१३६. मुसलमानांची पहिली स्वारी इ.स. सातशें बाराव्या वर्षीं झाली. त्या वेळच्या खलीफानें बरेंच सैन्य बरोबर देऊन महंमद इब्न कासीम याला हिंदुस्थानांत पाठविलें. त्यानें मुलतान वगैरे शहरें जिंकली; तरी पण भयंकर विध्वंस केला नाहीं. त्यानंतर दुसरे कांहीं मुसलमान पंजाब व सिंधमध्यें आले. त्या सर्वांत मोठा विध्वंसक म्हटला म्हणजे गझनीचा महमूद. त्यानें हिन्दुस्थानांत अनेक देवळांचा विध्वंस केला; ब्राह्मणांचा व बौद्ध भिक्षूंचा एकसारखाच उच्छेद मांडला. त्याच्या ह्या स्वार्‍यांमुळें जिकडे तिकडे हाहा:कार माजून राहिला. तरी त्यानें देवळांवर व चैत्यांवर इदगे आणि माशीदी बांधल्या नाहींत. हें काम महंमद घोरीनें केलें.

१३७. पाशुपतांच्या अत्याचारांनी बौद्ध आणि जैन पंथांना क्षीणता येत गेली, हें पुढें सांगण्यांत येईलच. तरी पण महंमद घोरीच्या स्वार्‍यांपर्यंत पूर्व प्रांतांत बौद्धांचे चैत्य आणि विहार अस्तित्वांत होतेच. इ.स. ११९७ च्या सुमारास महंमद बख्त्यार यानें बिहार प्रांतांतील एका प्रमुख शहरांत केवळ दोनशें घोडेस्वारांसह प्रवेश केला, व तेथील मुंडित ब्राह्मणांचा म्हणजे बौद्ध भिक्षूंचा समूळ उच्छेद केला. महंमदाला मोठी लूट मिळाली. परंतु तेथील पुस्तकालयांतील पुस्तकें वाचून त्यांत काय आहे, हें सांगणारा एकहि मनुष्य शिल्लक राहिला नव्हता. त्यानंतर त्याला असें आढळून आलें कीं, तें तटबंदी शहर म्हणजे एक मदरसा (विद्यापीठ) होता. हिंदुस्थानच्या भाषेंत त्याला विहार म्हणत.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ The Early History of India, pp. 419-20. महंमद घोरीच्याच कुतुबुद्दीन सरदारानें सारनाथ येथील बौद्ध विहारांचा नाश केला. वि. ३|२१९ पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१३८. महंमद घोरीनें आणि त्याच्या सरदारांनी अशी रीतीनें पंक्तिप्रपंच न ठेवतां श्रमणांचा आणि ब्राह्मणांचा सारखाच संहार चालविला असतां या भविष्यवाद्याला वाईट वाटतें तें हें कीं, ब्राह्मणांच्या देवळांची व बौद्धांच्या चैत्यांची सेवा शूद्र करूं इच्छित नाहींत. मुसलमानांनी फारच दांडगाई केली असली, तरी त्यांच्या हल्ल्यांपासून खालच्या जातीच्या पिळून निघणार्‍या लोकांना थोडाबहुत फायदा झाला असलाच पाहिजे. ब्राह्मणांच्या अन्नच्छत्रांना व देवळांना, आणि बौद्धांच्या विहारांना ज्या मोठमोठाल्या जहागिर्‍या असत, त्यांतील कुळांवर कसा जुलूम होत असावा, याचें अनुमान आजकालच्या जमीनदारी पद्धतीवरून करतां येणें शक्य आहे. मुसलमानांच्या स्वार्‍यांनी ह्या पिळून निघणार्‍या लोकांना मोकळें केलें. त्यायोगें ब्राह्मणांना व भिक्षूंना सेवेसाठीं शूद्र लोक न मिळाल्यामुळें युगक्षय आला असें वाटूं लागलें ! मुसलमानांची एकी पाहून देखील त्यांचे डोळे उघडले नाहींत; शूद्रांविषयींची तुच्छ बुद्धि यत्किंचितहि कमी झाली नाहीं !

१३९. वरील विवेचनावरून दिसून येईल कीं, महाभारतांतील हा अध्याय, किंवा निदान त्यांतील वर दिलेला मजकूर महंमद घोरीच्या स्वार्‍यांनंतर लिहिला गेला आहे. तेव्हां त्याचा काळ तेराव्या शतकांत येतो. अशीं प्रकरणें महाभारतांत अनेक असणें संभवनीय आहे. पण यावरून कोणीहि अशी समजूत करून घेऊं नये कीं, महाभारत फार आधुनिक आहे. त्यांत प्राचीनतम अशा कांही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, आम्ही वर निर्दिष्ट केलेली वृत्राचीच कथा घ्या. वृत विष्णूचा भक्त होता, ही गोष्ट वेदांच्याहि पूर्वींची असून तिचें पौराणिक पद्धतीनें केलेलें तें वर्णन असणें संभवनीय आहे. तेराव्या शतकापर्यंत ह्या महाभारतांत एकसारखी भर पडत गेली, एवढेंच काय तें आमचें म्हणणें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel