ब्राह्मणांना पुराणें फायदेशीर झालीं.

१९४. ह्या अवधींत ब्राह्मणांनी पुराणांवर फार जोर दिला असें दिसून येतें. बौद्धांच्या बोधिसत्त्वाच्या कथा म्हटल्या म्हणजे फारच सौम्य असावयाच्या. कां कीं, श्रमण लोक अहिंसेचें अतिक्रमण करूं शकत नसत. परंतु ब्राह्मणांना हा निर्बंध मुळींच नव्हता. यज्ञयाग बंद पडल्यामुळें त्यांची व्यावहारिक पशुहिंसाहि बंद पडली; व कदाचित् त्याच कारणानें ह्या पुराणांच्या रूपानें ब्राह्मणांच्या हिंसक वृत्तीला अनेक फांटे फुटले; आणि त्यांत बीभत्स व रौद्र ह्या रसांचीहि रेलचेल होऊन गेली.

१९५. काव्यरस म्हटला म्हणजे तो थोड्या बहुत प्रमाणानें मादक असावयाचाच. तो लोकांना पाजण्यास बौद्ध श्रमणांनी सुरुवात केली. तरी अहिंसेचें ध्येय त्यांच्या समोर असल्याकारणानें काव्यरस लोकांना हानिकारक होईल अशा बेतानें उत्पन्न करणें त्यांना शक्य नव्हतें. ब्राह्मणांना लोकांची परवा मुळींच नव्हती. अर्थात् त्यांनी श्रृंगारादि काव्यरस इतके तीव्र केले कीं, लोकांना त्यांचें व्यसनच लागून गेलें. गुप्तांच्या राज्यांत मद्यपानाला बंदी असल्याकारणानें हें पौराणिक नवरसांचें मानसिक मद्य लोकांना अतिशय आवडूं लागलें असावें. आजकालच्या सिनेमांवर जशी सेन्सरची देखरेख असते, तशी ती गुप्त राजांकडून पुराणांवर ठेवण्यांत आली असती, तर एकहि पुराण दोषारोपांतून मुक्त होऊं शकलें नसतें. पण हें कांहीं तरी धार्मिक आहे अशा समजुतीनें त्यांनी ब्राह्मणांच्या ह्या कृतींत हात घातला नसावा; आणि कडक दारू पिणार्‍या लोकांना जशी आणखीहि कडक दारू हवी असते, त्याप्रमाणें हिंदी जनतेला ह्या पुराणांची अधिकाधिक चट लागली असावी.

१९६. ब्राह्मणांना तर ही एक उत्पन्नाची मोठी किफायतशीर अशी खाणच सांपडली म्हणाना. इतके तिकडे पुराणें सांगून व लोकरंजन करून दक्षिणा तर मिळत असेच; आणि त्यांतल्यात्यांत पुराणांत जेथें तेथें ब्राह्मणांचें महत्त्व घुसडून देण्यासहि चांगलीच संधि मिळत असे. राजे लोकांकडून मिळवलेल्या इनामांचे रक्षण करण्यासाठीं व्यासाच्या नांवाचा व पुराणाच्या आधाराचा ते कसा उपयोग करीत, ह्याचीं बरींच उदाहरणें त्यांनी मिळवलेल्या ताम्रपटांत सांपडतात. नमुन्या दाखल त्यापैकीं येथें एक देतों.


१९७. उक्तं च महाभारते भगवता व्यासेन -
स्वदत्तां परदत्तां व यत्‍नाद्रक्ष युधिष्ठिर |
महीं महीमतां श्रेष्ठ दानाच्छेयोनुपालनम् ||
बहुभिर्वसुधा भुक्ता राजभि: सगरादिभि: |
यस्य यस्य यदा भूमिस्तस्य तस्य तदा फलम् ||
प्रायेण हि नरेन्द्राणां विद्यते शानुभागति: |
पूयन्ते ते तु सततं प्रयच्छन्तो वसुन्धराम् ||
षष्टिवर्षसहस्त्राणि स्वर्गे मोदति भूमिद: |
आच्छेत्ताSनुमन्ता च तान्येव नरके वसेत् ||
आस्फोटलन्ति पितर: प्रवल्गन्ति पितामहा: |
भूमिदोSस्मत्कुले जात: स नस्त्राता भविष्यति ||
सर्वसस्यसमृद्धां तु यो हरेत वसुन्धराम् |
स्वविष्ठायां कृभिर्भूत्वा पितृभिस्सह मज्जति ||१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Corpus Inscriptionum Indicarum, iii, 119. १३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel