१०४. “तदनन्तर पिलिंदवच्छानें भगवंतापाशी दूत पाठवून आरामिक ठेवण्यासाठीं परवानगी मागितली; व भगवंतानें ती दिली. त्यानन्तर पुन्हा एकदां बिंबिसार राजा त्याजपाशी आला. तेव्हां आरामिक ठेवण्यास भगवंताची परवागनी मिळाल्याचें त्याला समजलें; व तो म्हणाला, ‘असें आहे तर, भदन्त, मी तुम्हाला एक आरामिक देतों.’

१०५. “बिंबिसार राजा कार्यव्यग्रतेमुळें ती गोष्ट विसरून गेला. पण कांही काळानें त्याला आठवण झाली, व तो आपल्या महामात्याला म्हणाला, ‘तुम्ही पिलिंदवच्छाला आरामिक दिला काय?’ ‘नाहीं’ असें उत्तर मिळाल्यावर तो म्हणाला, ‘आरामिक देण्याचें वचन देऊन आजला किती दिवस झाले?’ महामात्यानें दिवस मोजून ‘पांचशें दिवस झाले’ असें राजाला सांगितलें. तेव्हां राजानें पिलिंदवच्छाला पांचशें आरामिक देण्याची आज्ञा केली. त्या पांचशे आरामिकांचा एक गांवच वसला. त्याला ‘आरामिकग्रामक’ किंवा ‘पिलिंदवच्छग्रामक’ असें म्हणत”. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ महावग्ग, भेसज्जक्खन्धक ).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०६ ही गोष्ट बुद्धसमकालीं घडलेली नव्हे. ती अशोकानंतर रचली आहे, यांत शंका नाही. अशाच प्रकारची दुसरी एक गोष्ट ह्यूएनू त्संग याच्या प्रवासवृत्तांत सांपडते. तिचा सारांश येथें देणें योग्य वाटतें.

१०७. “काश्मीरच्या राज्याचा परिघ सात हजार ली आहे; व तें चारी बाजूला डोंगरांनी वेढलें आहे... बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर आनंदाचा शिष्य अरहन्त माध्यान्तिक ह्या देशांत आला. त्यावेळी हा प्रदेश एक मोठा तलावच होता; व येथें एक नाग रहात होता. माध्यान्तिक अरहन्तानें आपल्या ऋद्धिबलानें नागाला वश करून घेतले, व ह्या तलावाचें पाणी शोषण करावयास लावलें. त्यामुळे हा प्रदेश वस्तीला योग्य बनला. पण नागाला रहाण्यास जागा नव्हती. तेव्हां अरहन्तानें ह्या प्रदेशाच्या वायव्येला असलेल्या एका लहानशा तलावांत रहाण्यास त्याला जागा दिली. तदनन्तर तो नाग म्हणाला, ‘हा प्रदेश मी तुम्हाला दान देतों.’ माध्यान्तिक म्हणाला, ‘मी लवकरच निर्वाणाला जाणार आहें; तेव्हां तुझे दान घेऊन मला काय करावयाचें ?’ नाग म्हणाल, ‘जर हें शक्य नाहीं, तर जोंपर्यंत बुद्धाचा धर्म अस्तित्वांत असेल तोपर्यंत माझें हें दान पांचशे अरहन्तांना स्वीकारूं द्या.’

१०८. “त्याच्या विनंतीला अनुसरून माध्यान्तिक अरहन्तानें त्या प्रदेशांत पांचशे संघाराम (विहार) बांधले; व आजूबाजूच्या प्रदेशांतून गरीब लोकांना विकत घेऊन त्या संघारामांचे आरामिक बनविलें. माध्यान्तिकाच्या मरणानंतर हे आरामिक आजूबाजूच्या प्रदेशांचे राजे झाले. परंतु आजूबाजूचे लोक त्यांना हीन समजत व ‘क्रीत’ ( विकत घेतलेले ) १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ चिनी शब्द कि-लि-तो याजपासून संस्कृत क्रीत असावयास पाहिजे. पण भाषांतरकार Samuel Beal यांनी क्रितीय असा शब्द दिला आहे. किरात म्हणून जे लोक होते, व ज्यांचा महाभारतांत अनेक ठिकाणीं उल्लेख सांपडतो, तेच तर हे क्रीत नसतील ना? ) म्हणत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी