१५८. भगवद्‍गीतेला इ.स. पूर्वीं पहिल्या शतकांत घालण्याचे जे प्रयत्‍न चालू आहेत, ते सर्व निष्फळ दिसतात. हेलियोदोरानें बेसनगर येथें गरुडध्वज बांधला म्हणून जर गीता त्याच्या काळची ठरते, तर वेदांत शेंकडों ठिकांणी वृत्राचें नांव आलें. असल्याकारणानें महाभारतांतील वृत्रगीता वेदाच्या पूर्वींची कां ठरूं नये? चूळनिद्देसांतील वासुदेवाच्या निर्देशावरून त्या वेळीं भगवद्‍गीता होती हें कसें सिद्ध होतें ? गीतेला बालादित्याच्या समकालीन समजल्यानें गीतेची किंमत कमी होईल असेंहि आम्हास वाटत नाहीं. कां की, प्राचीनतम ठरल्यानें ग्रंथाची किंमत वाढते, ही समजूत चुकीची आहे.

१५९. गीता वासुदेवाच्या तोंडीं घालण्याचें कारण एवढेंच कीं, तो गुप्त राजांचा कुलदेव होता. लढाई सोडून देण्याची वृत्ति नष्ट करण्यासाठीं प्रसंग युद्धभूमीवरचा आणला आहे. तरी पण बालादित्याला बौद्धांच्या निर्वाणाचीहि आवड होतीच. तेव्हां दुसर्‍याच अध्यायांत ही ब्राह्मी स्थितिहि घुसडून दिली आहे. त्यानंतर बालादित्याची आवड-निवड पाहून ग्रंथकारानें सांख्य, योग इत्यादिकांचीहि या ग्रंथांत वाटेल तेवढी भेसळ केली आहे; विश्वरूप दर्शनाचाहि काव्यात्मक प्रसंग आणला आहे. असा हा ग्रंथ त्या काळच्या अधिकारी वर्गाला प्रिय झाला यांत मुळींच आश्चर्य नाहीं. इकडे तिकडे थोडाबहुत फेरफार केला असतां आजकालच्या अधिकारी वर्गालाहि हें तत्त्वज्ञान पटण्याजोगें आहे.

१६०. समजा. एकादा रॉम्से म्याकडोनल्डसारखा शांततावादी मुत्सद्दी सध्या चाललेल्या युद्धाच्या तयारीच्या प्रसंगीं राजकारणाचीं शस्त्रास्त्रें खालीं ठेवून म्हणाला, ‘हे जर्मन, हे फ्रेंच, हे सर्व आमचे सखे सोयरे आहेत. त्यांची व आमची संस्कृति एक आहे. त्यांत आमचे गुरु आहेत. आमच्यांत त्यांचे पुष्कळसे नातेवाईक आहेत. तेव्हां त्यांच्याशीं लढण्याची तयारी करण्यापेक्षां त्यांनीच आम्हांला मारावें हे अधिक श्रेयस्कर आहे ( आम्ही सत्याग्रह करूंया).’ त्यावर भांडवलशाहीचा भगवान् म्हणेल, ‘कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्. अरे गृहस्था, अशा बिकट प्रसंगीं हें दौर्बल्य तुला आलें कोठून ? मी हें भांडवलशाहीचें जग गुणकर्मविभागश: निर्माण केलें आहे. यांत सर्व गुण भांडवलवाल्यांपाशीं व सर्व कर्म ( म्हणजे काम) मजुरांपाशीं देण्यांत आलें आहे. अशा जगांत उत्पन्न झालेला जो तूं त्यानें जर हें चक्र पुढें चालवलें नाहीं, तर हें जग नष्ट होऊन जाईल ( बोल्शेव्हिकी होईल). हें पहा, मला कांहीच कर्में करण्याची जरूरी नाहीं. असें असतां मी इतरांप्रमाणें कर्में कां करतों ? कारण भांडवलशाही रक्षण्याचें काम जर मी केलें नाहीं, तर मी संकराचा कर्ता होईन. म्हणजे भांडवलवाले आणि मजूर यांची भेसळ होऊन जाईल; व त्यायोगें भांडवलवाल्यांचें जग नष्ट होईल! यासाठीं लढणें तुला योग्य आहे. माझें स्मरण कर, व युद्धाला तयार हो.’

१६१. दुसरा एकादा शांततावादी जपानी परराष्ट्रमंत्री म्हणेल, ‘ह्या चिनी लोकांपासून आम्ही सर्व कलाकौशल्य शिकलों. त्यांनीच आम्हाला बौद्ध धर्म दिला. अशा आमच्या गुरुतुल्य देशाला त्रास देऊन आमची राज्यतृष्णा शमविणें योग्य नाहीं. याच्यापुढें मी त्यांच्याशीं मैत्रीभावानें वागण्याचा मार्ग स्वीकारीन!’ असें म्हणून तो जर आपलीं राजकारणाचीं सूत्रें मृदुपणें हालवूं लागला, तर जपानी भगवान् आराकीसारख्या युद्धसारथ्याच्या रूपानें प्रगट होऊन म्हणेल, ‘अरे वेड्या, हे कसले विचार घेऊन बसला आहेस ? हा आत्मा विनाशी किंवा अविनाशी असला, तरी देखील युद्धच श्रेयस्कर आहे. कारण आत्मा अविनाशी असला तर गुरूंना मारलें तरी त्यांचा आत्मा मरत नाहीं. जर त्यांचा आत्मा विनाशीं आहे असें धऱलें, तर नाशवंताचा नाश केल्यास पाप कोणतें ? तुला ह्या दिवाणगिरीवर चढवण्याला मी कारण आहें; आणि आतां आयत्या वेळीं तूं जर रणक्षेत्र सोडून पळूं लागलास, तर तुझी सर्व लोक अपकीर्तिं गातील. तेव्हां माझें स्मरण करून युद्धाला सिद्ध हो.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel