७९. वर सांगितलेले जे सहा मोठमोठाले संघनायक होते, १. त्या सर्वांपेक्षा बुद्ध तरुण होता. आरंभी त्याजपाशीं फारसा संघ नव्हता, हें देखील वर दिलेल्या भरण्डु कालामाच्या गोष्टीवरून २ ( २ वि० २।४९-५१ पहा. ) दिसून येईलच. असें असतां बुद्धाच्या या मध्यम मार्गाचा प्रभाव जनतेवर लवकर पडला. इतर संघांना बौद्ध संघानें मागें टाकलें, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. कारण हें तत्त्वज्ञान लोकांना प्रचलित इतर तत्त्वज्ञानापेक्षां विशेष पसंत पडलें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० २।२४-२९ पहा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८०. बुद्धकालापूर्वीं यज्ञयागांचें स्तोम फार माजलें होतें, व जनतेला त्याचा अत्यन्त तिटकारा होता. परंतु राजे आणि धनाढ्य ब्राह्मण जबरदस्तीनें शेतीचीं जनावरें शेतकर्‍यांकडून आणीत व मोठमोठ्याल्या यज्ञयागांत त्यांचा वध करीत. लोकांना हें कृत्य किती नापसंत होतें हें दाखवण्यासाठी येथें एक लहानशा सुत्ताचा उतारा देणें रास्त आहे.

८१. “बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें रहात होता. त्या काळीं पसेनदि कोसलराजाच्या महायज्ञाला सुरुवात झाली होती. पांचशें बैल, पांचशे गोहरे, पांचशें कालवडी, पांचशे बकरे, पांचशें मेंढे यज्ञासाठी यूपांना बांधले होते. राजाचे दास, दूत आणि कामगार दंडभयानें भयभीत होऊन आसवें गाळीत रडत रडत यज्ञाचीं कामें करीत होते. तो प्रकार कांही भिक्षूंनी पाहिला आणि भगवंताला कळविला.

८२. “तेव्हां भगवान् म्हणाला, ‘अश्वमेध, पुरुषमेध, सम्यकपाश, वाजपेय आणि निरर्गल हे यज्ञ मोठ्या खर्चाचे आहेत. पण ते महत्फलदायक नाहींत. बकरे व मेंढे, गाई व बैल, असे विविध प्राणी ज्यांत मारले जातात, त्या यज्ञाला सद्वर्तनी महर्षि जात नसतात. परंतु ज्या यज्ञांत प्राण्यांची हिंसा होत नाहीं, व जे सर्वदा लोकांना आवडतात, ज्यांत बकरे, मेंढे, गाई, बैल इत्यादि प्राणी मारले जात नाहींत, अशा यज्ञाला सद्वर्तनि महर्षि जात असतात. म्हणून सुज्ञ पुरुषानें असा यज्ञ करावा.”१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ कोसलसंयुत्त, वग्ग १ सुत्त ९.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८३. अशा प्रकारचे अवाढव्य यज्ञ लोकांना किती अप्रिय होत चालले होते, याची आणखीहि बरींच उदाहरणें बौद्ध वाङ्मयांत सांपडतात. या यज्ञांला कंटाळून जे तापसी जंगलांत शिरत असत, ते जरी कधीं कधीं गावांत आले, तरी लोकांना उपदेश करण्याच्या भानगडींत पडत नसत. हा प्रयत्‍न प्रथमत: पार्श्वानें केला असावा. यज्ञयाग हा धर्म नसून चार याम हाच खरा धर्ममार्ग आहे, हें त्यानें जनतेला दाखवून दिलें. यज्ञयागाला कंटाळलेली सामान्य जनता या धर्माकडे ताबडतोब वळली. तथापि राजे व श्रीमंत ब्राह्मण हे आपल्या स्वास्थ्यासाठीं यज्ञयाग करीतच असत. दुसर्‍याहि श्रमणसंप्रदायांनी निरनिराळ्या मार्गानें या यज्ञयागाच्या धर्मावर हल्ले चढवले. तरी पण मौर्य कालापर्यंत कोणत्याना कोणत्या रूपानें यज्ञयाग अस्तित्त्वांत होतेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel