४५. पंजाबांतील लष्करी कायदा, मुसलमानांची खिलाफत, व रौलॅट अ‍ॅक्टाला मध्यमवर्गीयांचा विरोध, या सर्व गोष्टी एकवटल्यामुळें गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला एकाएकीं अतिशय तीव्र स्वरूप प्राप्त झालें. जगाचे डोळे त्याच्याकडे लागले; व इंग्रज अधिकारी तर एकदम भांबावून गेले. अशा स्थितींत चौरिचौरा येथें काँग्रेसच्या स्वयंसेवकांकडून पोलिसांना जिवंत जाळण्याचा अत्याचार घडला; व गांधीजींनी सत्याग्रह तहकुब केला. इंग्रजांवर आलेलें संकट महत्प्रयास न करतां आपोआपच टाळलें गेलें!  गांधीजींची लोकप्रियता बरीच कमी झाली आहे, असें पाहून बावीस सालच्या मार्च महिन्यांत त्यांच्यावर खटला भरून त्यांना सहा वर्षांची शिक्षा देण्यांत आली.

४६. गांधीजी दोन वर्षांनी सुटले. त्या वेळीं सत्याग्रहाला फारसा जोर राहिला नव्हता. तरी चार पांच वर्षें सत्याग्रहाचें पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला नाहीं; आणि खादी, राष्ट्रीय शिक्षण, हिंदुमुसलमानांचें ऐक्य व अस्पृश्यता-निवारण ह्या चार विधायक कार्यांवर विशेष भर दिला.

४७. इ.स. १९२९ सालची राष्ट्रीय सभा मोठी संस्मरणीय झाली. तरुण सोशॅलिस्ट पं. जवाहीरलाल यांना या सभेचे अध्यक्ष निवडण्यांत आलें; व काँग्रेसनें स्वराज्याचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य असा केला. काँग्रेस संपल्यावर गांधीजींनी आपले अकरा मुद्दे व्हॉइसरायासमोर मांडले; व मार्च महिन्यांत मिठाचा सत्याग्रह सुरू केला. एका महिन्याच्या आंतच त्यांना पकडून यरवड्याला पाठवणें त्या काळच्या ब्रिटिश लेबर गव्हर्नमेंटला योग्य वाटलें. तरी सत्याग्रह जोरांत सुरू राहिला. व्हॉंइसरायला एकामागून एक फरमाने काढून जवळ जवळ लष्करी कायदा सुरू करावा लागला; व शेवटीं गांधीजींबरोबर लढाई तहकुबीचा करार करुन तहाच्या वाटाघाटीसाठीं त्यांना इंग्लंडला नेण्यांत आलें. तेथें त्यांचा अपूर्व मान झाला. खुद्द पंचम जॉर्ज बादशहानें या फकीराची भेट घेतली !  पण हें सर्व   कँझरव्हेटिवांना आवडावें कसें? त्यांनी म्याक्डोनल्डला काखेंत मारून एकतीस सालच्या निवडणुकींत जय मिळविल्याबरोबर सत्याग्रहाचीं पाळें मुळें खणून टाकण्याचा चंग बांधला. पण लॉर्ड अर्विन यांनी व लेबर गव्हर्नमेंटनें दिलेलीं वचनें अस्तित्वांत होतीं, त्यांचें काय करणार? त्यांची विल्हेवाट सर स्यामुएल होर यांनी तयार केलेल्या बिलांत लावण्यांत आली आहे!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel