१०. पण जेव्हां हे मागसलेले लोक सुधारलेल्या लोकांच्या संस्कतींत दाखल होऊ इच्छीत नाहींत, किंवा त्यांचा एक नवीनच धर्मपंथ असतो, तेव्हां मात्र जित लोकांवर भयंकर संकट गुदरतें. पहिल्या प्रकारचे लोक म्हटले म्हणजे झेंधिश खान व त्याचे वंशज मोंगल. ह्या लोकांनी मध्य-एशिया व पूर्व-युरोप काबीज केलें, परंतु मुसलमानांची किंवा ख्रिस्ती लोकांची संस्कृति त्यांनी स्वीकारली नाहीं. त्यामुळें समरकंद, बुखारा वगैरे मध्य एशियांतील संस्थानें व रशिया यांची अत्यंत अवनति झाली. या प्रदेशांतील संस्कृति जवळ जवळ नष्ट्रप्राय होऊन गेली.

११. दुसर्‍या प्रकारच्या लोकांचें उदाहरण मुसलमानांचें होय. अल्लाप्रणीत धर्म घेऊन जेव्हां ते दुसर्‍या देशांत शिरत, तेव्हां तेथील संस्कृतीविषयीं त्यांना अणुमात्रहि आदर रहात नसे. इजिप्त आणि पर्शिया या देशांतील उत्कृष्ट संस्कृति त्यांनी नष्ट करून टाकली. हिंदुस्थानची संस्कृति त्यांना निखालस नष्ट करतां आली नाहीं, तरी त्यांच्या कारकीर्दींत ती केवळ मृतप्राय होऊन राहिली; हिंदूंच्या हालांना तर सीमाच राहिली नाहीं.

१२. साम्राज्याचा दुसरा दोष हा कीं, त्याच्या छत्राखालीं असलेले लोक बुद्धिमंद होऊन जातात. राजाशिवाय चालावयाचेंच नाहीं अशी त्यांचीं ठाम समजूत होऊन जाते. राजा म्हणजे परमेश्वराचा अवतार; तो जें कांहीं करील तें सहन करून त्याची मनधरणी करावी लागते. त्याचा देव महादेव असला तर त्याची पूजा, जर वासुदेव असला तर त्याची पूजा करून मोठेपणा मिळवण्याला ब्राह्मण देखील पुढें सरसावतात. अशा तर्‍हेनें बुद्धिमांद्य उत्पन्न झाल्यावर जर मुसलमानांसारखें परचक्र आलें, तर त्याच्याखालीं हे लोक सांपडून बिलकूल किंकर्तव्यतामूढ होऊन बसतात.

१३. साम्राज्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हटला म्हणजे बहुसंख्याक जनतेला दास्यांत राबावें लागतें हा होय. राजाच्या मर्जीला येईल तो त्यानें देव करावा, सरदारांनी त्या देवाची पूजा करावी, पुजार्‍यांनी (ब्राह्मणांनी किंवा मौलवी इत्यादिकांनी) दक्षिणा कमावून रिकामपणांत काळ घालवावा, व बाकीच्या लोकांनी या आयतखाऊ ब्राह्मणांचें आणि क्षत्रियांचें दास्य करतां करतां काबाडकष्टांत दिवस कंठावे, अशी परिस्थिती साम्राज्याच्या योगानें उत्पन्न होते; आणि तिच्यामुळें दाबले गेलेले कष्टाळू लोक स्वदेशाविषयीं आणि आपल्या भवितव्यतेविषयीं अगदींच उदासीन बनतात. स्वराज्य झालें काय किंवा परराज्य झालें काय, एवीं तेवीं आमच्या कपाळांतील दास्य कांहीं जात नाहीं, अशी त्यांची खात्री होते. बाहेरून एकजुटीनें हल्ला करणार्‍या लोकांना असलें हें साम्राज्य सहज पादाक्रांत करतां येतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel