४६. कस्ते मातरं विधवामचक्रच्छयुं कस्त्वामजिघांसच्चरन्तं ।
कस्ते देवो अधि मार्डिक आसीद् यत्प्राक्षिणाः पितरं पादगृह्य ।। ऋ० ४।१८।१२


( तुझ्या आईला विधवा कोणी केलें ? निजला असतां आणि फिरत असतां तुला मारण्याला कोण पाहात होता ? ज्या तूं पित्याला पायाला धरून ठार मारलेंस, त्या तुझ्याहून अधिक सुख देणारा अन्य कोण देव ? ) यावरून असें अनुमान करतां येणें शक्य आहे कीं, कौशिकगोत्री कोणा तरी लहानशा संस्थानिकाला एका कन्येपासून हा मुलगा झाला. पण जन्माच्या वेळीं त्या कन्येचा त्यानें अंगिकार केला नाहीं. शकुंतलेला जसें दुष्यन्तानें घालवून दिलें, तसेंच या तरुणीलाहि त्या संस्थानिकानें घालवून दिलें असावें; पण पुढें तिचा अंगिकार केला असला पाहिजे. मात्र आपल्या आईचा केलेला अपमान इन्द्र विसरला नाहीं; व संधि मिळतांच बापाला पायाला धरून त्यानें ठार मारलें, आणि त्याचें राज्य बळकावलें. अशा रीतीनें सुरुवात करून इन्द्रानें एलाममधील आर्य लोकांचे स्वामित्व संपादिलें असलें पाहिजें.

४७. इन्द्रानें जे अनेक पराक्रम केले त्यांत सर्वांत मोठा म्हटला म्हणजे वृत्राला मारण्याचा होय. यावरून त्याला वृत्रहा हें नांव पडलें. त्याच्या खालोखाल दासांचीं नगरें मोडून सगळा देश मोकळा करणें हा पराक्रम असावा. यावरून त्याला पुरंदर (शहरें तोडणारा) ही संज्ञा मिळाली. इन्द्राच्या पराक्रमाचा परिणाम असा झाला कीं, दास लोक पराभूत होऊन नीच पदाला पावले (‘ विशो दासीरकृणोरप्रशस्ताः ’ ऋ० ४।२८।४ ‘ दासं वर्णमधरं गुहाकः ’ ऋ० २।१२।४), आणि दास हा शब्द गुलाम या अर्थी वापरण्यांत येऊं लागला. इन्द्राच्या विजयामुळें आर्यांचें वर्चस्व वाढलें व आर्यांची गणना बड्या लोकांत होऊं लागली;  जो तो आपणास आर्य म्हणवण्यांत भूषण मानूं लागला.

४८. सप्तसिंधूच्या प्रदेशांत इन्द्राची सत्ता पूर्णपणें स्थापित झाल्यावर त्यानें आपला मोर्चा सप्तसिंधूच्या पूर्वेकडे वळवला असल्यास नवल नाहीं. त्यांत इन्द्राचा पराजय किती ठिकाणीं झाला हें समजणें शक्य नाहीं. कां कीं, ऋग्वेदांतील इन्द्रावरील सूक्तें म्हणजे इन्द्राच्या स्तुतीनें भरलेलीं; त्यांत इन्द्राच्या पराजयाची कथा येईल हें संभवनीय नाहीं. तथापि खालील तीन ऋचा विचारणीय आहेत.

अव द्रप्सो अंशुमतीमतिष्ठदियानः कृष्णो दशभिः सहस्त्रैः ।
सावत्तमिन्द्रः शच्या धमन्तमप स्नेहितीर्नृमणा अधत्त ।।
द्रप्समपश्यं विषुणे चरन्तमुपहृरे नद्यो अंशुमत्याः ।
नभो न कृष्णमवतस्थिवांसमिष्यामि वो वृषणो युध्यताजौ ।।
अध द्रप्सो अंशुमत्या उपस्थेऽधारयत्तन्वं तित्विषाणः ।
विशो अदेवीरभ्या चरन्तीर्वृहस्पतिना युजेन्द्रः ससाहे ।। ऋ० ८।९६।१३-१५


४९. येथें सायणाचार्य तन्व याचा अर्थ शरीर असा करतात. पंधराव्या ऋचेंत अभि उपसर्गाचा ससाहे याच्याशीं संबंध लावून ‘ जघान ’ म्हणजे ठार मारता झाला असा अर्थ करतात. पण असा अर्थ कां ? तर ‘ प्रसंगादवगम्यते ’(ह्या प्रसंगावरून जाणला जातो) असें म्हणतात. म्हणजे जेथें जेथें इन्द्राचा त्याच्या शत्रूंशीं प्रसंग येतो तेथें तेथें इन्द्रानें शत्रूला ठार मारलेच असलें पाहिजे असें सायणाचार्य गृहीत धरतात ! परन्तु तो अर्थ ‘सह’ धातूंतून कसा निघतो हें समजत नाहीं. सह धातूचा अर्थ सहन करणें किंवा जिंकणें असा असूं शकेल; परन्तु ठार मारणें असा असेल असें वाटत नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel