सरलेचा पत्ता नव्हता. तिने खरोखरीच जीव दिला की काय? आणि तिचा उदय, त्यानेही जीव दिला असेल का?  विश्वासराव एकटे बसले म्हणजे त्यांच्या मनात हे विचार सारखे येत. एके दिवशी रात्री ते उठले. त्यांना अलीकडे झोप फारशी येत नसेच. ते गच्चीत बसले होते. विचार करीत होते. त्यांना तेथे समोर कोणी दिसत का होते? ते टक लावून पाहात होते. कोण होते तेथे? त्यांना तेथे सरलेची आई दिसत होती. सरलेला तिने पोटाशी घेतले होते. माता मुलीचे अश्रू पुशीत होती. विश्वासरावांकडे बघून ती नुसती दु:खाने मान हलवी. सरलेची काय दशा केलीत असे जणू सुचवी. विश्वासराव उठले. त्यांनी डोळे मिटून घेतले. पुन्हा सभोवती पाहिले. सारा भास ! ते मोठयाने हसले. परंतु पुन्हा गंभीर झाले. कोणी तरी अगदी जवळ येऊन आपणास स्पर्श करणार असे त्यांना वाटले. ते थरकले, चरकले. ते मागे सरले. ते घाबरले. ते खाली गेले. खाटेवर पडले. त्यांनी डोक्यावर पांघरूण घेतले. परंतु मनातील भुते दिसल्याशिवाय का राहतील? डोळयांवरून दहा पांघरूणे घेतलीत तरी ती दिसायचीच.

“उठता ना? चहा तयार आहे.” रमाबाई म्हणाल्या.

“किती वाजले?”

“साडेसात वाजतील. निजायचे तरी किती? लोक हसतील ! बाळसुध्दा कधीच उठला.”

“मला रात्रभर झोप नाही आली. पहाटे जरा डोळा लागला.”

“का बरे?”

“आपल्या मुलीचे, तिच्या पतीचे प्राण घेणार्‍यास का झोप येईल? मी तीन खून केले आहेत. सरला, तिचा उदय व सरलेच्या पोटातील बाळ. अरेरे ! कशी येईल झोप? रात्री मला सरला व तिची आई सारखी दिसत होती. तिने सरलेला जवळ घेतले होते. सरलेचे अश्रू ती पुशीत होती. आणि माझ्याकडे पाहून मान हलवीत होती. काय केलेत असे जणू सुचवीत होती.”

“सारे मनाचे खेळ ! उठा.”

विश्वासराव उठले. त्यांनी शौचमुखमार्जन केले. त्यांनी चहा घेतला. बाळ हसत होता. खेळत होता. माता कौतुक करीत होती. “कसा खेळतो आहे ! पाय कसे नाचवीत आहे ! बघा तरी ! लबाड कुठला ! लौकर उठायला हवे ! चांगले झोपायचे तो उठला !”

“रमा, मी जरा बाहेर जाऊन येतो.”

“कोठे जाता? त्या झाडांना पाणी घाला. सुकून चालली फुलझाडे. अलीकडे तुमचे लक्षच नाही कशात. तुमची चर्याही काळवंडलेली दिसते.”

“खरेच ही फुलझाडे सुकून चालली. मला वाटे, सरलेने पाणी घातले तरच ती सुकतील. मी तिला पाणी घालू देत नसे. मी वेडा आहे. पाणी कोणी का घालीना, पाणी मिळाले म्हणजे झाले. झाडे वाढतात. मी बरेच दिवसात पाणी घातलेच नाही. रमा, चार दिवस पाणी मिळाले नाही तो झाडे बघ कशी दिसू लागली ! कोमेजली ! आणि सरलेला सार्‍या जीवनात प्रेमाचा शब्द मिळाला नाही. मी तिला विषवल्ली म्हणायचा. तिचे मन किती करपून गेले असेल ! तिचे हृदय कसे सुकून गेले असेल ! जळून गेले असेल; नाही?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel