पुराणांचा हल्ला

२२०. गुप्त राजे स्वत:  वासुदेवाचे भक्त होते. तरी पण त्यांच्या कारकीर्दींत त्यानीं बौद्धांचे पुष्कळ विहार बांधले, व संघारामांना इनामें दिलीं. त्यांच्या राजवटींत ब्राह्मणांनी पुराणें हातीं घेऊन त्यांत वाटेल तेवढे फेरफार केले. तरी देखील उघड रीतीनें बुद्धावर हल्ला करणें त्यांना शक्य नव्हतें, म्हणून बुद्ध हा एक वासुदेवाचा अवतार आहे, असें समजण्यास त्यांनी हरकत घेतली नाहीं. पण शीलादित्यानंतर बुद्धाला विष्णूचा अवतार समजणें ही एक मोठी अडचण ब्राह्मणांच्या आड येऊं लागली असें दिसतें सामान्य जनतेंत गैरसमज फैलावण्याला ही एक मोठी आडकाठी होती.

२२१. इकडे शैव धर्माच्या प्रभावानें राजे लोकांकडून बौद्धांचा छळ चालू होताच; पण जनतेंत त्यांच्याविषयीं थोडाबहुत आदर कायम राहिला होता. त्याच्यावर शंकराचार्यांनी असा तोडगा काढला कीं, हा बुद्ध म्हणजे लोकांना मोहांत पाडून त्यांचा नाश करूं पहाणारा आहे. ते म्हणतात, ‘अपि च बाह्यार्थ-विज्ञान-शून्यवादत्रयमितरेतरविरुद्धमुपदिशता सुगतेन स्पष्टीकृतमात्मनोSसंबद्धप्रलापित्वं प्रद्वेषो वा प्रजासु विरुद्धार्थप्रतिपत्या विमुह्येयुरिमा: प्रज्ञा इति| ( आणखी बाह्यार्थ, विज्ञान व शून्य असे परस्पर विरुद्ध तीन वाद उपदेशाणार्‍या सुगतानें आपला बडबड करण्याचा स्वभाव, किंवा परस्पराविरुद्ध मार्गाचें अवलंबन करून जनता मोहांत पडावी अशा बु्द्धीनें आपला जनद्वेष स्पष्ट करून दाखविला ).

२२२. ही शंकराचार्यांनी दिलेली सूचना पौराणिक ब्राह्मणांनी उचलली, व अशाच तर्‍हेचा मजकूर ज्या त्या पुराणांत घुसडून दिला. त्याचा चांगला नमुना विष्णुपुराणांत सांपडतो;  तो असा -“देवासुरांच्या युद्धांत देवांचा पराजय झाला. तेव्हां त्यांनी क्षीरसागराच्या उत्तरेस जाऊन तप आरंभिलें, आणि विष्णूजवळ जाऊन त्याचें स्तोत्र गाइलें. विष्णु त्यांना प्रसन्न झाला; व स्वशरीरांतून मायामोह निर्माण करून तो त्यानें देवांना दिला. मायामोह मुंडी, दिंगबर व मोराचीं पिसें धारण करणारा होऊन असुरांजवळ गेला, व मधुर वाणीनें त्यांना म्हणाला, ‘हे दैत्यपतिहो! तुम्ही ही तपश्चर्या कां करतां?’ ते म्हणाले, ‘पारत्रिक फललाभासाठीं आम्ही हें तप करतों. येथें तुझें म्हणणें काय?’ तेव्हां तो म्हणाला, ‘हाच धर्म मोक्षदायक आहे. त्यांत स्थिर होऊन तुम्ही मुक्ति मिळवाल.’ अशा रीतिनें मायामोहानें अनेकान्तवाद (स्याद्वाद) सांगून त्या दैत्यांना वैदिक धर्म सोडावयास लावलें.

२२३. “त्यानंतर रक्तपट धारण करून आणि जितेन्द्रिय होऊन मायमोह दुसर्‍या असुरांपाशीं गेला, व त्यांस म्हणाला, ‘स्वर्गाची किंवा निर्वाणाची इच्छा करीत असाल, तर तुम्ही पशुघातादिक दुष्ट कर्में करूं नका. जग विज्ञानमय आहे असें समजा. असेंच संबुद्धांनी सांगितलें आहे.’ अशा रीतीनें नानाप्रकारच्या युक्त्या लढवून मायामोहानें त्या दैत्यांनाहि वैदिक धर्मापासून परावृत्त केलें. त्यानंतर देवांनी त्यांच्याशीं युद्ध करून त्यांचा उच्छेद केला.” (विष्णुपुराण, अंश ३, अ. १७-१८)

२२४. त्यानंतर पराशर मैत्रेयाला एक गोष्ट सांगतो ती अशी – “राजा शतधनु आणी त्याची राणी शैव्या या दोघांनीहि जनार्दनाच्या आराधनेसाठीं व्रत आरंभिलें. एकदां कार्तिकी एकादशीला गंगेत स्नान करून तीं दोघेंहि वर आलीं असतां त्यांनी समोरून येणार्‍या एका पाषंडीला पाहिलें. राजाला ज्यानें धनुर्विद्या शिकविली, त्याचा हा पाषंडी मित्र होता. म्हणून राजानें त्याच्याशीं मैत्रीनें गोष्ट केल्या. पण राणी संयमी असल्याकरणानें सूर्याकडे दृष्टि लावून बसली. नंतर त्यांनी विष्णूची पूजा केली.

२२५. “कांहीं काळानें राजा मरण पावला. त्याच्या बरोबर राणी सती गेली. परन्तु राजा त्या पापाचरणानें कुत्रा झाला, आणि राणी पूर्वजन्मीचें ज्ञान असलेली काशिराजकन्या झाली. आपला पति विदिशानगरींत कुत्रा होऊन जन्मला आहे हें तिनें जाणलें, व तेथें जाऊन त्याला चांगला आहार वगैरे देऊन त्याचा सत्कार केला. त्यामुळें तो शेपूट वगैरे हालवून कुत्र्याचे चाळे करूं लागला. ती फार लाजली व म्हणाली, ‘महाराज! तुम्ही कोणत्या कारणानें कुत्र्याच्या योनींत पडलां, व माझ्या समोर असले चाळे करतां याचा विचार करा. तीर्थस्नानानन्तर पाषंड्याशीं संभाषण केल्यानें ही कुत्सितयोनि तुम्हाला मिळाली, ह्याचें स्मरण नाहीं काय ?’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel