१९. “याप्रमाणें पुण्यकर्में करून व ब्रतनियम पाळून मघ मरणोत्तर देवलोकीं जन्मला, व देवांचा इंद्र (राजा) झाला. पूर्वजन्मींच्या त्याच्या नांवावरून त्याला मघवान् म्हणत, व देवलोकीं त्याला शक्र म्हणत. एकदा असुरांनी त्याच्यावर हल्ला केला. हें वर्तमान ऐकून शक्र आपल्या वैजयंत रथांतून दक्षिण समुद्राच्या बाजूनें आसुरांबरोबर युद्ध करण्यास पुढें सरसावला. तेथें असुरांनी त्याचा पराजय केला, व इन्द्रानें पलायन केलें. त्याचा रथ वेगानें चालला असतां सांवरीचें अरण्य मोडून समुद्रांत पडूं लागलें, व त्यांत असलेलीं गरुडांचीं घरटीं समुद्रांत पडली; गरुडांचीं पिलें किलबिलाट करूं लागलीं. तेव्हां शक्र मातलीला म्हणाला, ‘हा अत्यंत करुण शब्द कोणाचा ?’ मातलि म्हणाला, “देवा ! आपल्या रथवेगानें सांवरीचें वन मोडून समुद्रांत पडलें. त्यांत असलेलीं हीं गरुडांची पिलें एकसारखा किलबिलाट करीत आहेत’. शक्र म्हणाला, ‘बा मातलि, ह्या सांवरीच्या वनांतून रथ नेऊं नकोस. असुरांनी आमचे प्राण घेतले तरी बेहत्तर; पण ह्या पक्षांची घरटीं नष्ठ होऊं देऊं नकोस.’

२०.  “तें ऐकून मातलि सारथीनें एकदम रथ फिरवला. तें पाहून असुरांना वाटलें कीं, दुसर्‍या चक्रवालांतून अनेक शक्र ह्या शक्राच्या मदतीला आले असावेत. या समजुतीनें त्यांनी पळ काढला, व ते आपल्या असुरभवनांत शिरले. तेव्हां शक्रांनें दोन अयोध्यपुरांच्या मध्यें उरग करोटि पयस्स हारी आणि मदनयुत चार महंत अशा पांच समुदायांना पांच ठिकाणीं रक्षणासाठीं ठेऊन दिलें, व तो दिव्य संपत्तीचा अनुभव घेऊं लागला.”

२१. सक्कसंयुत्तांत दुसरी एक शक्राची मनोरंजक गोष्ट आहे ती अशी – “ एकदां शक्राचें वेपचित्ति असुरेंद्राबरोबर युद्ध झालें. त्या संग्रामांत वेपचित्ति म्हणाला, ‘आम्ही आतां सुभाषितांची लढाई करूं’ शक्राला ही गोष्ट मान्य झाली. देवांनी व असुरांनी कोणाचें सुभाषित चांगलें हें ठरवण्यासाठीं एक परिषद नेमली. तेव्हां वेपचित्ति म्हणाला, ‘हे देवेन्द्र ! तुझें सुभाषित बोल’ पण शक्र म्हणाला, ‘तुम्ही पूर्वदेव आहां. तेव्हां, हे वेपचित्ति, तूं पहिली गाथा बोल.’

२२.  “वेपचित्ति म्हणाला, ‘मूर्खांचा निषेध करणारा कोणी नसला, तर ते अधिकच फुगून जातात. म्हणून शहाण्या माणसानें दंडनातीनें मूर्ख माणसाचा निषेध करावा.’ हें ऐकून असुरांनी वेपचित्तीचें अभिनंदन केलें. देव चुप्प राहिले.

२३. “त्यावर शक्र म्हणाला, ‘मूर्ख मनुष्य रागावला असें जाणून शहाण्या माणसानें सावधानतापूर्वक शांति धरावी, हाच मूर्ख माणसाचा निषेध होय’. ह्या शक्राच्या सुभाषिताचें देवांनी अभिनंदन केलें. असुर चुप्प राहिलें.

२४.  “तेव्हां वेपचित्ति म्हणाला, ‘हा मला भयामुळें क्षमा करतो, असें मूर्ख मनुष्य समजतो, व पळत्याच्या पाठीं जसा बैल लागतो तसा हा दुष्ट शहाण्याच्या मागें लागतो. हे वासवा, हाच क्षमेमध्यें मला दोष दिसतो.’ हें ऐकून असुरांनी वेपचित्तीचें अभिनंदन केलें. पण देव चुप्प राहिले.

२५. “ त्यावर शक्र म्हणाला, ‘मूर्ख माणसाला खुशाल वाटूं द्या किंवा न वाटूं द्या कीं, भयामुळें हा मला क्षमा करीत आहे. परंतु पुरुषार्थांमध्यें सदर्थ श्रेष्ठ आहे, व क्षमेपेक्षां दुसरा श्रेष्ठ सदर्थ नाहीं. जो स्वत: बलवान् असून दुर्बळाला क्षमा करतो तोच परम क्षमावान् होय. दुर्बळ मनुष्य सदाच क्षमा करतो. मूर्खपणाचें बळ हें बळ नव्हे. परंतु धर्माप्रमाणें आचरण करणार्‍याचें जें बळ त्याच्याविरुद्ध बोलणारा कोणी सांपडणार नाहीं. रागावणार्‍या माणसावर जो रागावतो, त्यांत त्याचें हित नसतें. पण रागावणार्‍यावर जो रागवत नाहीं तोच दुर्जय संग्राम जिंकतो. जो दुसरा रागावला असतां आपण स्वत: शांतपणें वागतो, तो आपलें आणि परक्याचें कल्याण साधतो. आपला आणि दुसर्‍याचा रोग बरा करणार्‍या अशा ह्या माणसाला सद्धर्म न जाणणारे सामान्य जन वेडा समजतात.’ परिषदेनें शक्राच्या तर्फे निकाल दिला हें सांगावयास नकोत.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी