( त्यांचें हें दर्शन अल्पापराध आहे; कारण ते ज्ञानाला नित्य समजतात). म्हणजे अद्वैत्यांच्या मतानें ज्ञान नित्य आहे हाच काय तो त्यांच्या दर्शनांत दोष; इतर बाबतींत त्यांच्या दर्शनांत व बौद्ध दर्शनांत मुळींच फरक नाहीं, असें शांतरक्षिताचार्याचें म्हणणें दिसतें. शांतरक्षिताचार्याचा काल. इ. स. ७०५ ते ७६२ पर्यंतचा समजला जातो. १ ( १ तत्वसंग्रह [ Forward ] पृष्ठ १०-१६. ) अर्थात् तो व गौडपादाचार्य समकालीन असणें संभवनीय आहे; व त्या कालापर्यंत बौद्धांत आणि अद्वैतवाद्यांत कोणत्याहि रीतीनें तंटा नव्हता, असें मानण्यास हरकत नाहीं.

२१७. परंतु शंकराचार्याच्या वेळीं हा मनु पालटला. ते बौद्धांचे कट्टे शत्रु झाले. त्याचीं कारणें काय झालीं, हें सांगतां येणें कठिण आहे. एकतर दक्षिणेंतून येतांनाच त्यांनी श्रमण-विद्वेष बरोबर आणला असावा, किंवा त्यांच्या वेळीं उत्तर हिंदुस्थानांत शैव संप्रदायाचें प्राबल्य वाढत गेल्यामुळें आपण हि त्यांतच शिरून बौद्धांवर व जैनांवर हल्ला करणें त्यांना फायदेशीर वाटलें असावें. असें असलें तरी गौडपादांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांना त्याग करतां येणें शक्य नव्हतें. गौडपाद उघड रीतीनें बुद्धभक्त होते, पण शंकराचार्य ‘प्रच्छन्नबौद्ध’ बनले, एवढाच काय तो फरक.

२१८. शंकराचार्यांनी सर्व बौद्धांना हिंदुस्थानांतून हांकून दिलें अशीहि एका किंवदंती आहे. परंतु ती ऐतिहासिक नव्हें. शंकराचार्यांच्या वेळीं बौद्ध धर्म मोडकळीला आला होता; व त्याचें श्रेय बौद्ध श्रमणांच्या आळसाशिवाय दुसर्‍या या कोणलाहि द्यावयाचें असेल तर तें पाशुपतादिक शैव सन्याशांना, त्यांना आंतून फूस देणार्‍या ब्राह्मणांना आणि मदत करणार्‍या शैव राजांना द्यावें लागेल. शंकराचार्यांनी या कामीं आपणाकडून शक्य तें साहाय्य केलें यांत शंका नाहीं. पण बौद्ध धर्म त्यांच्या नंतर महंमद घोरीच्या स्वार्‍यांपर्यंत पूर्व हिंदुस्थानांत कसा बसा टिकाव धरून राहिला होता. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि. ३|१३७ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२१९. बनारसजवळ सारनाथ म्हणून बौद्धांचे एक प्रसिद्ध स्थान आहे. येथें बुद्धानें आपल्या पहिल्या पांच शिष्यांना उपदेश केला हें वर सांगण्यांत आलेंच आहे. त्या स्थानाच्या जवळच सारनाथ नांवाचें महादेवाचें लिंग आहे. आजूबाजूच्या लोकांची समजूत अशी आहे कीं, जवळच्या बौद्धांना हांकून दिल्यावर शंकराचार्यांनी ह्या लिंगाची स्थापना केली. ही समजूत निखालस निराधार आहे. महमूद गझनी यानें प्रथमत: तेथील बौद्धांचे विहार लुटले असावे. परंतु त्याची स्वारी येऊन गेल्याबरोबर बंगालच्या महिपाल राजाच्या कारकीर्दीत इ.स. १०२६ सालीं स्थिरपाल व वसंतपाल या दोन श्रीमंत बंधूंनी तेथील एकूणएक इमारतींची डागडुजी केली. त्यानंतर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धांत कनोज येथील गोविंदचन्द्र राजाच्या कुमारदेवी नांवाच्या राणीनें धर्मचक्र-जिनविहार नांवाचें एक मोठें मंदिर बांधलें. गोविंदचन्द्र राजा. इ.स. ११५४ पर्यंत राज्य करीत होता. अर्थात् त्याच्या कारकीर्दीत सारनाथ येथील सर्व इमारती शाबूत होत्या हें सांगणें नलगे. त्यांचा उच्छेद महंमद घोरीच्या वेळीं झाला असला पाहिजे हें उघड आहे.२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ Guide to the Buddhist Ruins of Sarnath, by Rai Bahadur Daya Ram Sahni पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel