विभाग पहिला - वैदिक संस्कृति

प्रास्ताविक


१. आर्य कधीं व कोठून आले यासंबंधीं अनेक मतें प्रचलित आहेत. ख्रिस्ती शकाच्या पूर्वी बाराशें वर्षांपासून तहत वीस पंचवीस हजार वर्षांपर्यंत आर्यांच्या आगमनाचे अनेक काळ अनेक लेखकांनी मानले आहेत. त्याच प्रमाणें सिंधपासून तहत उत्तर ध्रुवापर्यंत आर्यांचीं अनेक मूळ वसतिस्थानें मानण्यांत येतात. हा विषय महत्त्वाचा आणि मनोवेधक असला तरी प्रस्तुत ग्रंथाशीं त्याचा विशेष संबंध येत नाहीं. तथापि केवळ सत्यान्वेषणाच्या बुध्दीनें येथें कांहीं मुद्यांसंबंधानें चर्चा करणें योग्य वाटतें. कां कीं, अहिंसेचा विकास होण्यास सत्यज्ञानाची फार आवश्यकता आहे.

२. वैदिक वाङ्मयाशीं माझा फारसा परिचय नव्हता. अशा परिस्थितींत चि० दामोदर यानें १९२७ सालीं जातक-अट्ठकथेंतील खालील गाथा माझ्या निदर्शनास आणून दिली.

अन्तरा द्विन्नं अयुज्झपुरानं पञ्चविधा ठपिता अभिरक्खा ।
उरगकरोटि पयस्स च हारी मदनयुता चतुरो च महन्ता ।।


त्या वेळीं आम्ही देघे अमेरिकेंत होतों; व तो जर्मन भाषेचें विशेष अध्ययन करण्यासाठीं जातक-अट्ठकथेचें भाषांतर वाचीत होता. त्याला वाटलें कीं, ह्या गाथेंत कांहीं तरी ऐतिहासिक तथ्यांश असावा. टीकाकारानें लावलेला ह्या गाथेचा अर्थ १ ( १ वि० १।५६-५७ पहा ) मला पटला नाहीं; व अद्यापिहि पटत नाहीं. तथापि ह्या गाथेंत ऐतिहासिक तथ्यांश आहे हें मला पटलें. पण त्या वेळीं विसुध्दिमग्गाच्या संस्करणाच्या कामीं गुंतलों असल्यामुळें वैदिक वाङ्मयांत प्रवेश करून ह्यासंबंधीं विशेष विचार करण्यास मुळींच सवड नव्हती.

३. तदनन्तर १९२८ सालीं गुजराथ विद्यापीठांत रहात असतांना मी ऋग्वेद वाचूं लागलों. त्यांत एक गोष्ट मला दिसून आली ती ही कीं, वरील गाथेंत वर्णिल्याप्रमाणें इन्द्र हा एके काळीं मनुष्य होता; आणि त्याच्या हयातींतच किंवा मरणोत्तर त्याला देवत्व मिळालें. यासंबंधीं माझा ‘ वैदिक इन्द्र, देव कीं मनुष्य ’ हा लेख त्या सालच्या सप्टेंबरच्या विविधज्ञानविस्तारांत प्रसिध्द झाला. त्यावर बरीच चर्चा होईल असें वाटलें होतें. परन्तु आद्यापि ती माझ्या निदर्शनास आली नाहीं.

४. नागरीप्रचारणी पत्रिकेच्या संवत् १९८६ च्या वैशाखकार्तिकच्या अंकांत श्री जयशंकर प्रसाद यांचा ‘प्राचीन आर्यावर्त और उसका प्रथम सम्राट्’ हा लेख माझ्या पहाण्यांत आला. पण त्यांत प्रस्तुत चर्चेला उपयोगीं पडेल इतक्या महत्त्वाचा मजकूर मला सांपडला नाहीं. इन्द्र हा एके काळीं सम्राट् होता ही गोष्ट मला मान्य आहे. परन्तु त्याच्या साम्राज्याची मजल सिंध आणि पंजाब यांच्या पलीकडे जाऊं शकली नाहीं असें वाटतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel