व्यापारी क्रान्तीचे गुणदोष

१४. व्यापारी क्रान्ति होऊन जिकडे तिकडे मध्यमवर्गाचें वर्चस्व स्थापन होऊं लागलें, तेव्हां ह्या पिळून निघणार्‍या कष्टाळू लोकांना एक प्रकारें हायसें वाटलें. व्यापाराला शांतता पाहिजे होती. त्यामुळें वारंवार दंगेधोपे होणें बंद झालें; जाळपोळ होती ती होईनाशी झाली;  आणि शेतकरी व कारागीर वर्गाला आपले धंदे सुखरूपपणें चालवण्याला मोकळीक मिळाली. याशिवाय त्या वर्गांतील हुशार माणसांना स्वत: भांडवलवाले बनतां येऊं लागलें. केवढा हा फरक? ज्या देशांत व्यापारी क्रान्ति झाली तेथल्या लोकांनाच नव्हे, तर हिंदुस्थानसारख्या जित देशांनाहि हा फरक फारच मानवला. ‘इंग्रजांच्या राज्यांत काठीला सोनें बाधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावें!’ हें जें वाक्य आबालवृद्धांच्या तोंडीं झालें होतें, त्याचें कारण हेंच होय. ब्राह्यसमाजाचें पुढारी तर ह्या फरकाला ईश्वरी व्यवस्था (Divine Dispensation )  म्हणूं लागले.

१५. लोकांचा हा भ्रम दूर होण्याला फारसा काळ नको होता. शंभर वर्षांच्या आंतच या नव्यापद्धतीचे दोष सामान्य जनतेच्या निदर्शनास येऊं लागले. इकडे कांही लोक चैनींत पडून राहिलेले, तर तिकडे कांहीं लोक जेमतेम पोटाची खळी भरण्यासाठीं सारा दिवस राबणारे, अशी एकाच शहरांतील भिन्न केंद्रांमध्ये परिस्थिती उत्पन्न झाली. पूर्वयुगांत शेतकरी वर्गाला निदान मोकळी हवा तरी मिळत असे, ती पण या नवीन दासांना मिळणें शक्य नव्हतें. सध्या आपण मुंबईसारख्या शहरांत मजुरांच्या वस्तींत जाऊन पाहिलें, तर पन्नास साठ वर्षांमागें इंग्लंड, जर्मनी वगैरे देशांतील मजुरांची, व गेल्या राज्यक्रान्तीपूर्वी रशियन मजुरांची स्थिति काय होती याची बरोबर कल्पना करतां येते.

१६. पूर्वीं राजे लोक जुगार खेळून आपली संपत्ति उधळीत असत. पण त्यांच्याबरोबर जुगार खेळणारे त्यांच्याच वर्गापैकीं सरदार वगैरे थोडेच लोक असावयाचे. परंतु ह्या व्यापारी युगांत सट्टयाच्या रूपानें आणि घोड्यांच्या शर्यतींच्या रूपानें वाटेल त्याला जुगार खेळतां येतो. धर्मराजानें जुगारांत द्रौपदीला पणाला लावलें, तसें ह्या जुगारांत स्त्रियांना पणाला लावतां येत नाहीं खरें, परंतु त्यांचे हाल मात्र कधीं कधीं द्रौपदीपेक्षां जास्त होतात. एकाद्या मजुरानें महिन्याची मजुरी शर्यतींत घालवली आणि त्यामुळें पठाण दारांत येऊन बसला म्हणजे त्याच्या स्त्रीवर काय प्रसंग येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी! याप्रमाणें भयंकर जुगाराचें व्यसन सार्वजनिक करण्याच्या कामीं व्यापारी युगाचा चांगला उपयोग झाला आहे.

१७. युरोपांतील मजुरांना बेकारीच्या भत्याच्या रूपानें जेमतेम पोटापुरतें तरी वेतन मिळत असतें. पण मागसलेल्या व जिंकलेल्या मुलुखांतील लोकांचे जे या भांडवलशाहीच्या अमलांत हाल होतात, त्यांना सीमाच राहिली नाहीं. लहानसा दुष्काळ पडला, तरी लाखो लोक अन्नान्न करून मरतात; आणि अत्यंत सुभिक्षतेच्या काळींहि मोठा जनसमूह अर्ध्या पोटींच असतो. अशा रीतीनें वर्षांची वर्षें दारिद्र्यांत खिचपत पडण्यापेक्षां हे लोक मरून गेले तर बरें होईल, असें वाटावयास लागतें. आणि जणूं काय त्याचसाठीं इन्फ्लुएंझा, पटकी, फ्लेग वगैरे सांथी त्यांच्यावर वारंवार कोसळतात. पण त्यामुळें हा प्रश्न सुटत नाहीं. म्हातार्‍याकोतार्‍यांपेक्षां चांगले धट्टेकट्टे तरुण या सांथींना बळी पडतात; व बाकी राहिलेले पूर्वीपेक्षांहि बिकट स्थितींत जातात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel