७०. “आमच्या स्वराज्यांत तुमच्या सारख्या परिग्रही माणसांना प्रवेश मिळाला, तर त्यांत अहिंसा आणि सत्य एक दिवसहि टिकाव धरून रहाणार नाहींत. तुमच्या परिग्रहाच्या रक्षणासाठीं आम्हाला आठहि प्रहर हिंसा करण्याला तयार रहावें लागेल. आणि तेवढ्यानें न भागल्यामुळें श्रमणब्राम्हणांनी जशीं खोटींनाटीं पुराणें रचलीं, तशीं तीं आम्हालाहि रचावीं लागतील; किंवा आजकालच्या अधिकारी वर्गाप्रमाणें सेफगार्डांच्या घटना व राष्ट्रसंघाच्या रचना कराव्या लागतील. म्हणजे पुन्हा असत्याच्या आणि हिंसेच्या महापंकांत लोळण्याची आमच्यावर पाळी येईल. यासाठीं परिग्रही लोकांना आम्ही आमच्या स्वराज्यांत थारा देऊं इच्छीत नाहीं.”

७१. त्यावर आजकालचे आमचे सुसम्पन्न लोक म्हणतील कीं, ‘असें आहे तर आम्ही इंग्रजांची कास कां धरूं नये.’ “पण गृहस्थहो ! इंग्रजांची कास धरून तुमच्या इस्टेटी आणि संस्थानें तुम्ही चिरकाळ बाळगूं शकाल, हा तुमचा निवळ भ्रम आहे. इंग्रजांपेक्षां किती तरी पटीनें झारचें आणि रशियन अमीरउमरावांचें सामर्थ्य जास्त होतें. पण तें गेलें कोठें ?  जो झार कोट्यावधि लोकांना रणक्षेत्रांत मृत्युमुखीं पाठवूं शकला तो स्वतः बायकोपोरांसकट असहाय होऊन मरण पावला ! आजकाल रशियाचे ते उन्मत्त अमीरउमराव कोठें आहेत ?  पॅरिस, न्यूयॉर्क वगैरे शहरांत दरवानांची किंवा मोटार हाकण्याचीं कामें करून कसा बसा आपला निर्वाह करीत आहेत ! पाश्चात्य भांडवलवाल्यांनी त्यांना एवढा तरी आश्रय दिलेला आहे. पण तुम्हाला तोहि मिळणें शक्य नाहीं. हिन्दुस्थान सोडून पळून जाण्याची जर तुमच्यावर पाळी आली, तर तुम्ही एशियाटिक म्हणून तुम्हाला अमेरिकेंत प्रवेशच मिळावयाचा नाहीं; आणि युरोपांत प्रवेश मिळाला तरी दरवानाचीं आणि इतर कामें तुम्हाला कोणी देणार नाहीं. कां कीं, युरोपीय कामगारच बेकारीनें ग्रस्त झालेले आहेत. अशा परिस्थितींत तुम्ही इंग्रजांना शरण जाऊन जरी कांहीं काळ आत्मरक्षण करूं शकलां, तरी निर्भय राहूं शकणार नाहीं. आणि सतत भयभीतपणें काळ कंठणें हा तर नुसता नरकवास आहे. यांतून तुम्हांला मोक्ष पाहिजे असेल, तर तुमच्या परिग्रहाची वासना सोडा, व आमच्या बरोबर या. सर्व लोकांच्या सेवेंत जो अप्रतिम आनन्द आहे, त्याचे तुम्ही भागीदार व्हा.”१ हा उपदेश महात्मा गांधींच्या तोंडीं शोभणार नाहीं असें कोण म्हणेल ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. विनयपिटकांतील चुलवग्गांत शाक्यांच्या भद्दिय राजाची गोष्ट आहे. इतर पांच शाक्य कुमार व उपाली न्हावी यांच्याबरोबर तो तरुणपणींच भिक्षु होऊन एकांतवासांत रहात असतां, ‘अहो सुखं, अहो सुखं’ असे उद्‍गार काढीत असे. ते ऐकून कांहीं भिक्षूंना अशी शंका आली कीं, त्याला आपल्या राज्यसुखाची आठवण होत असावी. भगवंताला ही गोष्ट समजली, आणि त्यानें भद्दियाला बोलावून आणून या प्रकरणीं चौकशी केली. तेव्हां भद्दिय म्हणाला, “भगवान्, मी राजा असतांना माझ्या रक्षणासाठीं राजवाड्यांत आणि राजवाड्याबाहेर, नगरांत आणि नगराबाहेर, देशांत आणि देशाबाहेर जय्यत तयारी ठेवण्यांत येत असे. असें असतांहि मी भयभीत, उद्विग्न, साशंक व त्रस्त वृत्तीनें रहात होतों. परंतु आतां मी अरण्यांत किंवा एकांतस्थळीं, निर्भय, अनुद्विग्न, निःशंक व निस्त्रस्त वृत्तीनें संचार करीत असतो; आणि त्यामुळेंच माझ्या तोंडून ‘अहो सुखं, अहो सुखं’ हे उद्‍गार निघतात.”

हा झाला राज्यसुखत्यागाचा आनंद. आणखी शांतिदेवाचार्य आपल्या बोधिचर्यावतारांत म्हणतात-

सर्वत्यागश्च निर्वाणं निर्वाणार्थि च मे मनः ।
त्यक्तव्यं चेन्मया सर्वं वरं सत्वेषु दीयताम् ।।

(सर्वस्वाचा त्याग हेंच निर्वाण, आणि त्याची मी इच्छा धरतों. जर सर्वस्व मला सोडावयाचें आहे, तर तें प्राणिमात्रांच्या हितासाठीं द्यावें हें बरें.)

मुच्यमानेषु सत्त्वेषु ये ते प्रामोद्यसागराः ।
तैरेव ननु पर्याप्तं मोक्षेणारसिकेन किम् ।।

(प्राणिमात्र दुःखांतून मोकळे झाले असतां जे आनंदसागर मिळतील, तेवढ्यानें तृप्ति होणार नाहीं काय ? अरसिक मोक्ष कां हवा ?)

मनुष्यजातीसाठीं आपल्या लहान मोठ्या इस्टेटींचा त्याग केल्यानें आमचे धनिक लोक अशा अप्रतिम आनंदाचे वांटेकरी होणार नाहींत काय ? )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी