ब्राह्मसमाजाचा उदय

२९. पाश्चात्य संस्कृतीची मोठी लाट इंग्रजी व्यापाराच्याद्वारें आमच्या देशावर येऊन आदळली. तिनें फ्रेंच, डच व पोर्तुगीज व्यापार्‍यांना आपल्या पोटांत गडप करून टाकलें; व ती फैलावत जाऊन काबूलपर्यंत पोंचली. तिचा आमच्या राजकीय परिस्थितीवर तर परिणाम झालाच, आणि धार्मिक व सामाजिक परिस्थितीवरहि परिणाम झाल्याशिवाय राहिला नाहीं. इंग्रजांबरोबर त्यांचें बायबल व मिशनरीहि इकडे येऊं लागले. इंग्रजांच्या जयाला कारणीभूत हें बायबल असावें, असें आमच्या साध्याभोळ्या लोकांना वाटूं लागल्यास नवल नाहीं. परंतु अनेक वर्षांच्या रूढीनें अंगवळणी पडलेल्या पौराणिक धार्मिक वृत्तींतून बाहेर निघणें त्या काळच्या लोकांना अशक्य होतें. तरी पण जे कोणी तसेच धाडसी होते त्यांनी धर्मांतर केलें; आणि बहुजनसमाज नुसता आश्चर्यचकित होऊन तटस्थ राहिला. इंग्रजांची राज्यपद्धति उत्तम, याच्याबद्दल धर्मवेड्या पंडितांनाहि शंका राहिली नाहीं. ‘कायहो, इंग्रजांच्या राज्यांत काठीला सोनें बांधून वाटेल तिकडे जावें!’ हें वाक्य त्या काळीं आबालवृद्धांच्या तोंडीं झालें. पण बायबलासंबंधानें पंडित वर्गाची खात्री पटेना. 

३०. अशा परिस्थितींत राजा राममोहन राय उदयास आले. बायबल जरी सर्वथैव पवित्र ग्रंथ म्हणता आला नाहीं, तरी त्यांतील एकेश्वराची कल्पना आत्मसात् केल्यावांचून हिंदुसमाजाची उन्नति होणार नाहीं, असें त्यांचें ठाम मत झालें. एकेश्वरी मताचा प्रचार बायबलच्या द्वारें केला असतां पंडितमंडळाकडून भयंकर विरोध झाला असता. म्हणून एकेश्वराला साधक अशीं उपनिषदांतील वाक्यें गोळा करून त्यांनी आपल्या ब्राह्मसमाजाच्या इमारतीची उभारणी केली. हिंदुस्थानांत हा प्रयत्‍न पहिलाच होता असें नाहीं. इंद्रानें हा देश काबीज केल्यावर त्यालाच देवांचा राजा बनवून सिंध प्रदेशांतील ब्राह्मणांनी नवीन धर्माची उभारणी कशी केली ह्याचें वर्णन पहिल्या विभागांत आलेंच आहे. शकांचें कुलदैवत महादेव. त्याला ब्राह्मणांनी जगाचा कर्ता बनवून पुजारीपणा कसा संपादन केला, व पुन: वासुदेवालाहि महादेवाच्या पदवीला कसें चढवलें, याचीं वर्णनें तिसर्‍या विभागांत आलींच आहेत. इतकेंच नव्हे, अकबराच्या वेळीं अल्लोपनिषद् रचून अल्लालाहि फायदेशीर करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नाचा उल्लेख आम्ही केलाच आहे. तेव्हां राममोहन रायांनी जें काहीं केलें, तें ब्राह्मणांच्या पूर्वपरंपरेच्या फारसें विरुद्ध नव्हतें.

३१. परंतु पूर्वींच्या परंपरेंत राममोहन रायांनी मोठा फरक केला, तो हा कीं, या नवीन परमेश्वराच्या भक्तीच्या द्वारें सामाजिक परंपरा निखालस बदलून टाकण्याचा घाट घातला. इंद्र, महादेव, कीं वासुदेव जगाचा कर्ता झाला तरी ब्राह्मण त्याचे पुजारी, अतएव जातिभेदाचे मुकुटमणि होऊन राहिलेच. पण इंग्रजी समाजाप्रमाणें आमचा समाज व्हावा अशी इच्छा असल्याकारणानें राममोहन रायांनी आपल्या ब्राह्म धर्मांत जाति-भेदाला जागा ठेवली नाहीं. अर्थात् पंडितमंडळीकडून या धर्माला कडाक्याचा विरोध होणें साहजिक होतें. तरी पण सुशिक्षित लोकांत त्याचा अल्पप्रमाणानें प्रसार झालाच.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी