२२६. “तिच्या भाषणानें त्याला संवेग उत्पन्न झाला; व नगराबाहेर जाऊन मरुत्प्रपातावरून उडी टाकून त्यानें प्राण दिला, व तो कोल्ह्याच्या योनींत जन्मला. तेथेंहि त्याला त्याच्या बायकोनें पूर्वचरित्राची आठवण दिली. त्यानें उपासानें आपला प्राण सोडला, व तो लांडगा झाला. नंतर तो गिधाड, कावळा, बगळा व मोर झाला. त्या वेळीं जनक राजाचा अश्वमेध चालू होता. त्यांत तिनें त्या मोराला अवभृथस्नान घातलें, व पूर्व जन्माची आठवण दिली. तेव्हां त्यानें शरीर सोडलें, व तो जनक राजाचा पुत्र झाला. मग त्या काशिराजाच्या कन्येनें स्वयंवर करून त्याला वरलें. म्हणून पाषंडांशीं संभाषण, संसर्ग किंवा हास्यविनेंद करणें अतिपाप आहे असें जाणून तें वर्ज्य करावें. ( अंश ३, अ. १८, श्लोक ५३-१०० )

पाषंडिनो विकर्मस्थान्बैडालव्रतिकाञ्छठान् |
हैतुकान्बकवृत्तींश्च वाङमात्रेणापि नार्चयेत् ||१०१||


(वेदबाह्य कर्में करणारे, मार्जारव्रत धारण करणारे, हेतुवादी आणि बकवृत्ति असे जे पाषंडी त्यांची शब्दानें देखील पूजा करूं नयें).”

२२७. हाच श्लोक मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायांत सांपडतो. त्यांतील हैतुकान् शब्द महत्त्वाचा आहे. हेतुविद्येचा मूळ संस्थापक वसुबंधु होय. त्यामुळें हा श्लोक किंवा सर्वच मनुस्मृति वसुबंधूनंतर बर्‍याच वर्षांनी लिहिली गेली असें सिद्ध होतें. ह्या श्लोकाची व्याख्या विष्णुपुराणाच्या कर्त्यानें कथारूपानें केली आहे. बुद्धाला अवतार गणण्यांत येत असे, त्याचीहि विल्हेवाट ग्रंथकारानें लावली आहे. तो अवतार खरा, पण दैत्यांच्या नाशासाठीं झाला; अर्थात् त्या अवताराचे  जे भक्त भिक्षु, त्यांची शब्दमात्रानेंहि पूजा करतां कामा नये, असें ह्या गोष्टीचें तात्पर्य आहे. पुनर्जन्माच्या गोष्टी सांगून जैन व बौद्ध श्रमण लोकांचीं मनें आपल्या पंथांकडे वळवीत. तशाच पुनर्जन्मकथेचा आधार घेऊन जैनांचा आणि बौद्धांचा पराज करण्याची ही खाशी युक्ति आहे! व्रताच्या दिवशीं जर नुसतें अशा पाखंड्यांशीं भाषण केलें, तर त्याचा केवढा भयंकर परिणाम होतो, हें दाखवण्यासाठीं या ग्रंथकारानें वरील गोष्ट रचली हें उघडच आहे.

२२८. श्रमणांना मार्जारव्रतिक, बकव्रतिक वगैरे विशेषणांनी संबोधून शिव्यागाळी देण्याचा प्रकार बराच प्राचीन आहे. खुद्द त्रिपिटकांतच त्याचा उल्लेख सांपडतो तो असा – “ककुसंध बुद्धाच्या वेळीं दूसी नांवाच्या मारानें एकदां ब्राह्मणांच्या अंगांत प्रवेश केला. तेव्हां ते श्रमणांना पाहून म्हणत असत कीं, हे मुंडक, श्रमणक, चैनी कृष्णधर्मी, ब्रह्मदेवाच्या पायांपासून उत्पन्न झालेले, ध्यानाच्या मिषानें खालीं मान घालून मंदपणें चिंतन करीत असतात. जसें घुबड संध्याकाळच्या वेळीं झाडाच्या फांदीवर बसून उंदराचें ध्यान करीत असतें, किंवा जसा नदीतीरीं कोल्हा माशांचें ध्यान करतो, अथवा बोका घराच्या भितींआड, गटारावर किंवा उकिरड्यावर उंदराचें ध्यान करतो, अथवा निरुपयोगी गाढव अशाच ठिकाणीं ध्यान करीत असतो, त्याच प्रकारें हे मुंडक श्रमणक ध्यान करतात!

२२९. “ही गोष्ट ककुसंध बुद्धाला समजली, तेव्हां तो म्हणाला, ‘भिक्षुहो, ब्राह्मणांना दूसी मारानें पछाडलें आहे. त्यामुळें ते तुम्हास शिव्यागाळी देत आहेत. अशा वेळीं तुम्ही मेत्रीचित्तानें चारी दिशा भरून टाका; करुणाचित्तानें, मुदिता-चित्तानें आणि उपेक्षाचित्तानें चारी दिशा भरून टाका.’ भिक्षूंनी या चार भावना आरंभिल्यामुळें दूसी माराला त्यांचा पराजय करण्याची संधि सांपडलीं नाहीं. तेव्हां ब्राह्मणांच्या अंगांत शिरून त्यांच्याकडून त्यानें भिक्षूंचा आदर सत्कार फार वाढविला. तेव्हां ककुसंध भिक्षूंना म्हणाला, ‘हें माराचें कृत्य आहे असें जाणून तुम्ही मोहांत पडूं नका. आपलें शरीर घाणेरडें आहे हें लक्ष्यांत ठेवा; अन्नामध्यें प्रतिकूलता आहे असें जाणा; जगांत संतोष मानूं नका; व सर्व संस्कार अनित्य आहेत असा विचार करा.” (मारतज्जनीयसुत्त, मज्झिमनि.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel