विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति

पौराणिक संस्कृतीचा उगम


१. बुद्धाच्या काळीं यज्ञयागांची प्रथा बड्या लोकांत चालू होती. पण सामान्य जनतेचा तो धर्म नव्हता. आजकाल जसे खेड्यांपाड्यांतून दगडोबा म्हसोबा आढळतात, तशाच रीतीनें त्या काळीं यक्षांचा आणि देवतांचा सुळसुळाट असे. यक्षांसाठीं मन्दिरें किंवा चबुतरे असत. पण देवता, वृक्ष, पर्वत इत्यादि ठिकाणीं रहात. त्या सर्वांच्या अनेक गोष्टी बौद्ध व जैन वाङ्मयांत आढळून येतात. जसजसें बौद्ध धर्माचें बळ वाढत गेलें तसतसें या यक्षांचें आणि देवतांचें परिवर्तन होऊन ते यक्ष व त्या देवता बुद्धाच्या अनुयायी बनत चालल्या; किंवा त्यांना बौद्ध भिक्षूंनी बुद्धाचे अनुयायी बनवलें असें म्हणण्यास हरकत नाहीं.

२. उदाहरणार्थ, आळवी येथें एका बलाढ्य यक्षाची पूजा होत असे. त्याच्यावर बौद्ध भिक्षूंनी एक गोष्ट रचली ती अशी – “एके वेळीं बुद्ध भगवान् आळवक यक्षाच्या भवनांत (मन्दिरांत) येऊन राहिला. तेव्हां आळवक यक्षाच्या भवनांत (मन्दिरांत) येऊन राहिला. तेव्हां आळवक यक्ष त्याला म्हणाला, ‘हे श्रमणा, येथून बाहेर हो.’ बुद्ध भगवान् तेथून बाहेर निघाला. तेव्हां यक्ष म्हणाला, ‘श्रमणा, आंत ये.’ बुद्ध भगवान् आंत आला. दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाहि हाच प्रकार घडला. पण चौथ्यांदा जेव्हा आळवक यक्षानें भगवंताला बाहेर निघण्यास सांगितले, तेव्हा भगवंतानें ती गोष्ट कबूल केली नाहीं. भगवान् म्हणाला आतां येथून बाहेर निघणार नाहीं; तुला जें कांही करावयाचें असेल तें कर.’ यक्ष म्हणाला, ‘तुला मी प्रश्न विचारतो. त्याचे जर तूं उत्तर दिलें नाहींस, तर तुला वेड लावीन; किंवा तुझें हृदय फाडून टाकीन, अथवा तुला पायाला धरून गंगेच्या पलीकडे फेकून देईन.’ भगवान् म्हणाला, ‘ह्या गोष्टी करणें जगांत कोणालाहि शक्य नाहीं. तथापि तुला प्रश्न विचारावयाचे असेल तर विचार.

३. “ यक्ष म्हणाला, ‘मनुष्याचें श्रेष्ठ धन कोणतें? कशाचा चांगला अभ्यास केला असतां सुखकारक होतो? रसांत रस कोणता? कशा रीतीनें वागल्यानें श्रेष्ठ जीवित म्हणता येईल?’ भगवान् म्हणाला, ‘श्रद्धा हें मनुष्याचें श्रेष्ठ धन आहे. धर्माचा चांगला अभ्यास सुखकारक होतो. रसांत उत्तम रस सत्य होय. प्रज्ञापूर्वक जगणें ह्याला श्रेष्ठ जीवित म्हणतात.

४. “यक्ष म्हणाला, ‘ओघ कसा तरतो? समुद्र कसा तरतो ? दु:खाच्या पार कसा जातो, आणि परिशुद्ध कसा होतो?’ भगवान् म्हणाला, ‘श्रद्धेनें ओघ तरतो; अप्रमादानें समुद्र तरतो; उत्साहानें दु:खाच्या पार जातो, आणि परिशुद्ध होतो.’

५. “यक्ष:-प्रज्ञेला लाभ कसा होतो ?  धन कसें मिळवतो ?  कीर्ति कशी मिळते ?  मित्र कसे जोडतो? ह्या लोकांतून परलोकी गेल्यावर शोक करण्याची पाळी कशी येत नाहीं ? भगवान्:-निर्वाणप्राप्तीच्या अरहन्तांच्या धर्मावर श्रद्धा ठेऊन शुश्रूषा केली असतां सावध व शहाण्या माणसाला प्रज्ञेचा लाभ होतो. योग्य वर्तन करणारा धुरंधर व उत्साही मनुष्य धन मिळवतो; सत्यानें कीर्ति मिळवतो, व दानानें मित्र जोडतो. सत्य, दम, धृति आणि त्याग हे चार गुण ज्या श्रद्धाळु गृहस्थापाशी आहेत तो परलोकीं शोक करीत नाहीं. तूं दुसर्‍यांहि अनेक श्रमण-ब्राह्मणांना विचार कीं, सत्य, दम, त्याग आणि क्षमा यांच्यापेक्षां अधिकतर आहे कीं काय?

६. “यक्ष :- आतां मी दुसर्‍या श्रमण-ब्राह्मणांना कां विचारावें? आज मला पारलौकिक अर्थ कोणता तें समजलें. खरोखरच माझ्या लाभासाठीं बुद्ध आळवीला आला. कोणाला दान दिलें असतां महत्फलदायक होतें हे मला आज समजलें. तो मी बुद्धाला आणि धर्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत करीत गांवोगांवी व शहरोंशहरीं हिंडत राहीन!” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ आळवपसुत्त, सुत्तनिपात, हेंच सुत्त यक्खसंयुत्तांतहि सांपडतें ).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel