महात्मा गांधींचें राजकारण

३९. दक्षिण आफ्रिकेंत निग्रो लोक पुष्कळ आहेत. परंतु त्यांना फारशी बुद्धि नसल्यामुळें त्यांच्याकडून काम उत्तम रीतीनें पार पडत नव्हतें. यासाठीं तेथील इंग्रजी वसाहतवाल्यांनी मुदतीच्या करारानें इकडून पुष्कळ मजूर नेण्याचा सपाटा चालविला. त्या वेळीं राष्ट्रीय सभेची स्थापना झाली नसल्याकारणानें या वसाहतवाल्यांविरुध्द नुसती तक्रार देखील करण्याला कोणी हिंदी गृहस्थ पुढें आला नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, आफ्रिकेंत बरेच हिंदी मजूर गोळा झाले. पांच दहा वर्षांचा करार संपल्यावर त्यांपैकीं कांहीं जण लहान सहान व्यापार आणि शेती करून तिकडेच स्थायी झाले.

४०. एका मुसलमान व्यापार्‍याचा खटला चालवण्यासाठीं प्रथमत:  गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले; व पुढें तेथेंच त्यांनी आपला वकीलीचा धंदा चालू ठेवला. ‘जे कां रंजले गांजले |  त्यांसि म्हणें जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेंची जाणावा ।।’ ह्या उक्तींत गोवलेला उदारपणा गांधीजींच्या अंगीं स्वाभाविकपणें असल्याकारणानें आपल्या निकृष्ट देशबांधवांचीं दु:खें त्यांना असह्य वाटूं लागलीं; व त्यांचा प्रतिकार करण्याला सत्याग्रहाच्या मार्गानें ते पुढें सरसावले.

४१. गांधीजींच्या दक्षिण अफ्रिकेंतील सत्याग्रहाला यश आलें कीं नाहीं, या वादांत शिरण्याचें मुळींच कारण नाहीं. सर्वांना एवढें कबूल कराव लागेल कीं, राजकीय लढ्यांत सत्याग्रहाचा प्रवेश प्रथमत: गांधीजींनीच केला. त्यांच्या पूर्वी कौंट तॉलस्तॉय यांनी सत्याग्रहाची कल्पना विशद रीतीनें आपल्या ग्रंथांतून लोकांसमोर मांडलीच होती. परंतु ती गांधीजींशिवाय दुसर्‍या कोणालाहि व्यवहार्य वाटली नाहीं. गांधीजींनी तॉलस्तॉय यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन, ती व्यवहार्य आहे, असें सिद्ध करून दाखवलें आहे.

४२. महायुद्धाला सुरुवात झाल्यावर गांधीजी स्वदेशीं परत आले. ‘सत्याग्रहाचा प्रयोग दक्षिण आफ्रिकेपुरता करून हिंदी लोकांचें दास्यविमोचन होणार नाहीं; हिंदुस्थानभर सत्याग्रह सुरू केला तरच हिंदुस्थानला स्वराज्य मिळेल व तेणेंकरून हिंदुस्थानची वसाहतींत आणि इतर राष्ट्रांत इभ्रत वाढेल,’ अशी त्यांची समजूत होणें साहजिक होतें. पण येथें आल्यावर सत्याग्रह सुरू करण्यास त्यांना बर्‍याच अडचणी दिसून आल्या, व कांहीं काळपर्यंत सर्व राजकीय वातावरणाचें नीट निरीक्षण करून मग प्रसंगानुसार सत्याग्रह सुरू करणें योग्य वाटलें.

४३. सत्याग्रहाच्या कामीं मुख्य अडचण म्हटली म्हणजे हिंदुमुसलमानांची बेकी. १९१६ सालीं लखनौ येथें हिंदुमुसलमानांमध्ये कौन्सिलमधील जागांसंबंधानें तडजोड झाली. त्यामुळें हिंदुमुसलमानांच्या सख्याची आशा वाटूं लागली. महायुद्ध संपल्यानंतर तिकडे ग्रीक लोकांनी स्मर्नामध्यें शिरून तुर्क लोकांशीं युद्धाला सुरुवात केली. त्यांना इंग्रजांचें पाठबळ असल्यामुळें हिंदी मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले, व त्यांनी खिलाफतची चळवळ सुरू केली. त्याच वेळीं इंग्रजांनी रौलॅट अ‍ॅक्ट पास करून येथल्या प्रागतिक पुढार्‍यांनाहि नाखुष केलें. अर्थात् ही संधि साधून गांधीजींनी सत्याग्रहाचा ओनामा घातला.

४४. इ.स. १९२० सालीं एप्रिलच्या सहा तारखेला रौलॅट अ‍ॅक्टाविरुद्ध जिकडे तिकडे सभा झाल्या. त्यांत हिंदु-मुसलमानांनी मोठ्या सलोख्यानें भाग घेतला. त्याच वेळीं पंजाबांत कांहीं असंतुष्ट माणसांनी चार पांच इंग्रजांचे खून केले. हिंदु-मुसलमानांची एकी व इंग्रजांचे खून पाहिल्याबरोबर, १८५७ सालच्या बंडाची पुनरावृत्ति होते कीं काय, असें इंग्रज अधिकार्‍यांना भय वाटणें अगदीं साहजिक होतें. मनुष्य भयानें गांगरून गेला म्हणजे कोणते अपराध करील याचा नेम नाहीं, या सिद्धान्तानुसार पंजाबांत इंग्रज अधिकार्‍यांनी कहर मांडला. अमृतसर येथें जालियनवाला बागेंत नि:शस्त्र लोकांची जनरल डायर यानें केलेली कत्तल क्रूरतेचा आधुनिक नुमना म्हणून सर्व जगभर प्रसिद्ध झाली आहे. असेंच कांही क्रूर अधिकांर्‍यांकडून कोठें घडून आलें, तर त्याला दुसरें अमृतसर (The Second Amritsar) म्हणण्याचा प्रघात पडला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel