२१. सतराव्या शतकांत इंग्लंडांतील मध्यमवर्गीय लोकांची फार जागृति झाली. पोर्तुगाल, स्पेन व त्यांच्या मागोमाग हालंड या देशांनी आघाडी मारल्याचें त्यांना दिसून आलें; व ह्या नवीन शर्यतींत तेहि शिरलें. ह्याच वेळीं चार्ल्स राजानें युरोपांतील राजकारणांत ढवळाढवळ करून इंग्लंडची आर्थिक परिस्थिति बिकट केली. वृद्धिंगत होणार्‍या मध्यमवर्गाला हें त्याचें कृत्य आवडलें नाहीं; व त्यामुळें पार्लमेंटाचा व त्याचा झगडा सुरू झाला. सरते शेवटीं पार्लमेंटानें चार्ल्स राजाची चौकशी करून १६४९ सालीं त्याचा उघडपणें शिरच्छेद केला. हें कृत्य अर्थातच युरोपांतील अन्य राजांना आवडलें नाहीं. परंतु त्यांच्यामध्यें फुटाफूट असल्यामुळें व पार्लमेंटाला आपला पक्षपाती क्रॉमवेलसारका शूर योध्दा मिळाल्यामुळें युरोपांतील राजांना इंग्लंडला शह देणें शक्य झालें नाहीं.

२२. ह्या वेळेपासून इंग्लंडांत जेव्हां जेव्हां राजा आणि मध्यमवर्ग यांच्यामध्यें विरोध उत्पन्न झाला, तेव्हां तेव्हां मध्यमवर्गाचा जय होऊन क्रमश: राजाचे अधिकार एकसारखे कमी होत गेले. तथापि इंग्लंडला प्रजासत्ताक राज्य स्थापणें इष्ट वाटलें नाही. वसाहती व काबीजादी यांच्यासाठीं एक नामधारी राजा पाहिजे होता. इतर राष्ट्रांशीं पत्रव्यवहार करण्यांत आणि वसाहतींतील व जिंकलेल्या मुलुखांतील लोकांवर पूर्ण ताबा मिळविण्यांत त्याचा उपयोग होत असे. अमेरिकेंतील संस्थानांनी जेव्हां स्वातंत्र्याचा झेंडा उभारला, तेव्हां पार्लमेंटाने तिसर्‍या जॉर्ज राजाला इरेस घातलें. त्याचा परिणाम पार्लमेंटाला चांगलाच भोंवला; व तेव्हांपासून अशा रीतीनेंहि राजाचा उपयोग करण्यास मध्यमवर्गीय लोक जरा कचरूं लागले. तरी हिंदुस्थान आणि इतर जिंकलेले मुलुख यांच्यासाठीं एक राजा असणें फार सोयीवार वाटल्यामुळें त्यांनी आपली राजसंस्था आजपर्यंत तशीच कायम ठेवली आहे.

२३.  इ. स. १८५७ सालच्या बंडांत या राजसंस्थेचा इंग्रजांना चांगला उपयोग झाला. महाराणी व्हिक्टोरिया हिच्या नांवानें गोड गोड अभिवचनें देऊन हिन्दी लोकांचें त्यांना समाधान करतां आलें. पार्लमेंटानें कांही चुका करून घोटाळा उत्पन्न केला असतां अशा रीतीनें त्यांतून पळ काढण्याला इंग्रजी मुत्सुद्दयांना ही राजसंस्था फार उपयोगी पडते. अमेरिकेमध्यें घराला आग लागली असतां बाहेर निघून जाण्याला मागल्या बाजूला लोखंडी शिड्या लावून ठेवलेल्या असतात. ज्या घरांना अशा शिड्या नाहींत, त्या घरांतील बहुतेक खोल्यांतून एक एक दोरखंड ठेवलेलें असतें. घराला आग लागली असतां खोलीतील एका लोखंडी कोयंड्याला तें टांगून त्याच्या आधारें खिडकीवाटे खालीं उतरतां येतें. इंग्लंडांतील राजसत्तेचा इंग्लिश धनिक लोकांना असाच उपयोग होतो. त्यांच्या चुकांनी जेव्हां कांहीं तरी विलक्षण प्रसंग गुदरतो, तेव्हां ह्या राजसत्तेच्या शिडीच्या किंवा दोरीच्या द्वारें ते पळ काढतात!

२४. इंग्रजांवर अलीकडच्या काळांत आलेला अशा तर्‍हेचा प्रसंग म्हटला म्हणजे वंगभंगाचा होय. लॉर्ड कर्झन यांनी राजकारणांत हिंदूंचें महत्त्व कमी करण्यासाठीं वंगभंगाची युक्ति काढली. पण त्यामुळें बंगाल्यांतच नव्हे, तर हिंदुस्थानांतील इतर प्रांतांतहि भयंकर चळवळ माजून राहिली. ही चळवळ इंग्रजांना दाबतां आली नसती असें नाहीं. परंतु युरोपच्या क्षितिजावर लढाईचीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं होतीं; व तिचा उदय होण्यापूर्वीं वंगभंगानें उत्पन्न केलेल्या घोटाळ्यांतून पार पडणें अत्यावश्यक होतें. अशा वेळीं पंचम जॉर्ज राजाचा किती चांगला उपयोगा झाला! त्याला दिल्लीला आणवून इंग्रजांनी वंगभंग रद्द केला, व हिंदुस्थानांत शांतता स्थापन केली.

२५. तात्पर्य, धर्मसत्ता काय कीं राजसत्ता काय, आपल्या हिताची नसेल तर मध्यमवर्गीय इंग्रजांनी तिला झुगारून देण्यास, व जेव्हां ती फायदेशीर असेल तेव्हां तिचा यथास्थित उपयोग करण्यास कधींहि कमी केलें नाहीं. युरोपियन देशांतील इतर मध्यमवर्गांवर विजय मिळवण्यास इंग्रजांना हा आपला गुण फार उपयोगी पडला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel