रामानुजी व माध्व पंथ

२६३. वैष्णव संप्रदायांचे बहुतेक पुढारी महमूद गझनीच्या स्वार्‍यांनंतर उदयाला आले. त्यांपैकीं पहिले रामानुज होत. वासुदेवाची पूजा गुप्त राजांच्या कारकीर्दीतच उत्तर हिंदुस्थानांत फैलावली होती. त्यानंतर सहाव्या किंवा सातव्या शतकांत दक्षिणेकडे विष्णुपूजा विशेष प्रचारांत आली असावी. विष्णुभक्तांच्या पुढार्‍यांना तामीळ देशांत आळवार म्हणत. ह्या आळवारांचे तेज शैवाधर्मासमोर पडणें शक्य नव्हतें. कां की, शैव धर्माला राजांचा तर पाठिंबा होताच, आणि लवकरच त्याला शंकराचार्यांसारख्या वेदांती पुढार्‍याचाहि पाठिंबा मिळाला. अर्थात् वैष्णव संप्रदायाला अशा एकाद्या वेदांती पुढार्‍याची उणीव भासूं लागली; व ती रामानुजाचार्यांनी भरून काढली.

२६४. रामानुजाचार्य श्रीरंगमच्या पुजारी घराण्यांत इ.स.१०१७ सालीं जन्मले. त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून वैष्णव संप्रदायाला अनुकूल असें ब्रह्मसूत्रभाष्य लिहिलें. त्यांच्या ह्या नवीन संप्रदायाला विशिष्टद्वैत म्हणतात. त्या काळीं कुलोत्तुंग नांवाचा चोळ राजा राज्य करीत होता. त्याला रामानुजाचा हा नवीन प्रयत्‍न अर्थातच आवडला नाहीं; व रामानुजाला १०८० आणि ९० यांच्या दरम्यान श्रीरंगम् सोडून पळ काढावा लागला. कुलोत्तुंग राजानें रामानुजाचा मित्र कुरत्ताळवार याचे डोळे फोडले, व याप्रमाणें ह्या नवीन पंथाचा सूड उगवण्यास सुरुवात केली. बौद्धांना आणि जैनांना जाळणार्‍या ह्या शैवपंथरूपी अग्नीची थोडीशी झळ रामानुजालाहि लागली म्हणावयाची!  तथापि त्यामुळें हे नवीन संप्रदायाचे संस्थापक अहिंसक बनले नाहींत. म्हैसूर संस्थानामध्ये दहा बारा वर्षें राहून तेथील बिट्टिदेव (विष्णुवर्धन) राजाला आपला अनुयायी करून जैनांचा संहार करण्याचें काम त्यांनी मोठ्या शिताफीनें चालविलेंच होतें!  पुष्कळ जैनांची डोकीं तेलाच्या घाण्यांत घालवून त्यांनी फोडविलीं, असें त्यांचे अनुयायी मोठ्या प्रौढीनें सांगत आले आहेत. परंतु एस्. कृष्णस्वामी आय्यंगार यांचें म्हणणें कीं, या गोष्टी काल्पनिक असाव्यात. १   कांहीं असो, पण प्रसंग आला असतां रामानुजाचार्यांनी अशा गोष्टी करण्यास मागें पाहिलें नसतें खास. कां कीं, रामानुज त्यांच्या पूर्वीच्या शैव सांप्रदायिकांसारखेच एक सांप्रदायिक होते. त्यांच्या आणि शैवांच्या क्रूरतेंत व हिंसेंत फरक अंशांचा असेल, पण जातीचा नव्हता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Ancient India, pp. 258-60 पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२६५. हा फरक खुद्द महादेव व विष्णु यांच्यांतच दिसून येतो. दोघे देव प्रसंगवशात् दैत्यांचा संहार करणारेच आहेत. तथापि विष्णु महादेवाइतका तीव्र नाहीं. महादेव म्हटला म्हणजे भूतपिशाचांचा राजाच तो!  त्याच्या संप्रदायांत पाशुपत आणि कापालिक यांच्यासारखे अघोरी पंथ उत्पन्न होणें साहजिकच होतें. पण वासुदेवाच्या भक्तांत इतका अघोरीपणा येणें शक्य नव्हतें. त्यामुळें जेथें जेथें बौद्ध आणि जैन संप्रदायांचें वर्चस्व नुकतेंच नष्ट होत चाललें होतें, तेथें तेथें वासुदेवाची किंवा विष्णूची पूजा लोकप्रिय होत गेली. असाच प्रकार दक्षिणेंत घडला. तिकडे शैवांनी बौद्ध व जैन पंथांना संपुष्टांत आणल्यावर वासुदेवाची पूजा फैलावयास लागली. पण त्या पूजेला वैदिक संप्रदायाचा आधार नसल्यामुळें ती वरिष्ठ लोकांत तितकी आदरणीय झाली नाहीं. यासाठीं रामानुजानें श्रीभाष्य व इतर संस्कृत ग्रंथ लिहून विष्णुपूजेला महत्त्व देण्याचा प्रयत्‍न केला; व तो थोड्याबहुत प्रमाणानें सफलहि झाला.

२६६. रामानुजानंतर दक्षिणेंत दुसरा एक वैष्णव संप्रदाय निघाला. त्याचा पुरस्कर्ता मध्वाचार्य ११९७ सालीं जन्मला व १२७६ किंवा ७७ सालीं निवर्तला. ह्या कालांत उत्तरेकडे मुसलमानाचें आधिपत्य सुदृढ होत चाललें होतें. मशीदी आणि इदगे जिकडे तिकडे होत होते, व जबरदस्तीनें लोकांना मुसलमान बनवण्यांत येत असे. असें असतां दक्षिणेकडे हे ब्राह्मण पुढारी नवीन पंथ स्थापण्यांतच भूषण मानीत होते!  जशी राजकीय बाबतींत अंदाधुंदी होती, तशी ती धार्मिक बाबतींतहि होती असें म्हटलें पाहिजे. एकाद्या लहानशा जमीनदारानें उठावें, कांही सैन्य गोळा करावें व आजूबाजूचा प्रदेश काबीज करून आपणच एक राजा होऊन बसावें; त्याचप्रमाणें एकाद्या विद्वान् ब्राह्मणानें पुढें यावें, ब्रह्मसूत्राचें आपणास अनुकूल असें भाष्य लिहावें, आणि एक संप्रदाय व परंपरा स्थापन करावी; आणि राजे लोकांना जसें सामान्य जनतेच्या दु:खाबद्दल कांहींच वाटत नव्हतें, तसेंच यानांहि सामान्य जनतेचें दु:ख काय आहे हें मुळींच ठाऊक नव्हतें. राजे लोक ऐषआरामांत व हे आपल्या संप्रदायांत गर्क होऊन राहत.

२६७. रामानुज व मध्व या दोघांनी गोपींना मुळींच महत्त्व दिलें नाहीं. त्यामुळें हे दोन संप्रदाय कर्मठ राहिले. परंतु निंबार्क, वल्लभ व चैतन्य ह्या तीन वैष्णव पुढार्‍यांनी राधेला व गोपींना पुढें आणल्यामुळें त्यांच्या संप्रदायांत शिथिलता शिरली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel