६८. अशा तर्‍हेनें बाबिलोनियन, आर्य व दास या तीन लोकांच्या संस्कृतीच्या मिश्रणानें मूळ वैदिक संस्कृति बनली, व ती सप्तसिंधु प्रदेशांत दृढमूळ झाली. एलाममध्यें क्रान्ति होऊन इन्द्र आणि इतर देवता नामशेष झाल्या, तरी सप्तसिंधूवर त्यांचा कायमचा छाप बसला. इन्द्राचें साम्राज्य मोडल्यावर सप्तसिंधूंतील संस्थानिक स्वतंत्र झाले असावेत. तरी पण इंद्राचीं व इतर देवतांचीं स्तोत्रें गाण्याचा परिपाठ तसाच कायम राहिला. मुसलमान बादशहांनी तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म हिंदुस्थानांत फैलावला. आजकालचे बहुतेक मुसलमान एकाकाळीं हिंदु होते. परंतु मुसलमान बादशाही पूर्णपणें नष्ट झाली असली, तरी हिंदी मुसलमान कडवेपणांत खुद्द महंमद पैगंबराच्या वंशजांनाहि हार जावयाचे नाहिंत ! तुर्कांनीं खलीफाला हद्दपार केलें, तरी येथें खिलाफत कायमचीच होऊन बसली आहे. तेव्हां इन्द्राची भक्ति सप्तसिंधु प्रदेशांत कायम होऊन राहिली यांत आश्चर्य मानण्याजोगें कींहीं नाहीं.

६९. येथें असा प्रश्न येतो कीं, वृत्र, त्वष्ठा वगैरे मूळचे सप्तसिंधु प्रदेशाचे ब्राम्हण शास्ते, असें असतां त्यांच्याच वंशजांनी इन्द्राला उचलून धरलें कसें ? याला उत्तर सोपें आहे. पेशवे ब्राम्हण राजे होते कीं नाहीं ? पण पेशवाई नष्ट झाल्याबरोबर त्यांच्याच घराण्यांतील सांगलीकर इत्यादि संस्थानिकांनी इंग्रजांशीं तह करून इंग्रजांचें आधिपत्य स्वीकारलें कीं नाहीं ? गरीब व मध्यम वर्गांतील ब्राम्हण भराभर इंग्रजी नोकरींत शिरले कीं नाहींत ? या नोकर्‍यांचें प्रमाण अतिशय वाढत गेल्यामुळें ब्राम्हणेतरांना त्यांतील चतकोर आपल्या वांट्याला यावी म्हणून निराळा पक्ष स्थापन करावा लागला कीं नाहीं ? तेव्हां इंद्राचें वर्चस्व दास ब्राम्हणांनी पतकरलें यांत आश्चर्य कसलें ?

७०. परन्तु इन्द्र येण्यापूर्वी आपण कोणत्या स्थितींत होतों ह्याची सप्तसिंधूतील ब्राम्हणांना विस्मृति झाली नसावी; याचा दाखला पुरुषसूक्ताच्या खालील प्रसिद्ध ऋचेंत सांपडतो.

‘ ब्राम्हणोSस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्या शूद्रो अजायत ।।’  ऋ० १०।९०।१२


(एके काळीं ब्राम्हण ह्या विराट पुरुषाचें मुख होता; बाहु राजन्य असे; वैश्य मांड्या; व त्याच्या पायांपासून शूद्र झाला.) ही घडी इन्द्राच्या आगमनानें बिघडली. ब्राम्हणांचें वर्चस्व नष्ट झालें व राज्यकर्त्यांचें वाढलें. परन्तु त्यामुळें ब्राम्हणांचें नुकसान झालें नसून एका अर्थी फायदा झाला. पुजारी आणि पुरोहितपणामुळें लोकांत त्यांचा मान राहिला, आणि राज्यशासनाची जबाबदारी व दगदग राहिली नाहीं. लढाई झाली तर क्षत्रियांनी रक्षण करावें; ब्राम्हणांनी त्यांत पडूं नये, असा जवळ जवळ नीतिधर्मच होऊन बसला. याचमुळें वाङ्मयाची अभिवृद्धि करण्यालाहि ब्राम्हणांना सवड सांपडली.

७१. इन्द्र हिंदुस्थानांत आला त्यावेळीं दोन प्रकारचे ब्राम्हण होते; एक राज्यकर्ते असून पौरोहित्यहि करणारे, व दुसरे यति म्हणजे अरण्यांत राहून मंत्रतंत्रादिकांचें पठण करणारे. इजिप्त, बाबिलोनिया वगैरे ठिकाणीं पुजारी वर्ग असेच. परंतु त्यांतून यतिवर्ग निघाला असावा असें वाटत नाहीं. तेव्हां यति हा सप्तसिंधूतच निघालेला एक खास ब्राम्हणवर्ग समजला पाहिजे. इन्द्र आला तेव्हां या यति लोकांनींहि त्याला विरोध केला;  व त्यामुळें इंद्रानें पुष्कळशा यतींना कुत्र्यांना खाऊं घातलें. ह्या अनुभवामुळें पुढें ह्या यतिवर्गानें राजकारणांत शिरण्याचें सोडून दिलें; व केवळ यज्ञयागांतच समाधान मानून घेतलें असावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel