७२. रहातां राहिला अपरिग्रह हा चौथा याम. त्याचा समावेश सम्यक् आजीवांत केला पाहिजे. पार्श्व व पार्श्वाचे शिष्य एक किंवा तीन वस्त्रें बाळगीत असत. परंतु पुढें ह्या अपरिग्रहाचा अर्थ असा झाली कीं, कोणतेंहि वस्त्र जवळ बाळगावयाचें नाहीं. त्याला अनुसरून बुद्धसमकालीन जैन पंथाचे पुरस्कर्ते महावीर स्वामी व तदनुयायी जैन साधु नागवे रहात असत. परन्तु बुद्धाला तें पसंत नव्हतें. साधूंनी तीन चीवरें व भिक्षापात्र बाळगावें, आणि गृहस्थानेंहि अत्यन्त साधेपणानें वागावें, याची बुद्ध भगवान् सम्यक् आजीवांत गणना करीत असे. याशिवाय कोणत्याहि हिंसात्मक किंवा अपायकारक पद्धतीनें उपजीविका करावयाची नाहीं, याचाहि अन्तर्भाव सम्यक् आजीवांत होतो.

७३. याप्रमाणें पार्श्वाच्या चार यामांचा समावेश अष्टांगिक मार्गाच्या तीन अंगांत झाला आहे; व बाकी राहिलेलीं पांच अंगेंहि अहिंसेला पोषक अशींच आहेत. त्यांचा यथाक्रम थोडक्यांत विचार करूं.

७४. पहिलें अंग सम्यक् दृष्टि. हें जग कोणी निर्माण केलें, त्याचा अंत होणार आहे कीं नाहीं, परमात्मा एकच आहे कीं प्रतिशरीरांतील आत्मा भिन्न आहे, अशा गोष्टींचा विचार करण्यापासून मानवजातीला कोणताच फायदा नाहीं. मानवजाति दु:खांत पडली आहे. मानवी तृष्णा हें त्या दु:खाचें मूळ आहे. त्या तृष्णेचा निरोध हा मोक्ष आहे; व मोक्षोपाय अष्टांगिक मार्ग आहे. ह्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करणें हीच सम्यक् दृष्टि होय.

७५. कामोपभोगांच्या विचारांपासून मनुष्याची फार हानि होते. त्याचप्रमाणें दुसर्‍याचा घातपात करण्यापासून व उपद्रवकारक चळवळीपासून मनुष्याची फार हानि होते. म्हणून असे विचार मनांत येऊं न देतां निष्काम वृत्तीनें, प्रेमानें व सौजन्यानें वागण्याचा संकल्प करणें यालाच सम्यक् संकल्प म्हणतात.

७६. अपायकारक विचार मनांत आले नसतील तर त्यांस मनांत येऊं न देणें, व जे आले असतील त्यांस ताबडतोब घालवून देणें, आणि जे उपायकारक विचार मनांत आले नसतील त्यांना मनांत आणणें, व जे आले असतील त्यांचा परिपोष करून त्यांना पूर्णतेला नेणें याला सम्यक् व्यायाम म्हणतात.

७७. शरीर, वेदना, मन आणि विचार यांचें यथोचित अवलोकन करणें याला सम्यक् स्मृति म्हणतात; व चार ध्यानांचा अभ्यास करणें याला सम्यक् स्माधि म्हणतात.

७८. पार्श्वाच्या चार यामांत अष्टांगिक मार्गाच्या ह्या पांच अंगांचा समावेश केलेला नाहीं. हिंसा करावयाची नाहीं, असत्य बोलावयाचें नाहीं, चोरी करावयाची नाहीं व परिग्रह करावयाचा नाहीं. हीं चार व्रतें पार्श्वाचे शिष्य स्वीकारीत असत, व राहिलेला वेळ देहदंडनांत घालवीत. हें बुद्धाला अर्थातच पसंत नव्हतें. शरीर आणि वाचा यांचें संयमन केल्यावर राहिलेला वेळ सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक् स्मृति व सम्यक् समाधि ह्यांच्या अभ्यासांत घालवला पाहिजे; तेणेंकरून काया व वाचा यांचें संयमन होऊन मानसिक सुखाची अभिवृद्धि होईल, असें बुद्धाचें म्हणणें होतें यासाठींच देहदंडनाचा निषेध करून अष्टांगिक मार्ग त्यानें प्रचारांत आणला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel