९२. “ वाराणसीच्या ब्रम्हदत्त राजाच्या मुलाचें नांवहि ब्रम्हदत्त राजाच्या मुलाचें नांवहि ब्रम्हदत्तच होतें. पूर्वींचे राजे आपले मुलगे निरभिमानी, शीतोष्ण सहन करणारे व लोकव्यवहार जाणणारे व्हावे अशा हेतूनें त्यांचें शिक्षण आपल्या राजधानींत न करतां त्यांना दूरच्या राष्ट्रांत पाठवीत असत. त्याप्रमाणें ब्रम्हदत्त राजानेंहि आपल्या मुलाला तक्षशिलेला पाठविलें. तेथें एका आचार्यगृहीं तो विद्याभ्यास करूं लागला. तो आचार्याबरोबर स्नानाला जात होता. वाटेंत एका बाईनें पांढरें तीळ वाळत टाकले होते. राजकुमारानें त्यांतले मूठभर तीळ खाल्ले. म्हातारी कांही बोलली नाहीं. दुसर्‍या दिवशींहि तोच प्रकार झाला. पण तिसर्‍या दिवशीं जेव्हां राजकुमारानें तीळ खाल्ले, तेव्हां म्हातारीनें आपले तीळ चोरतात, अशी आरडाओरड केली. या प्रकरणीं चौकशी करून आचार्य तिला म्हणाला, ‘ बाई, उगाच रडूं नकोस. त्यांची किंमत तुला दिली जाईल.’ ती म्हणाली, ‘ महाराज ! मला किंमत नको आहे. पण हा कुमार पुन्हा हें कृत्य करणार नाहीं असा याला दण्ड करा.’ आचार्यानें बांबूच्या काठीचा राजकुमाराच्या पाठीवर त्या बाई समोर तीनदां प्रयोग केला. राजकुमाराच्या पायांच्या तळव्यांची आग मस्तकाला पोंचली !

९३. “ शिक्षण संपल्यावर राजकुमार वाराणसीला आला. वडील ब्रम्हदत्तानें आपल्या हयातींतच त्याला अभिषेक केला. तेव्हां त्याला आपल्या गुरूनें केलेल्या अपराधाची आठवण झाली. दूत पाठवून त्या नवीन राजानें आचार्याला वाराणसीला येण्याचें आमंत्रण केलें. त्याप्रमाणें आचार्य वाराणसीला आला. राजसभेंत प्रवेश केल्यावर त्याला पाहून राजा आपल्या मंडळीला म्हणाला,
‘भो ! याच्या मारण्यानें आज देखील माझी पाठ दुखत आहे. आचार्य कपाळावर मरण घेऊन आलेला आहे. ह्यांतून तो कसा वांचणार ? आचार्य म्हणाला, ‘ महाराज, त्या वेळीं जर मी तुम्हाला शिक्षा केली नसती, तर हळू हळू चोरीची संवय वाढत जाऊन तुम्ही प्रसिद्ध चोर झालां असतां, व राजपदाला मुकला असतां.’ तें ऐकून राजाचे अमात्य म्हणाले, ‘ महाराज ! आचार्य म्हणतो तें सत्य आहे. हें वैभव आचार्यामुळेंच तुम्हाला मिळालें असें समजलें पाहिजें.’ महाराजाला ही गोष्ट पटली, व आपले सर्व राज्य आचार्याला देण्याला तो प्रवृत्त झाला. परन्तु आचार्यानें त्याचा स्वीकार केला नाहीं. तेव्हां राजानें तक्षशिलेहून आचार्याच्या बायकांमुलांना वाराणसीला आणवीलें, व आचार्याला आपलें पुरोहितस्थान दिलें.”१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. तिलमुट्ठिजातक, क्रमांक २५२.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
९४. ब्राम्हणवर्गांत अशा रीतीच्या निस्पृह व न्यायी व्यक्ति निपजत असत याचें कारण वाङ्मयसेवेला व धार्मिक चिंतनाला जी सवड पाहिजे असते ती जास्तींत जास्त ब्राम्हण वर्गालाच मिळत असे. क्षत्रियांचा वेळ लढाईंत व राज्यकारभारांत जात असे. वैश्य शेतींत व व्यापारांत दंग असत. शूद्र तर निवळ पायांखालीं तुडवले जाणारे. तेव्हां सगळ्या समाजाचें पुढारीपण ब्राम्हण वर्गाकडे येणें साहजिक होतें. पण त्यामुळें समतेचें तत्वज्ञान उत्पन्न झालें नाहीं;  विषमता कायम राहिली, आणि संहितेच्या काळापासून वैदिक वाङ्मयांत ब्राम्हणाचें वर्चस्व ठेवण्याचा सारखा प्रयत्‍न सुरू झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी