९९. “ आपलें वर्चस्व राखण्यासाठीं ब्राम्हणांना अशी खटपट करावी लागली व युक्त्या लढवाव्या लागल्या. ते आपल्याला ओळखून होते.  ‘ न वै ब्राम्हणो राज्यायालं ’ ( शत० ब्रा० ५।१।१।१२ ) ब्राम्हण राज्य करण्याला अयोग्य. क्षत्रिया शिवाय आपण काय करणार ? आपलें वीर्य वाणींत. ‘ब्राम्हणो मुखतो हि वीर्यं करोति मुखतो हि सृष्टः’ ( ताण्ड्य० ब्रा० ६।१।६ ) ‘ बाहुवीर्यो राजन्यो बाहुभ्यो हि सृष्टः’ ( ताण्ड्य० ब्रा० ६।१।७ ) क्षत्रियाच्या दंडांत जोर, तेव्हां त्याच्याशीं एकोप्यानेंच वागलें पाहिजे. याकरितां ते जेव्हां तेव्हां क्षत्रियाची बढाई गात. ‘एष वै प्रजापतेः प्रत्यक्षतमां यद्राजन्यस्तस्मादेकः सन्बहूनामीष्टे यद्वेव चतुरक्षरः प्रजापतिश्चतुरक्षरो राजन्यः’ ( शत० ब्रा० ५।१।५।१४ ) राजा हा प्रत्यक्ष प्रजापति; म्हणून एक असून पुष्कळांवर राज्य करतो;  प्रजापतीच्या नांवांत चार अक्षरें, राजन्य ह्या नांवांतहि चार. ऐन्द्राभिषेकानें राजा प्रत्यक्ष इन्द्र होतो. ‘ क्षत्रं वा इन्द्रः’ ( शत० ब्रा० ४।३।३।७ ). ह्याला साम्राज्य मिळालें, स्वाराज्य मिळालें, वैराज्य मिळालें; हा खुद्द परमेष्ठी झाला; खरा क्षत्रिय झाला; सगळ्या विश्वाचा अधिपति, पुरन्दर, असुरांना मारणारा, ब्राम्हणप्रतिपालक, धर्मरक्षक जन्माला आला, अशा अभिषेकानन्तर आरोळ्या ठोकीत. ( ऐ० ब्रा० ३८-१) [ पृष्ठ ४१२]

१००. “ जेथें अशा प्रकारचें परस्परावलंबित्व, अशा प्रकारचें सख्य, डोकें व बाहु, बुद्धि व शौर्य ह्यांची जोडी, तेथें इतर जातींचें काय चालणार ? वैश्याला यज्ञयागादि करण्याचा अधिकार होता तरी ब्राम्हण व क्षत्रिय ह्याच्यांशीं टक्कर द्यावयाची त्याची प्राज्ञा नव्हती. पुरुषसूक्तांत वैश्य मांड्यांपासून झाला असें म्हटलें आहे. ऋ० सं० १०।९०।१२, पण ताण्ड्य ब्राम्हणांत ( ६।१।१० ) ह्याहीपेक्षां कमाल केली आहे. तो प्रजननापासून झाला असें तेथें म्हटलें आहे. ह्यामुळेंच त्याचे जवळ पुष्कळ जनावरें असतात. ब्राम्हणांचा व क्षत्रियांचा तो भक्ष. कारण ब्राम्हण मुखांतून व क्षत्रिय ऊर व दंड ह्यांतून जन्मल्यावर ह्याहूनहि खालच्या भागांतून तो जन्मला. त्याला कितीहि खाल्लें तरी तो कमी व्हावयाचा नाहीं. ( ऐ० ब्रा० ३८।१ )

१०१. “वैश्य हा गाढव, नेहमीं लादलेला. ब्रह्म व क्षत्र दोघे वैश्यावर अवलंबून, त्याच्यावांचून गत्यंतर नाहीं. तथापि वैश्य नेहमीं दबलेला ( शत० ब्रा० ११।२।३।१६). वैश्याला जरबेंत कसा ठेवावयाचा हा प्रयत्‍न.[ पृष्ठ ४१३]

१०२. ‘जेथें वैश्याची ही दशा तेथें शूद्राला कोण विचारतो ! पायांपासून उत्पत्ति. त्याला देवता नाहीं यज्ञ नाहीं. अग्नि व ब्राह्मण मुखापासून, इंद्र व क्षत्रिय ऊर व बाहू ह्यांपासून, वैश्य व विश्वेदेव प्रजाननापासून; पण पायांपासून फक्त शूद्रच;  देवता नाहीं. म्हणून शूद्रानें इतर जातीचे पाय धुवावे. ( ताण्डय ब्रा० ६।१।१।११) त्याचा भक्ष पाणी. जर पाणी भक्ष म्हणून घेशील तर तुझी प्रजा शूद्रासारखी होईल असें राजाला बजाविलें जाई. नेहमीं इकडून तिकडे हेलपाटे घालावयाला लावावें, हवें त्यानें वाटेल तेव्हां गचांडी देऊन घालवावें, पाहिजे तर ताडन करावें किंवा ठार सुध्दां मारावें   ( ऐ० ब्रा० ३५।३). त्याला दान देण्याला, विकण्याला कांहीं हरकत नाहीं. पद्युह वा एतच्छमशानं यच्छूद्रः। तस्माच्छूद्रसमीपे नाध्येतव्यं’ (आप० श्रौ०). शूद्र हा चालतें बोलतें श्मशान; त्याला ऐकूं येईल इतकें जवळ अध्ययन करूं नये. जर मुद्दाम होऊन त्यानें श्रुति ऐकली तर त्याचे कानांत लाख किंवा कथील वितळवून ओतावें ( कात्या० श्रौ० व आप० श्रौ०)”. [ पृष्ठ ४१४]
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी