८७. “ परंतु त्यांची प्रकृति बिघडत गेली. राजवैभव, अलंकृत स्त्रिया, उत्तम घोडे जोडलेले रथ, चांगलीं घरें इत्यादि उपभोग्य वस्तूंचा ब्राम्हणांना लोभ सुटला. त्यांनी मंत्र तयार करून ओक्काक राजाला यज्ञ करण्यास सांगितलें. तेव्हां राजानें अश्वमेध, पुरुषमेध, वाजपेय इत्यादि यज्ञ केले...

८८. “ पुढें या ब्राम्हणांनी लोभवश होऊन ओक्काक राजाला गोमेध करण्यास लावलें. मेंढ्यांसारख्या गरीब गाईंना ओक्काक राजानें शिंगें पकडून यज्ञांत ठार केलें. जेव्हां गाईंवर शस्त्रपात झाला, तेव्हां देव, पितर, इंद्र, असुर आणि राक्षस या सर्वांनी अधर्म झाला अशी एकच आरोळी ठोकली. पूर्वी इच्छा, भूक व जरा हे तीनच रोग असत. परंतु पशुयज्ञाला सुरुवात झाल्यापासून ते अठ्ठ्याणव झाले.....

८९. “ जेथें अशी गोष्ट होते, तेथें लोक याज्ञकाची निंदा करतात. या रीतीनें धर्माचा विपर्यास झाल्यामुळें शुद्र व वैश्य हे निरनिराळे झाले. क्षत्रियहि निराळे पडले; आणि पत्‍नी पतीची अवगणना करूं लागली. क्षत्रिय व ब्राम्हण यांना गोत्राचें रक्षण असे (ते कुलधर्माप्रमाणें वागत). परन्तु (पशुवधानंतर) कुलप्रवादाचें भय सोडून ते लोभवश झाले.”

९०. या सुत्तावरून असें अनुमान करतां येतें कीं, गंगायमुनेच्या प्रदेशांत एका काळीं पशुयज्ञ करीत नसत;  साधें अग्निहोत्र पाळींत असत. कृष्णाच्या कथेवरूनहि या अनुमानाला बळकटी येते. परिक्षित् राजानें पशुवधाची प्रथा प्रथमतः सुरू केली असावी. ओक्काक म्हणजे इक्ष्वाकु समजला जातो. तो परिक्षित् नव्हे. पण सुत्तकर्त्याला कोणी तरी एक राजा पाहिजे होता; व परिक्षिताचें नांव त्याला माहीत नव्हतें. तेव्हां त्यानें इक्ष्वाकूचें नांव या सुत्तांत घातलें असावें. एवढी गोष्ट खरी कीं, परिक्षित् व त्याचा मुलगा जनमेजय यांनी प्रथमतः ब्रम्हावर्तांत यज्ञयागांचें स्तोम माजवलें. असें नसतें तर अथर्व वेदांत व तदनंतरच्या वैदिक वाङ्मयांत या दोन राजांना इतकें महत्त्व मिळालें नसतें. त्यांच्या प्रयत्‍नांमुळें पूर्वीची साधी संस्कृति लोप पावली, व ही यज्ञयागांची भपकेदार नवी संस्कृति ब्राम्हावर्तांत दृढमूळ झाली.

९१. या नवीन संस्कृतीमुळें वरील सुत्तांत म्हटल्या प्रमाणें ब्रम्हावर्ताची अवनति झाली असें समजण्यास विशेष आधार नाहीं. पूर्वीची संस्कृति खरोखरच बळकट असती, तर तिनें ह्या नव्या संस्कृतीशीं टक्कर देऊन तिचा पराजय केला असता. दुसरें असें कीं, यज्ञयाग करणार्‍या ब्राम्हणांबद्दल बुद्धकाळीं जो सर्वत्र आदर होता तो दिसला नसता. त्या काळीं शिक्षणाचें सर्व काम ब्राम्हणांच्या हातीं होतें. केवळ वेद शिकवण्याचेंच नव्हे, तर धनुर्विद्या, वैद्यक इत्यादि विद्या शिकवण्याचें कामहि ब्राम्हणच करीत असत. ब्राम्हणांचीं जिकडे तिकडे गुरुकुलें असत व त्यांत शेंकडों विद्यार्थी अध्ययन करीत असत. तक्षशिला येथील विश्वविद्यालयांत बहुतेक सर्व आचार्य ब्राम्हण होते. ब्राम्हणांच्या गुरुकुलांची व तक्षशिला येथील आचार्यांचीं वर्णनें जातक अट्ठकथेंत जिकडे तिकडे सांपडतात. या आचार्यांचें राजे लोकांवर देखील किती वजन असे, हें खालील गोष्टीवरून दिसून येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel