श्रमणसंस्कृतीचे गुणदोष

९०. सर्वस्वाचा त्याग करून, केवळ मनुष्य प्राण्यावरच नव्हे, तर इतर प्राण्यांवरहि दया करण्यास लोकांस शिकवणें हें सामान्य काम नव्हे. या कामीं वैदिक ब्राह्मणांचा विरोध फार झाला. त्याचीं उदाहरणें त्रिपिटिक वाङ्मयांत अनेक सांपडतात. परंतु अशा विरोधाला न जुमानतां श्रमणसंप्रदायांनी, विशेषत: बौद्धांनी व जैनांनी दयाधर्माचा प्रसार करण्याचा अप्रतिम प्रयत्‍न केला. अशोकासारख्या राजाची मदत मिळाल्यानें तर हिंदुस्थानाबाहेरहि बौद्ध धर्माचा प्रसारा झाला. अशोकापासून शीलादिपत्यापर्यंत बौद्ध धर्म पूर्वेकडे सारखा पसरत चालला. ज्या हिंदीं श्रमणांनी या धर्माच्या प्रसाराला मदत केली त्यांचीं उज्वल चरित्रें सिलोन, ब्रह्मदेश, सयाम, चीन, जपान इत्यादि देशांतील लोक अद्यापिहि गात आहेत.

९१. आजला हिंदुस्थानांत बौद्ध धर्म राहिला नाहीं; व जैन धर्म अल्पप्रमाणांत अस्तित्वांत आहे. तथापि या धर्मांची छाप जनतेवर चांगली उमटली आहे. ब्राह्मणांनी कितीहि खटपट केली तरी यज्ञयागांचें पुनरुज्जीवन झालें नाहीं. अशोकानंतर पुष्यमित्रानें व त्यानंतर इसवी सनाच्या चौथ्या शतकांत समुद्रगुप्तानें अश्वमेध यज्ञ केला. परंतु ही यज्ञाची पद्धति पुनरपि लोकांत फैलावणें अशक्य होऊन गेलें.

९२. सर्वसाधारण लोकांत जो आज सदाचार दिसून येतो त्याचाहि पाया श्रमणांनीच घातला. ब्राह्मणांचा धंदा म्हटला म्हणजे यज्ञयाग करावे, आणि राजांकडून व इतर वरिष्ठ जातींच्या श्रीमंत लोकांकडून दक्षिणा मिळवावी हा होता. शूद्र म्हटला म्हणजे श्मशानासारखा त्याज्य ! त्याला ब्राह्मण विचारतात कशाला ? पण श्रमणांमध्ये हा पंक्तिप्रपञ्च नव्हता. त्यांना शूद्र काय किंवा वरिष्ठ जातीचे लोक काय, सर्व सारखेच होते. किंबहुना सर्व लोकांत समता स्थापन करण्याचा त्यांच उद्योग होता.

९३. बुद्धावर ब्राह्मणांचा सर्वांत मोठा आरोप म्हटला म्हणजे ‘बुद्ध चारी वर्णांना मोक्ष आहे, असें प्रतिपादन करतो’ हा होय. १ (१ ‘समणो गोतमो चातुवण्णिं सुद्धिं पञ्ञापेति |’ मज्झिमनि. म. पण्णासक, अस्सलायनसुत्त ). परंतु अशा आरोपांना न जुमानतां बुद्धानें व त्याच्या शिष्यांनी हिंदुस्थानांत आणि हिंदुस्थानाबाहेर सर्व जातींत सदाचार फैलावण्याचा प्रयत्‍न केला. त्याचा परिणाम आजलाहि हिंदु समाजावर दिसून येत आहे.

९४. यज्ञ करावयाचा म्हटला म्हणजे त्याला एक मोठा भव्य मंडप घालावा लागत असे, व तेथें हजारों यूप गाडावे लागत असत. हे मण्डप श्रृंगारण्यांत येत असावेत. परन्तु त्यांची आयुर्मर्यादा यज्ञ संपेपर्यन्त असे. अर्थात् याजक ब्राह्मणांकडून कलाकौशल्याची उन्नति होणें शक्य नव्हतें. तें काम श्रमण-संस्कृतीनें केलें. यज्ञयागांविषयी लोकांचा अनादर वाढत गेल्यामुळें त्यांची प्रवृत्ति विहार आणि स्तूप बांधण्याकडे झाली. आजला जीं हिदुस्थानांत प्राचीन कलाकौशल्याचीं कामें आहेत त्यांत अशोकाचे शिलास्तम्भ, कार्ली इत्यादिक ठिकाणचीं लेणीं, व सांची वगैरे ठिकाणचे स्तूप, यांना अग्रस्थान देण्यांत येतें. बौद्धांच्या मागोमाग जैनांनीहि कलाकौशल्याची बरीच उन्नति केली; व पौराणिक कालांत शैव आणि वैष्णव यांनीहि त्यांचे अनुकरण केलें.

बाहुसच्चं च सिप्पं च विनयो च सुसिक्खितो |
सुभासिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं ||

(बहुश्रुतता, शिल्पकला, उत्तम वागणुकीचा अभ्यास, आणि समयोचित भाषण, हीं उत्तम मंगलें होत.) या मंगलसुत्तांतील गाथेवरून बौद्धांनी कलाकौशल्याला उत्तेजन कसें दिलें, हे सहज दिसून येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel