महादेव

५२.  महादेवाचा आणि वैदिक रुद्राचा निकट संबंध आहे. रुद्राच्या ऋचा ऋग्वेदांत बर्‍याच आहेत. त्यांवरून असें दिसून येतें कीं, इंद्राचे जे साथी मरुत् त्यांचा तो पूर्वज होता, ‘आ ते पितर्मरुतां सुम्नमेतु’, ऋ० २|३३|१. तो कपर्दी होता. कपर्द म्हणजे जटा समजण्यांत येते. परंतु वैदिक काळीं कपर्द म्हणजे शीख लोक बांधतात तशा प्रकारचा केसांचा बुचडा होता, असें वाटतें. कारण ‘कपर्दिनो धिया धीवन्तो असपन्त तृत्सव:’ ऋ० ७|८३|८, येथें सर्व तृत्सूंनाच ‘कपर्दिन:’ म्हटलें आहे. सर्व तृत्सु जटाधारी असणें शक्य नाहीं. बाबिलोनियामध्यें अक्केडियन लोकांत बुचड़ा बांधण्याची वहिवाट होती. पण सुमेरियन लोकांत ती नव्हती. तेव्हां हा मरुतांचा पूर्वज रुद्र अक्केडियनांप्रमाणें बुचडा बांधीत असावा.

५३.  रुद्र स्वत: इंद्रसमकालीं हयात होता असें दिसत नाहीं. निदान तशा रीतीचा उल्लेख ऋग्वेदांत सांपडला नाहीं. पण त्याचे जे वंशज मरुत् त्यांची इंद्राला अतिशय मदत झाल्याचीं वर्णनें अनेक ठिकाणीं आहेत. उदाहरणार्थ ऋग्वेदाच्या आठव्या मंडळांतील शहात्तराव्या सूक्तांत इंद्राला मरुत्सखा व मरुत्वान् हीं दोन्हीं विशेषणें लावण्यांत आलीं आहेत. अर्थात् इंद्राच्या विजयाला मरुतांची फार मदत झाली हें सांगणे नलगे.

५४. आतां हे मरुत् कोण असावेत, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना रुद्रा:, रुद्रिया:, आणि रुद्रासा: असें म्हटलें आहे. त्यावरून ते रुद्राचे वंशज किंवा भक्त होते एवढेंच सिद्ध होतें. “सं ता इन्द्रो असृजदस्य शाकै:’ ऋ० ५|३०|१०, येथें सायणाचार्य शाक याचा अर्थ मरुत् असा करतात; आणि तो ऋ० ४|१७|११, ऋ० ६|१९|४, ऋ०  ६|२४|४  इत्यादिक ऋचांमध्येंहि लागू पडण्यासारखा आहे. सायणाचार्यांच्या म्हणण्याप्रमाणें मरुत् हेच शाक होते असें गृहीत धरलें, तर शकांचे पूर्वज हे मरुतच होत, असें अनुमान करणें अगदींच निरर्थक होणार नाहीं. तेव्हां आपण असें धरुन चालू कीं, इंद्राच्या पूर्वींहि ह्या शक लोकांत रुद्राची पूजा चालू होत. पण खुद्द ऋग्वेदाच्या काळीं रुद्राचें महत्त्व इंद्राइतकें खास नव्हतें.

५५.  परंतु यजुर्वेदाच्या काळीं ही स्थिति कांहीं अंशी पालटली असावी. तैत्तिरीय संहितेच्या चौथ्या काण्डाच्या पांचव्या प्रपाठकांत रुद्राची जी स्तुति आहे त्यांत एकच रुद्र नव्हे पण अनेक रुद्र सांपडतात. त्यावरून ह्या प्रकरणाला शतरुद्रीय असेंहि म्हणतात. त्यांतले कांहीं उतारे येथें देतों.

(१)
५६. “हे रुद्र, तुझ्या क्रोधाला नमस्कार असो.
तुझ्या बाणाला नमस्कार असो. धनुष्य धारण
करणार्‍या तुला नमस्कार असो. तुझ्या बाहूंना
नमस्कार असो. तुझा बाण सुखकारक होवो.
तुझें धनुष्य सुखकारक होवो. तुझा जो भाता
त्याने आमचें रक्षण कर.... नीलग्रीवाला, सहस्त्राक्षाला, वृष्टिकर्त्याला तुला नमस्कार असो. आणि ह्याचे जे सेवक आहेत त्यांनाहि मी नमस्कार करतों... तुझ्या धनुष्याचें शरसंधान आमच्यावर होऊं देऊं नकोस. तुझा भाता आमच्या पासून दूर ठेव.”

(२)
५७. “हिरण्य बाहूला, सेनापतीला, दिशांच्या स्वामीला नमस्कार असो. हरितपर्ण वृक्षांना आणि पशूंच्या पतीला नमस्कार असो...”

(३)
५८... उन्नताला, धनुर्योध्याला, चोरांच्या अधिपतीला नमस्कार असो. धनुर्योध्याला, बाणांचा भाता धारण करणार्‍याला, दरोडेखोरांच्या अधिपतीला नमस्कार असो... धनुष्यबाण धारण करणार्‍या तुम्हाला नमस्कार असो. १...”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ येथून बहुवचनीं प्रयोग सुरु झाला हें लक्ष्यांत ठेवण्याजोगें आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी