१०८. अग्नीची पूजा करणारे ते अग्निव्रतिक. ते जंगलांत राहून किंवा आपल्या घरीं अग्निदेवतेची पूजा करीत असत. अग्निहोत्र्यांच्या रूपानें अद्यापि ते अल्प प्रमाणांत अस्तित्त्वांत आहेत. नागपंचमीच्या दिवशीं नागांची पूजा केली जाते. सर्वकाळ अशी पूजा करणार्‍या लोकांना नागव्रतिक म्हणत. सुपर्णव्रतिक सुपर्णाची पूजा कशी काय करीत असत, हें सांगतां येत नाहीं. सुपर्ण म्हणजे गरुड. तो विष्णूचें वाहन या रूपानें अद्यापि प्रसिद्ध आहे. पण त्याची पूजा होत असल्याचें ऐकिवांत नाहीं. त्याशिवाय येथें सुपर्ण बहुवचन आहे. म्हणजे एका गरुडाची पूजा नसून सर्व गरुडांची पूजा एकदम केली जात असे.

१०९. असुरांची पूजा निहेसाच्या वेळीं अस्तित्वांत होती ही गोष्ट महत्त्वाची आहे. महाभारतांतील वृत्रगीतेवरून वृत्रासुराचा मान बराच काळपर्यंत या देशांत ठेवला जात होता असें दिसून येतें. तेव्हां असुरांची पूजाहि त्या वेळीं अस्तित्वांत होती हें उघडच आहे.

११०. गंधर्वाचें व्रत पाळणारे ते गंधर्वव्रतिक. ते नटनर्तकादिक लोक असावेत. चार महाराजांची माहिती वर दिलीच आहे.२  त्यांपैकीं पश्चिम दिशेचा मह राजा विरूपाक्ष ह्याची पूजा महादेवाच्या रूपानें निद्देसाच्या वेळीं अस्तित्वांत होती असें दिसतें. कां कीं, कालांतरानें विरूपाक्ष हें महादेवाचें नांव झालें. तो नागांचा राजा होता. यासाठीं महादेवाच्या गळ्यांत साप असतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२ वि. ३|८-१२ पहा. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१११. चंद्राचें व्रत पाळणारे ते चन्द्रव्रतिक. चन्द्राची पूजा वेदामध्यें आहेच, व ती या वेळींहि अस्तित्वांत होती हें स्पष्ट आहे. सूर्याची पूजा वेदांत भरपूर आहे. होतां होतां सूर्याचीं देवळें बांधण्याचा प्रघात सुरू झाला. निद्देसाच्या वेळीं अशीं देवळें अस्तित्वांत होतीं कीं नाहीं तें सांगतां येत नाहीं. तरी पण सूर्याच्या मूर्ति करण्यांत येत असाव्यात असें दिसतें. वराहमिहिराच्या वेळीं सूर्याच्या पूजेचें काम मग नांवाच्या ब्राह्मणांकडे होतें, व सूर्याच्या मूर्तीचा पोशाख पर्शियन वरिष्ठ जातींतील लोकांच्या पोशाखाप्रमाणें असें.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ बृहत्संहिता अ. ६०|१९, व अ. ५८|४६.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
११२. ह्युएन् त्संगच्या वेळीं सूर्याचें मुख्य मंदिर मुलतान येथें होतें; आणि त्याची मूर्ति सोन्याची असून मौल्यवान् जवाहिरानें मढवलेली होती.२  पण अलबेरूनीच्या पूर्वीं कांही काळ ती लाकडाची केलेली असून चामड्यानें मढवलेली होती; आणि तिच्या दोन्ही डोळ्यांत दोन माणकें होतीं. महमद इब्न अल्कासीम यानें मुलतान जिंकलें तेव्हां त्याला असें दिसून आलें कीं, या सूर्याच्या देवळामुळें मुलमानला फार मोठा फायदा होतो. चारी दिशांकडून यात्री लोक येऊन मूर्तीची पूजा करतात, व त्यामुळें पुष्कळ धनदौलत एकत्र होते. म्हणून त्यानें त्या मूर्तीचा भंग केला नाहीं. तेवढा एक गाईच्या मासाचा तुकडा त्या मूर्तीच्या गळ्यांत त्यानें थट्टेनें अडकवून दिला. नंतर इब्न सायिबान यानें ती मूर्ति फोडली; आणि तेथल्या सर्व पुजार्‍यांना ठार केलें. ३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ Buddhist Records ii, 274
३  Alberuni’s India, i. 116
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel