृत झालो तर? आईने मला दूर केले, सरलेला तिच्या पित्याने हाकलून दिले तर? काही हरकत नाही. आम्ही निर्भयपणे व निर्मळ मनाने नांदू. टीकांना जुमानणार नाही. परंतु त्याची ती कविवृत्ती, ती संतवृत्ती, ती वीरवृत्ती त्या सार्‍या लुप्त होत. आणि मग त्यांच्या दृष्टीला सारे कुरूप व हीन दिसू लागे. “कसले काव्य नि कसले काय ! कसली प्रेमाची दिव्यता व मधुरता ! आम्ही जणू भोगी किडे बनलो. सारासार विवेक बाजूला ठेवला. वासनांचे गुलाम बनून आम्ही परस्परांस मिठया मारल्या. आम्ही खोल गर्तेत पडलो. चिखलात बरबटलो.” आणि असे विचार मनात आले म्हणजे तो कावरा-बावरा होई. खरेच का आपण नि:सार आहोत? सरलेच्या व माझ्या प्रेमात केवळ का विषयताच आहे? त्या प्रेमात आसक्ती असेल; परंतु केवळ का आसक्तीच आहे? तेथे उदारता, सहानुभूती, त्याग, एकमेकांत मिळून जाण्याची वृत्ती हे नाही का? यांना का काही अर्थ नाही? सायंकाळच्या निर्मळ प्रकाशापेक्षा काळया मलिन ढगांवर पडलेला प्रकाश अधिकच सुंदर दिसतो. आसक्तीच्या मलिन पार्श्वभूमीवरील प्रेम हे रमणीयतर आहे. सारे आरंभ क्षुद्र असतात. परंतु त्यांतूनच पुढे महनीयताही प्रकट होते. या आसक्तिमय प्रेमातूनच विशुध्द प्रेमाचा संभव होईल.

माझ्या जीवना ! तुझा मी तिरस्कार करीत नाही. तुझ्यातील भल्या-बुर्‍याला मला मिठी मारूदे. सारे चाखू दे. पाहू दे. हे सारे माझे आहे. वासना माझ्या. विचार माझे. मांगल्य माझे. सर्वांचा मला समन्वय करू दे. अविरोध करू दे. उदय, असा गांगरून नको जाऊस. जे जे तुझ्यात आहे, त्याचा मेळ घालायला शीक. सर्वांना नीट जागा दे. घाबरू नकोस.

अशा विचारात उदय होता. त्याने ट्रंकेतून एक पुस्तक काढले. त्याला का वाचायचे होते? त्या पुस्तकात काही तरी होते. ते तो पाहात होता. काय होते त्यात? तेथे सरलेचा व त्याचा फोटो होता. त्या फोटोकडे तो पाहात होता. आणि त्याने डोळे मिटले. आईचा फोटो हवा काढायला. मायलेकरांचा फोटो. परंतु आई असेल का? गेली असली तर? मग कोठला फोटो? परंतु आई असेल. या बाळाला, तिच्या लाडक्या उदयला आशीर्वाद दिल्याशिवाय ती जाणार नाही. असे विचारकल्लोळ उठत होते. नि कल्याण स्टेशन आले, तो उतरला. तो त्याला तेथे कोण दिसले? ज्यांच्याकडे आई स्वयंपाक करी त्यांच्याकडील ती सारी मंडळी तेथे होती. बंडू होता, नली होती, त्यांची आई होती, त्यांचे वडील होते. इतर मंडळी, गडीमाणसे, सारी होती.

“काय रे उदय?” बंडूने विचारले.

“तुम्ही कोठे चाललात सारी?” त्याने विचारले.

“नलीच्या लग्नाला.”

“माझी आई कशी आहे?”

“अत्यवस्थ आहे. माझी आई परवा भेटून आली होती. तुझी आई सारखी तुझी आठवण काढीत आहे.

“उदय, आई आजारी होती तरी कोठे रे होतास?”

“मी माझे लग्न लावीत होतो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel